मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

प्रस्तावना 

१ ह्या ग्रंथांत खालील प्रकरणें छापिलीं आहेतः-

(१) नारायणव्यवहारशिक्षा.
(२) सवाई माधवराव आठ वर्षांचे असतांना त्यांच्याकरितां तयार केलेली पेशव्यांची बखर.
(३) पेशवाईच्या अखेरची अखबार.
(४) रमास्वयंवर.
(५) शक १७३८ सालची हकीकत.
(६) पेशव्यांची वंशावळ.

२ नारायणव्यवहारशिक्षेच्या मला चार लेखी प्रती मिळाल्याः- सवाई माधवरावाची आजी ताईसाठी हिच्या वंशजांच्या दप्तरांतून दोन, सातारा येथील सुभेदार जोशी यांजकडून एक, व पुणें येथील भाऊसाहेब बिनीवाले यांजकडून एक. पैकीं पहिल्या तीन एकाच मूळाच्या निरनिराळ्या प्रती आहेत. बिनीवाल्यांच्या प्रतींत मात्र खालील श्लोक जास्त आहेत.

श्लोक

गोपालकृष्णकृपया व्यवहारशिक्षा
गोविंदकृष्णमनसोत्थितधर्मदीक्षा॥
यो वै तया चरति जिष्णुरिवात्र लोके
हर्म्ये तु तस्य कमलासनकीर्तिलाभः ॥१॥
इति लाभशिक्षा.

अथ पालनशिक्षा.
योग्यायोग्यविचारवस्तुविषये संसाररूपज्ञतां
स्थैर्यास्थैर्यविवेकमंत्ररचनासंचारकालज्ञतां ॥
साध्यासाध्यबलाबलेषु कुशलं शिक्षागुणज्ञप्रभो
लाभस्यप्रतिपालनं कुरु सदा लाभाच्च भाग्योदयः ॥२॥
इति पालनशिक्षा.