मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

ह्या पहिल्या वर्गांतील बखरींच्या अगदीं उलट वर्गांतील बखरी म्हणजे कर्णोपकर्णी ऐकिलेल्या वृत्तांताची बाडें होत. उदाहरणार्थ- (१) सोहनीकृत पेशव्यांच्या बखरीचा बराच भाग, (२) दाभाड्यांची हकीकत, (३) गायकवाडांची हकीकत, (४) ब्रह्मेंद्रस्वामीचें चरित्र, (५) गोविंदपंत बुंदेल्यांची कैफियत, व इतर कैफियत वगैरे. ह्या वर्गांतील बाडांतून कोणत्याहि प्रसंगाची सालवार हकीकत किंवा कोणत्याहि प्रसंगाचें साद्यंत व मुद्देसूद वर्णन प्रायः दिलेलें नसतें. कारण, ते ते प्रसंग होऊन बराच काल गेल्यावर, म्हणजे निदान शेपन्नास वर्षे लोटल्यानंतर कोण्या अधिका-याच्या सांगण्यावरून किंवा कोण्या दहा पांच लोकांच्या विनंतीवरून, त्या त्या लेखकांनीं हीं बाडें सजविलेलीं आहेत. वृद्ध लोकांच्या माहितीवरून किंवा स्वतःच्या स्मृतीवरून किंवा एखाददुस-या कागदावर भिस्त ठेवून हीं बाडें लिहिलेलीं आहेत. तशांत, हीं बाडें लिहिणा-यांना ऐतिहासिक सत्यासत्याचा निर्णय करून लिहिण्याचा अभ्यास नसल्यामुळें, मिळेल ती माहिती व सुचेल ती क्लृप्ति खरी धरून चालण्याचा त्यांचा भोळा परिपाठ आहे. लहर लागली म्हणजे किंवा बहुशः माहिती नसली म्हणजे सालेंची सालें खाण्याची ह्या बखरनविसांना संवय आहे. अत्यंत जुन्या काळची माहिती किंवा शंभर सवाशें वर्षांच्या पूर्वींची माहिती द्यावयाची असतांना ह्या बखरनविसांनीं दाखविलेला भोळा अज्ञपणा एक वेळ क्षम्य झाला असता. वास्तविक पाहिलें तर, ह्या बखरनविसांना किंवा कैफियती लिहिणा-यांना आपल्या वेळची किंवा पांच पंचवीस वर्षें आधींची माहिती नीट, मुद्देसूद व विश्वसनीय अशी देतां आली असती हें स्पष्ट आहे. परंतु ऐतिहासिक माहितीची जुळवाजुळव करण्याचें वळण ह्या लोकांना नसल्यामुळें त्यांच्या हातून हें विश्वसनीय इतिहास लिहून ठेवण्याचें काम अंशतः देखील झालें नाही. ह्या बखरींचा उपयोग इतिहास लिहिण्याच्या कामीं अगदींच होणार नाहीं असें नाहीं. जेथें इतर माहिती मुळींच मिळण्यासारखी नाहीं तेथें ह्यांचेंच लिहिणें आधारभूत धरणें प्राप्त आहे. ह्या दोन वर्गांखेरीज बखरींचा आणखी एक तिसरा वर्ग आहे. ह्या तिस-या वर्गांतील बखरींत त्यांच्या पूर्वीच्या जुन्या बखरींतील व टिपणांतील माहिती जशीच्या तशीच किंवा कांहीं फेरफार करून इष्ट तेवढी दिलेली असते. ह्या वर्गांत खालील बखरी मोडतात - (१) चिटणीसकृत शिवछत्रपतीचें सप्तप्रकरणात्मक चरित्र, (२) शिवदिग्विजय, (३) शिवप्रताप, (४) प्रो. फारेस्ट ह्यांनी छापिलेलें रायरी येथील बखरीचें इंग्रजी भाषांतर व (५) गोविंदराव चिटणीसांनीं लिहिलेली बखर. येणेंप्रमाणें बखरींचे तीन वर्ग आहेत. ह्या सर्व बखरींच्या प्रामाण्याची इयत्ता ठरविण्याचा माझा हेतु आहे. पैकीं पहिल्या दोन वर्गांतील बखरींची परीक्षा करण्याचें काम पुढें केव्हां तरी करण्याचें आश्वासन देऊन, तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा प्रस्तुत स्थळी करतों. ह्या तिस-या वर्गांतील बखरींची परीक्षा प्रथम करण्याचें कारण असें कीं, ह्या बखरी मराठ्यांच्या इतिहासाच्या आद्य कालाला अनुलक्षून असल्यामुळें ह्यांनाच अग्रमान देणें रास्त आहे. शिवाय ह्या बखरींच्या प्रामाण्यासंबंधानें जितकी चर्चा व्हावयाला पाहिजे तितकी झाली नसल्यामुळें त्यांची खरी योग्यता जशी ठरावी तशी अद्याप ठरलीं नाहीं व त्यांचा जितका उपयोग करून घ्यावा तितका अद्यापपर्यंत कोणी करून घेतला नाहीं. परीक्षेच्या अंती ह्या बखरींच्या महत्त्वाची इयत्ता ठरली जाईल. ह्या परीक्षेच्या संबंधानें सभासदी बखर, चिटणीशी बखर व दलपतरायाची बखर ह्या तीन बखरींचा उल्लेख करणें अवश्य होणार आहे.