लेखांक २.

श्री.
१७१८ भाद्रपद शुध्द २
नकल असल बमोजीब

करीणा सुभानराव बिन खंडेराव सिंदे सिलिमकर देशमुख ता। गुंजणमावळ सु॥ सबा तिसैन मया व अलफ करीना लेहून दिल्हा ऐसा जे, आमचा मूळपुरुष शाहाजी शिंदे रविराव मुकाम बेसवडा हे निघोन पायेनडास येऊन नजिक बलवंड व तोरणाल आहे; त्यास बलवंडे येथील रजपूत दलसिंग मोहिते व तोरणाल येथील यशवंतराव चोरघे ऐसे उभयतास बराबर घेऊन ता। मुरुमखोरे येथे मौजे हतवे बु॥ येथे येऊन उतरले. तो ता। मजकूरची देशमुखीण कचाई कोम रतनोजी बिन शाहाजी उपनाम काले कासार सरदेशमुख याचे नकल जाले होते, तिणे शाहाजी सिंदे यास मौजे हतवे बु॥ येथील पाटिलकी देऊन याचे पुत्र उभयता सितोजी व खापरोजीपैकी खापरोजीस कचावा इणे आपल्या हाताखाली ठेऊन देशमुखीचा कारभार त्यापासून करवीत होती आणि यशवंतराव चोरघे हे देशमुखीचा दिवाणकारभार करीत होते. त्यास काही एक वर्षे जाली. तो यशवंतराव चोरघे वारले. त्याचे पुत्र रामराव दिवाणकारभारास सरकारात गेले. मागे कचाई आवाचा काल होऊ लागला. तेव्हा तिणे आपली देशमुखी ता। मारची सितोजी व खापरोजी यास देऊन आपण मृत्य पावली. त्यावरी रामराव चोरघे दिवाणात गेले होते ते घरात आले. तो कचाईचा काल जाला. आणि सितोजी व खापरोजी देशमुखीचा कारभार करितात. त्याणी मौजे बोराळे येथील पाटिलकी दलसिंग मोहिते याचे पुत्र अजपालसिंग यास देऊन त्याची समजूत काढून आणि चोरघे यास काही दिल्हे नाही. त्यावरून चोरघे याणी रुसवा केला. तेव्हा सितोजी व खापरोजी चोरघे यास पाच गाव पाटिलकीचे देत होते, परंतु चोरघे समजले नाहीत. तेव्हांपासून चोरघीयाचा व देशमुखीयाचा वाद लागला. त्यावरी सितोजीचे नकल जाले. बाकी खापरोजीस पुत्र सिवाजी व प्रतापजी. पैकी सिवाजीच्या पुत्राचे नकल जाले. प्रतापजी व बाबाजी व जावजीस पुत्र दशरोजी पावेतो चोरघियाचा व शिंदे देशमुख याची जुझे दरडोईस होऊन वाद सांगतच होते. तो दशरोजीनें कुरंगवाडी इसापत दिवाणातून करून घेऊन आपण कुरंगवाडीस नांदत होता. त्यावरी चोरघे याचे वंसीचे उदाजी व त्याचे पुत्र येसाजी यानीं दसरोजीवर चढाई करून कुरंगवडीच्या मागें माळावरी जुंझ करून दसरोजीस मारिला. मग दसरोजीचा पुत्र कान्होजी याणीं मौजे कुरंगवडीस महकलासा मागें वाडा बांधोन देशमुखी करीत होता. त्याचा पुत्र येसाजी यानीं मार्गआसनीस वाडा बांधोन मार्ग चालता केला. त्याचा पुत्र चाहूजी याणे गुंजवणियांत मुकाईच्या माळावरी वाडा बांधोन मार्ग चालता केला. त्याचा पुत्र चाहूजी याणे गुंजवणियांत मुकाईच्या माळावरी वाडा बांधोन देशमुखी करीत होता. त्यास पुत्र दोन-पुनाजी व भिवजी. हे देशमुखी करीत होते. चाहुजी ह्मातारा जाला त्याची बहीण सामावा. कानोजी कोंड देशमुख ता। खेडेबारे यांचे पुत्र दोन बापोजी व जाखोजी. त्यास बापोजी कोंड यास सामावा दिल्ही होती. तेव्हां त्याचे पुत्र हरजी वडील जीवन लहान ह्मणून सामावा याणी चाहूजी सिंदे आणून त्याजपासून सिक्याचा कारभार करवीत होती. त्यावरी तिचा दीर जाखोजी यास व चाहूजीस पटेना. सबब जाखोजी मा।