Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(३) "शके १७०४ पर्यंतची पेशव्यांची बखर" हें या ग्रंथांतील दुसरें प्रकरण आहे. ही बखर सवाई माधवरावाकरितां नानाफडणिसांनीं चिटणिसांकडील बाळाजी गणेश ह्या कारकुनाकडून लिहविली. ही बखर, एक दोन क्षुल्लक अपवाद काढून टाकिले असतां, येथून तेथून पूर्णपणें विश्वसनीय आहे. सवाई माधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांच्याकरितां ही बखर लिहिली असल्यामुळें, अर्थातच् ही अत्यंत त्रोटक आहे. परंतु कालाचा किंवा स्थलाचा किंवा प्रसंगाचा विपर्यास झालेला या बखरींत क्वचित् सांपडेल, किंबहुना सांपडणारच नाहीं. ह्या बखरीच्या एकंदर पांच प्रती मिळाल्याः- पुणें येथील ताई साठी इच्या वंशजांकडून एक, काव्येतिहाससंग्रहकारांच्या दप्तरांतील दोन व वसई येथील दिवेकर यांजकडून दोन. पैकीं साठ्यांची बखर व दिवेकरांची एक बखर पूर्ण आहेत. बाकीच्या तिन्ही बखरी अपूर्णं आहेत. ही बखर शके १७०४ शुभकृत् संवत्सरीं लिहिली. हीत सवाई माधवरावाच्या लग्नाचा ताजा उल्लेख आहे.
ह्या बखरींतील बरेच प्रसंग बखरनविसानें स्वतः पाहिले असल्यामुळें व ज्यांनीं ते प्रसंग स्वतः पाहिले त्यांच्याकरितां व त्यांच्या आज्ञेवरून ही सजविली असल्यामुळें, ही बखर विश्वासपात्र आहे. अधून मधून पेशव्यांची स्तुति केलेली आहे, ती देखील मर्यादित असून, तींत पक्षपातात्मक किंवा अप्रस्तुत असें एकहि वाक्य आढळावयाचें नाहीं. ही बखर त्रोटक नसून विस्तृत असती म्हणजे इतिहासाचें फारच हित झालें असते. महाराष्ट्रांत आजपर्यंत जेवढ्या म्हणून बखरी छापून प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या सर्वांत बिनचुकपणाबद्दल हिला अग्रमान देणें रास्त आहे. विश्वासरावाच्या स्वारीसंबंधीं थोडीशी गफलत झालेली दिसते, ती शके १६७२ पासून १६८३ पर्यंतच्या मराठ्यांच्या इतिहासांतील शेंकडों प्रसंगांचें एक दोन पृष्ठांत वर्णन देण्याच्या घाईनें झालेली आहे हें वाचकांच्या लक्षांत येईल.

ह्या बखरीवरून असें अनुमान करितां येतें की, विश्वसनीय इतिहास लिहिण्याचा प्रघात अठराव्या शतकांत महाराष्ट्रांत होता. तसेंच समकालीन बखरनविसांनीं लिहिलेले वृत्तांत स्वाभाविकपणेंच विश्वसनीय असतात असेंहि विधान करण्यास ह्या बखरीच्या आधारानें अवकाश होतो. तेव्हां आपल्याला माहीत असलेल्या बखरींपैकीं जेवढ्या म्हणून बखरी समकालीन बखरनविसांनीं लिहिल्या आहेत, तेवढ्या ब-याच विश्वसनीय असाव्या किंवा असल्या पाहिजेत हें उघड आहे. आजपर्यंत छापून प्रसिद्ध झालेल्या बखरींपैकी समकालीन बखरनविसांनीं लिहिलेल्या बखरी म्हटल्या म्हणजे (१) सभासदविरचित शिवछत्रपतीचें चरित्र, (२) चित्रगुप्तविरचित शिवाजीमहाराजांची बखर, (३) भाऊसाहेबांची बखर, (४) भाऊसाहेबांची कैफियत, (५) खर्ड्याच्या स्वारीची बखर, व (६) मीं ही आतां छापलेली बखर. ह्या सहा बखरींत समकालीन प्रसंगांचें समकालीन लेखकांनीं विस्तृत किंवा त्रोटक असें वर्णन केलें आहे. विश्वसनीयत्वाच्या दृष्टीनें समकालीन बखरींचा हा पहिला वर्ग होय. ह्या बखरी ब-याच विश्वसनीय असतात असें जरी म्हटलें आहे, तरी त्यांच्या विश्वसनीयत्वाला कांहीं मर्यादा ही आहेच. अस्सल कागदपत्र मिळाले असतां ह्यांतील खुलासेवार मजकुरांत बरीच तफावत दिसून येते असें आढळून आलेलें आहे. तरी अस्सल कागदपत्रांच्या अभावीं ह्या बखरीवर बराच विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं. चित्रगुप्ताची बखर सभासदी बखरीचाच अक्षरशः अनुवाद असल्यामुळें तिचा ह्या वर्गांत समावेश केला आहे.