Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(१) सभासदाची बखर, (२) चित्रगुप्ताची बखर, (३) चिटणीसांची बखर, (४) शिवदिग्विजय, (५) शिवप्रताप, (६) रायरी येथील बखर, व (७) दलपतरायाची बखर, ह्या सात बखरींपैकी चित्रगुप्ताची बखर सभासदी बखरीचा अक्षरशः अनुवाद आहे. सभासदी बखरीचें मूळ येऊन त्यांत चित्रगुप्तानें स्वतः रचिलेल्या कविता अधूनमधून घुसडून दिल्या आहेत. व सभासदी बखरीतील एका वाक्याच्या ऐवजींच त्याच अर्थांचीं तीन चार वाक्यें बनविलेली आहेत. रघुनाथ यादव चित्रगुप्त याचा चुलत आजा काकाजी प्रभू हा होता. काकाजी प्रभू म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस (ऊर्फ) चित्रे हा होय. बाळाजी आवजीस संभाजीनें विनापराधें ठार मारिलें हें प्रसिद्ध आहे. बाळाजी आवजीस चिमणाजी व शामजी हे दोन भाऊ होते. ह्या दोघांपैकीं कोणा एकाचा वंशज रघुनाथ यादव असावा हें निश्चित आहे. रघुनाथ यादवाला पुराणिकाच्या थाटावर लिहिण्याची संवय असल्याकारणानें त्यानें आपलें आडनांव चित्रे असें साधे न लावतां पौराणिक थाटावर चित्रगुप्त असें लाविलें आहे. यमाच्या दरबारीं जसा साक्षात् चित्रगुप्त चिटणिशी करी, तशी रघुनाथ यादव कोल्हापूरच्या दरबारीं चित्रगुप्ती किंवा चिटणिशी करी. थोरल्या राजाराम महाराजांचा पुत्र व प्रसिद्ध जिजाबाईचा नवरा कोल्हापूर येथील जो संभाजी राजा त्याच्या दरबारीं आपल्या वयाच्या बाराव्या किंवा तेराव्या वर्षांपासून पुढें चाळीस वर्षें रघुनाथ यादवानें चिटणिशी केली. १६८२ त संभाजी राजे वारले. ह्यावरून असें निष्पन्न होतें कीं, रघुनाथ यादव १६३० च्या सुमारास जन्मला असावा व त्यानें चिटणिशी १६४२ च्या सुमारास करण्यास सुरुवात केली असावी. संभाजीराजे वारल्यावर रघुनाथ यादवाची चिटणिशी दुस-या कोणीं बळकाविली असें दिसतें. तेव्हां चिटणीस मजकुरांच्या कपाळीं देशोदेशीं भणगतीनें हिंडणें प्राप्त झालें. हिंडतां हिंडतां चिकोडीस व मनोली ह्या तालुक्यांत राहून शाहूराजाच्या प्रांतांत दंगा करणा-या यशवंतराव शिंद्याचा रघुनाथाला आश्रय मिळाला व त्याच्या पदरी असतांना त्यानें ही बखर लिहिली. रघुनाथ यादवाला परंपरेनें ऐकिलेली शिवाजी महाराजांची व त्यांच्या वेळच्या कर्त्या पुरुषांची माहिती सडकून होती. सभासदी बखरींत ज्या पुरुषांची आडनांवें दिलीं नाहींत, त्यांची आडनांवें चित्रगुप्त लिहिण्याच्या झोकांत सहजासहजी देऊन जातो. व कधीं कधी वर्णनांत सभासदी बखरींत जीं नांवें मुळींच नाहींत तीं हा नव्यानेंच देतो, व आपण वर्णन करीत आहों तें कथानक आपल्याला करतलामकलवत् अवगत आहे, असें मोठ्या डौलानेंच दाखवितो. सारांश, रघुनाथ यादव माहितगार मनुष्य असल्यामुळें शिवाजीचा इतिहास लिहिणा-याला त्याचें मत वेळोवेळीं घेणें जरूर पडेल. फुल्लचरी, कलकत्ता वगैरें नांवें रघुनाथ यादवानें आपल्या कवितेंत ज्या अर्थी आणिलीं आहेत व शंभू छत्रपतीच्या पुढें आपण ही बखर लिहिली असें ज्या अर्थी तो स्वतःच लिहितो त्या अर्थीं ही बखर १६८२ पासून १६९२ पर्यंतच्या मधील कोणत्या तरी एका वर्षी लिहिली गेली असावी हें स्पष्ट आहे.
सभासदी बखर कृष्णाजी अनंत सभासद ह्यांनी रचिली. कृष्णाजी अनंत व त्यांचे वंशज नारो कृष्ण यास ज्याअर्थी काव्येतिहाससंग्रहकारांनीं पंत ह्या संज्ञेनें उल्लेखिलें आहे, त्या अर्थी सभासद हे देशस्थ ब्राह्मण असावे असे वरकरणी दिसतें. ह्यांच्या वंशजाकडे कोल्हापूर येथील चिटणीसाकडील काम होतें असेंहि संग्रहकार म्हणतात. परंतु चिटणिशी कोणा तरी प्रभू गृहस्थाकडे असली पाहिजे ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे चिटणीसांच्या दप्तरांतील सभासद हे एक सामान्य पिढीजात कारकून असावे असा तर्क करणें जरूर पडतें. खुद्द कृष्णाजी अनंत हे शिवाजीमहाराजांपासून राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत छत्रपतींच्या दरबारीं सभासद होते. सभासदांचा दर्जा काय व कामगिरी कोणती हें जरी कोठें स्पष्ट किंवा अस्पष्ट लिहिलेलें आढळत नाहीं, तरी सभासद म्हणजे राजदरबारी सभेंत बसून सल्लामसलत देणारा शिष्ट पुरुष असावा असा अंदाज आहे. हा जर अंदाज खरा असेल तर अष्ट प्रधानांखेरीज सल्लामसलत देणारे असे छत्रपतींच्या दरबारीं स्वतंत्र सभासदमंडळ असे, असा तर्क करण्यास जागा होते. कृष्णाजी अनंत सभासद यांनीं राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून चंदी येथें आपली बखर ईश्वरनामसंवत्सरीं म्हणजे शके १६१९ त लिहिली.