र याणे सामाई सवतीचा भाऊ चाहूजी ऐसे जिवे मारिले. तेव्हा सामाईचे पुत्र पुनाजी व भिवजी ऐसे बेदरास जाऊन वाद सांगू लागले. तेव्हां पातशाहानीं जाखोजी कोंडे याचे वतन- वाट्यापैकी गाव च्यार घेऊन या दोघास बितपशील उंबरे व निगडे हे दोन गांव सामावाच्या खुनाबद्दल तिचे पुत्र हरजी व तुलसी यांस दिल्हे व निधान सांगवी हे दोन गाव चाहूजीचे पुत्र पुनाजी व भिवजी सिंदे देशमुख ता। गुंजणमावळ यास चाहूजीच्या खुनाबद्दल दिल्हे. त्यावरी भिवजी सिंदे बेदरास कामकाजामुळे गेला त्यास तेथे दोन च्यार वर्षे लागली. तो चोरघियाचा वाद पहिलाच होतां त्यास त्याणी पुनाजी एकटा आहे ऐसी संदी पाहून, उदाजी व एसाजी याचे वौसीचे बाजी व भिवजी याणी जुंजावरी जुंजे करून पुनाजीस पळव केला. तेव्हां पुनाजीने विचार करून हवजी व रुद्राजी व भिवजी सिलिमकर पाटील मौजे सिलिंबे ता। पवनमावळ यास पाच गांव पाटिलकीचे देऊ करून, पुनाजीने आपले मदतीस आणिले आणि मौजे बोराळे येथील आपल्या वाड्यात आणून चोरघे याच्या तोंडावरी ठेविले. त्यावरी चोरघे काहीच बदले नाहींत. त्यावरी पुनाजीसी व या त्रिवर्गासी सिलिंबकराची समक्ष भेटी जाली. तेव्हां सिलिंबकर याणी पुनाजीस विचारले जे आह्मास तुह्मी का आणिले ? मग पुनाजी बोलिला की, आमचा व चोरघा याचा वाद बहुत दिवस आहे, त्यास आमचा भाऊ भिवजी बेदरास जाऊन तीन चार वर्षे जाली, मागे मी एकटा. चोरघे तरी आपल्यास चैन पडू देईनात. याजकरितां तुह्मास आह्मी मदतीस आणिले. तुह्मी व आह्मी मिळोन चोरघीयास नतिजा पोहचऊ. याबदल तुह्मांस पाच गाव पाटिलकीचे देऊ. ऐसे पुनाजी बोलिला. तेव्हा हे त्रिवर्ग बोलिले जे, आम्हास निमे देशमुखी देसील तरी आह्मी राहून काज काम करितो. नाही तरी माघारे जातो. ऐसे ते पष्ट बोलिले. तेव्हा पुनाजीने साल जाब केला जे, तुह्मास पाच गाव पाटिलकीचे घेऊन कामकाज करावयाचे पुर्वत असिले तरी राहाणे; नाही तरी सुखरूप माघारें आपले सिलींबास जाणे. ऐसे पष्ट बोलोन पुनाजी आपले घरास गुंजवणीयास गेला. त्यावरी महिनापंधरा दिवस जाहलेयावरी सिलीमकर याणी येऊन गुंजवणियास जाऊन पुनाजीस व उभयताच्या बाइकास व मुलास मारामार करून कापून घर लुटून कागद वतनाचे होते ते नेले, आणि घर खाणून जाळिले. तो सवेच मलिकअंबर विजापुराहून पुणियास आले. त्याजकडे हे त्रिवर्ग सिलीमकर जाऊन त्यास आपले तर्‍हेने समजाऊन निमे देशमुखी करून घेतली.