Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

अथ नाशसंरक्षणशिक्षा.
अहंकारबुद्ध्या न जानाति रूपं 
न पात्रेषु दानं कुपात्रेषु सख्यम् ॥

अशिक्षोवरश्चात्ममालिन्यलिप्तो
व्यवस्थाविशून्यो गतः शेषलाभः ॥३॥
इति नाशसंरक्षणशिक्षा.

साठ्यांच्या व सातारा येथील प्रतींत ह्या श्लोकांचीं जागा सोडलेली आहे. तेंव्हा हे श्लोक मूळ प्रतींत असले पाहिजेत हें उघड आहे. हा ग्रंथ शके १७११ सौम्यनाम संवत्सरे माघ शुद्ध पंचमीला सवाई माधवरावाकरितां लिहिला. त्या वेळीं सवाई माधवरावाचें वय सोळा वर्षांचें होतें. गोपाळकृष्णाच्या कुळांत गोविंदकृष्णाच्या मनांत ह्या ग्रंथाची प्रथम कल्पना आली. तीवरून नारायणाने हा ग्रंथ निर्मिला, असें ग्रंथाच्या नांवावरून, उपोद्घातावरून व वरच्या श्लोकावरून दिसतें. हा ग्रंथ शिक्षात्मक आहे, शास्त्रात्मक नाहीं. शास्त्रात्मक ग्रंथांत कोणत्याहि विषयाची उपपत्ति दिलेली असते. शिक्षात्मक ग्रंथांत व्यवहारांत वागावें कसें ह्याविषयीं आज्ञा सांगितलेल्या असतात. नीतिशास्त्रांत नीतीच्या मूल तत्त्वांची उपपत्ति दिलेली असते. नीतिशिक्षेंत व्यवहारांत वर्तन करण्याच्या आज्ञा सांगितलेल्या असतात. नारायणव्यवहारशिक्षा हा ग्रंथ शिक्षात्मक आहे हें त्याच्या नांवावरूनच ठरतें. ह्यांत व्यवहारोपयोगी अनुभवजन्य हितोपदेश सांगितला आहे. लाभ, पालन व नाश-संरक्षण असे या ग्रंथाचे तीन भाग केले असून प्रत्येक भागाचे गुण दिले आहेत. हे गुण अगदींच अभिनवनिर्मित आहेत असें नाहीं. नारदनीति, कणिकनीति यक्षप्रश्न, पंचतंत्र, हितोपदेश वगैरे शिक्षाग्रंथातून बरींच वचनें घेतलेलीं वाचकांच्या दृष्टीस पडतील. परंतु ह्या ग्रंथाचा मुख्य उगम हेमाडपंताच्या नांवावर विकली जाणारी जी एक बखर प्रसिद्ध आहे ती होय. ह्या ग्रंथांत व हेमाडपंताच्या बखरींत भेद असा आहे कीं, हेमाडपंती बखरीपेक्षां ही शिक्षा व्यवस्थित आहे. नारायणशिक्षेंत लाभाचीं कलमें ३५, पालनाचें कलम १ व नाशसंरक्षणाचें कलम १, अशीं एकंदर ३७ कलमें आहेत. लाभाच्या ३५ कलमांचे १९६ गुण, पालनाच्या एक कलमाचे १२ गुण, व नाशसंरक्षणाच्या १ कलमाचे १० गुण सांगितले आहेत. गुण म्हणजे ध्यानांत ठेवण्यासारखीं वाक्यें अथवा म्हणी. ह्या म्हणींपैकीं कांहीं म्हणी नारायणशिक्षेच्या आधीं झालेल्या ब-याच ग्रंथांत सांपडतात. उदाहरणार्थ पालनाच्या कलमांतील नववा गुण 'महाराची खिचडी उतरावी, आपली चढवावी' ही म्हण भाऊसाहेबांच्या बखरींत आली आहे. भाऊसाहेबांच्या बखरींत 'महाराची' ह्याबद्दल 'महाराजाची' असें चुकून पडलें आहे. तसेंच बडोदे येथें छापलेल्या 'शिवप्रताप' नामक बखरीच्या चोविसाव्या पृष्ठावर 'परेंगित जाणावें', 'मर्म लोपवावें' वगैरे म्हणी आल्या आहेत. ह्यावरून असें दिसतें कीं पूर्वींच्या बखरींतील व लोकव्यवहारांतील ब-याच म्हणी नारायणशिक्षेंत गोविल्या असाव्या. हा ग्रंथ नानाफडणिसानें सवाई माधवरावाकरितां शके १७११ त लिहविला. ह्यांतील कलमांचा अर्थ गुरुमुखानें सवाईमाधवराव प्रत्यहीं प्रातःकाळीं ऐकत असत अशी आख्यायिका आहे. ह्या ग्रंथाची एक प्रत मीं ग्वालेरीस पाहिली. ह्यावरून असे दिसतें कीं हा ग्रंथ महाराष्ट्रमंडळांत त्या वेळीं बराच प्रचलित होता.