Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

पैकी आंग्रे यांचे मूळपुरुषानें महाराज छत्रपति यांची सेवा करून राज्य मिळविलें. आंग्रे यांचें उपनांव शंकपाळ आंगरवाडी येथील रहाणारे सबब आंग्रे अशी ह्मणण्याची वहिवाट पडली आहे. यांचा मूळपुरुष सेखोजी आंग्रे संकपाळ. याचा पुत्र तुकोजी व तुकोजीचा कान्होजी. ह्यांनी राज्य केलें त्याचा तपशील येणेप्रमाणें. कुलाबा येथें महाराज छत्रपति यांचे तर्फेचे अंमलदार माणकोजी सूर्यवंशी, उदाजी पडवळ व सुभानजी खराडे असे तीन असामी निघून प्रबळगडास गेले. आणि तिकडे भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे असे दोन असामी कुलाबा खांदेरी येथें अंमल करीत असतां याकुदखान हबशी जंजिरेकर राजापुराहून आरमार व जमावाचे लोक घेऊन कुलाब्याचे लष्करास वेढा देऊन राहिले. नंतर अल्लीबाग आगापैकी सातहजार माड तोडून काढिले व सात माड मात्र राखून ठेविले, व तेथें पांचसहा महिने राहून निघून गेला, शके १६२०. भिवजी गुजर व कान्होजी आंग्रे या उभयतांचा आपसांत काही तंटा जाला. तेव्हा कान्होजी आंग्रे यांनीं कपट करून गुजर मशारनिले यास धरून अटकेंत घातलें, आणि राज्य मुखत्यारीनें चालविलें. छत्रपती यांजकडून अंमल शके १६०२ पासून शके १६२२ पर्यंत होता. आंग्रे यांनी बहुत पराक्रम केला. खांदेरी व कुलाबा या दोन किल्ल्यांस जमाबंदी प्रांतमजकूरचा निमे वसूल होत असे. व निमे सागरगड, राजकोट मोंगल यांजकडे. उंदेरी किल्ल्याकडे कांही नव्हता. फिरंगी रेवदंडा, मोंगल व हपशी यांचा एक विचार होऊन आंग्रे याजबरोबर रोज लढाई होऊन एकमेकांची क्षिती होत असे. ममतमजखान दिवाण यांची व कोन्होजी आंग्रे यांची चुरस लागली. प्रांतांत दंगा जाला. तेव्हा रयत जागोजाग पळून गेली. आंग्रे याजवर पोहोंचून सागरगड काबीज करून निषाण चढविलें. हें कृत्य शके १६३० सन समान मया व अलफ सालीं घेऊन प्रांतमजकुरी जमाबंदी करून दोन तक्षिमा आंग्रे यांजकडे व एक तक्षिम राजकोट मोंगल यांजकडे तहनामा होऊन चाललें. इतक्यांत शिद्दी अबदुल रहमान हपशी उंदेरीकर यांनी जमावाचे लोक घेऊन फिरंगी अंतोन ज्याकर्दीन गोव्याहून सामील करून आंग्रे याजबरोबर लढाई केली आणि प्रांत वैराण केला. चेंऊल गांवांत हपशी येऊन कांही देवळेव घरे जाळलीं. त्यावेळेस आंग्रे यांचा कांही उपाय चालेनासा झाला. सबब बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची मदत मागून शके १६३५ त बंदोबस्त केला. उंदेरीकडे दोन तेपें झाराड व परभूर दुतर्फा केले. कुलाबा, सागरगड, खांदेरी निमे प्रांत अगर राजकोट मोंगल चवथाई असा तह होऊन सुदामत चालत असे. कान्होजी आंग्रे कुलाबा येथें असतां त्यांस ६ पुत्र झालें. ते येणेंप्रमाणें :- १ सेखोजी, २ संभाजी, ३ तुळाजी, ४ मानाजी, ५ येसाजी, ६ धोंडजी. येणेप्रमाणें सहा पुत्र असतां कान्होजी शके १६५१ त वारले. पुढें सेखोजी आंग्रे यांचा अंमल चालला. यांचा अंमल शके १६५५ पर्यंत होता.