लेखांक ३.
(फारसी मजकूर)

ε इजतमाआब बापूजी हैबतराऊ देसमुख तपे गुंजनमावल अजी रणदुलाखान सलाम बादज सलाम मकसुद अर्दास पाठविली की आपण उमेदवार आहो. जमेती स्वार २० चाकरी करून ऐसे उमेद धरितो. बापूजी पंडित हेजीब पाठविली आहेती. कौल मर्‍हामती केले पाहिजे म्हणौउनु. तरी घर तुमचे आहे. अलबता येणे. काही मुलाहिजा न करणे. येथे आलियावरी ल्याख हाल सरंजामी होईल. कौल असे. हुकेरीस मेजवानी बदल जातो तरी छ १ रबिलौवल आम्हा नजिक एणे.

फारसी
तेरीख  २७

सफर

लेखांक ४

तकरीर केली ऐसिजे, आपा मूल पुरुस रुद्राजी नाईक हे पो। मुरुमदेऊ तो। गुंजनमावळ येथील देशमुखी करीत होते. यावर हजरती अलमपन्हा साहेबी हा मुलक एदिलशाही हैबतखान यासि दिधला. यासि मुलुक जालियाउपर पे॥ किलियावर हवालदार होता तो आपला आजा बाजी हैबतराऊ यासि बोलिला की, पादशाही किला आहे. तुह्मी पा। दिवाण नफर आह्मा किला जधुनु आहे तर तुह्मी मिरासी नफर आहा तर तुह्मी किला राखणे. आह्मी हुजूर जातो. यावर आपला आजा बाजी हैबतराऊ किलेयावर गेला. किलियावर जाताच बाजी हैबतराऊ याचा बाप रुद्राजी नाईक हे तो। मजकुरीची देशमुखी करीत होते. यासि बोलले की, आह्मी किलियावर दटौनु आलो आहो याकरिता दिवाण नामजादे होतील याकरिता तुह्मी किलियावर येणे. यासी एक दोनु वेला बोलिले, परत किलेयावर जात नाही. मग बाजी हैबतराऊ खाली येऊनु आपला बाप रुद्राजी नाईकास किलियावर घेउनु गेलियावर किलियासी वेढा हैबतखान याचा नामजादी मीर येउनु बारा मावळीचे देशमुख घेउनु येउनु किलियासी वेढा घातला. यावर बाजी हैबतराऊ आपला आजा याही हजरती मलिकअंबर साहेबास लिहिले की, येदीलशाही येउनु कीलियासी वेडा घातला आहे, तर साहेब रजा देतील तर किला त्यास देउनु यावर साहेबी रजा फर्माविली की मुलुक त्यास दिधला आहे तर किला त्याचे हवाले करणे ह्मणौनु रजा फर्माविली. यावर बा। रजा मलिक साहेब किला त्याचे हवाले करुनु आपण खाली उतरले. यावर आपले पणजे रुद्राजी नाईक देसमुखी करीत होते. यावर आपला आजा बाजी हैबतराऊ यासी बोलले कीं, आपले ह्मातारपण आहे, तुह्मी देशमुखी चालवीत जाणे. यावर रद्राजी नाईक पुणियासि येउनु हजरती मीरसाहेबास बोलिले की, आपले ह्मातारपण आहे, तरी आपला बेटा वडील बाजी आहे त्याचे हाते देसमुखीचा कारभार घेत जाणे. यावर हजरती मीरसाहेबाचे हुजूर त्यास बोलाउनु देसमुखीचे सिके त्याचे गला घालुनु पाने व लुगडी देउनु कारभार करू लागले. त्यावर हजरती मीरसाहेबी आपला कौल दिधला की, तुवा सुखे देशमुखी करुनु दिवाण नफराई करीत जाणे. यावर हजरती मलिकसाहेबाचा मुलुक मलिक साहेबास जाला. यावर राउतराऊ यासी मुकासा पो। गुंजणखोरे दिधले यावर बाबाजी व त्याची आजी तेजाई आवा हे हर दोजणे हुजूर गेलियावर हजरती मलिकसाहेबानजिक उभे राहिलियावर अर्ज केला की, आपला मरद हा बाजी हैबतरायाने मारिला. देसमुखी वरसे १० दाहा खात आहे हमणौनु मालूम केले.