मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ६.

१७०२ ज्येष्ठ वद्य ३.
पौ। छ २५ रमजान

पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना ऐसीजे :- पत्रीं आज्ञा कीं : इंग्रजांचे तंबीस सरकारांतून सिंदे-होळकर फौजेसह गुजराथेंत करनेल गाडर याजवर गेले. तोफखाना तीन कोसांचा आहे. दररोज लढाई सुरू आहे, दोन च्यार लढाया जाहल्या. त्यांत बहुत नरम इंग्रज केले. मैदानांत येऊ शकत नाहींत. अडचणीची जागा धरून आहेत. नित्यानीं घरोघर येऊन कही वगैरे लुटून आणतात. बहुत तंग केले आहेत. मैदानांत यावें ही इच्छा. ईश्वरइच्छेने थोडेच दिवसांत फैसल होईल. भोंसले फौजेसहित बंगाल्यात रवाना जाले. कटकचे मैदानात गेलें. हे वृत्त तेथेंही आले असेल. हैदर नाईक याणी चेनापट्टणाकडे जाण्यास डेरे दाखल जाले. चेनापट्टणानजीक गेले असतली. नबाब निज्यामअल्लीखानही सिकाकोलाकडे सत्वरच जातील. चहूंकडून ताण बसला. त्यांत बंगाला ऐन पैकेयाची इंग्रजाची नड मोडते. ऐशांत पादशहा यांनी बाहीर निघोन, नबाब नजबखानबहादूर, सीख वगैरे यांस कळेल तसे समेटून घेऊन, इंग्रजास सजा करून, असफुद्दौला यांचे दौलतीचा बंदोबस्त केल्यास नफे बहुत होऊन खिसारा बारेल. टोपीवाल्यांनी बेअदब केली ते हालखुद्द राहून, सवदागिरीचे मार्गे वर्तणूक करितील. समेट हाच आहे. सविस्तर नबाब नजबखानबहादर यांचे पत्रीं तपशिले लिहिले आहे. मसवद्यावरून कळेल त्याअन्वये बोलून, लिहिल्याप्रो। अमलांत यावे. सरकारकाम करून दाखवावयाचा समय आहे. तुह्मी कराल, हे खातरजमा, तथापि सूचना लिहिली आहे. इंग्रजांचे पारपत्य होऊन, नक्षा मोठा व्हावा, ऐसा समय आहे. असें पुढे करूं गेलियास होणार नाही. ईश्वरें ज्यांस मोठेपण दिल्हें त्यांणी मोठे कार्य केलियास नक्षा व कितेक दिवस कीर्ति रहावी, ऐसेंच करावें हे उत्तम. या गोष्टीस गई गुजरल्यास टोपीवालें काही दिवसांत पातशहात घेतील. मग पश्चात्ताप होऊन फळ नाही. असे आहे म्हणून पत्रीं आज्ञा. त्याजवरून आज्ञेप्रों। पातशहास व नबाब नजबखानास सविस्तर अक्षरशाह मा। एक दोनदा समजाऊन, यथामतीनें दूरअंदेसीचे प्रकार खचित करून इंग्रजाचे रुपयावर नजर न देतां त्यासी बिघाड करावा हे गोष्ट शपतपूर्वक ठराऊन, डेरेबाहीर करावें हा निश्चय केला आहे. फरासखाना व तोफखाना वगैरे स्वारींच्या तयारीस पातशहानी आज्ञा केली. डेरेदाखल होतील तेसमई सेवेसी लिहू. कृपा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.