Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
शक १५६२ त पुणे प्रांती शिवाजी, जिजाबाई व दादाजी कोंडदेव गेल्यानंतर शिवाजीने पुण्याखालील बारा मावळे काबीज केली, राजगड बांधिला व तोरणा हाती घेतला. ह्या कृत्यांची बातमी महमदशहाच्या कानी येत होती. याच सुमारास शहाजीचेही विजापूरास येणे बंद झाले. तेव्हा रूबरू गाठ घेण्याकरिता शहाने शहाजीस दोन चार वेळा बोलावणे पाठविले. ते ह्या नाही त्या सबबीवर शहाजीने टाळले. सामान्य हुज-याप्रमाणे मुसक्या बांधून शहाजीला धरून आणण्याची शहाची प्राज्ञा नव्हती. शहाजीजवळ इतके चांगले जय्यत सैन्य असे की, त्याच्याशी मगरूरी करणे बरेच धोक्याचे होते. सबब, विजयानगरचा राजा रायल ऊर्फ श्रीरंगशायी नायक या पुंड संस्थानिकावर स्वारी करण्याच्या मिषाने महमदखानाने मुस्तफाखानाची रवानगी शक १५६८ त कर्नाटकात केली व शहाजीवर नजर ठेविण्यास त्यास सांगितले. शहाजी श्रीरंगशायी नायकास फूस देतो की काय वगैरे माहिती काढण्याचे काम मुस्तफाखानाकडे होते. मुस्तफाखानास मदत करण्याचा हुकूम शहाने शहाजीस व आसदखानास केला. शिद्दी रैहान गंडीकोटास वेढा घालून बसला होता त्यासही मुस्तफाखानास जाऊन मिळण्यास महमदशहाने लिहिले. येणेप्राणे मुस्तफाखान, शहाजी, आसदखान व शिद्दी रैहान असे चौघे आदिलशाही सरदार श्रीरंगशायी नायकावर बेदनूरप्रांती चालून गेले. बेदनूरप्रांती चाल करून जाण्याचे कारण असे की, विजयानगरच्या श्रीरंगनयकास त्याचा मांडलिक जो बेदनूरचा शिवाप्पा नायक त्याची मदत होती. शिवाप्पाचा बेदनूर प्रांत डोंगराळ असून तेथून त्याने व श्रीरंगशायी नायकाने आसमंतातील प्रांतात मोठा धुमाकूळ मांडिला. त्यांनी फौजही इतकी भारी जमा केली होती की, शहाजी किंवा मुस्तफाखान यांची खातरजमा ते बाळगीत नव्हते. आदिलशाही फौजेच्या व बेदनूरकराच्या फौजेच्या कित्येक लहानमोठ्या चकमकी झाल्या, त्यात बेदनूरकराचीच फत्ते होत गेली. शेवटी, दोन्ही सैन्यांची येल्लूर येथे गाठ पडून मोठे निकराचे युद्ध झाले. मुस्तफाखानाच्या उजव्या बाजूस शिद्दी रैहान आणि डावे बाजूस शहाजी व आसदखान होते. बेदनूरकराकडील सरदार दामलवाड याने चालून येऊन मध्यस्थानी असलेल्या मुस्तफाखानाचे खास लष्कर फोडून भग्न केले आणि शहाजी व आसदखान यांच्या तुकडीवर हल्ला करून आसदखानास जखमी केले. हा सर्व चमत्कार मुस्तफाखान एका टेकाडावरून पहात होता, त्याच्यावर दामलवाडनंतर चाल करून गेला. तेव्हा शिद्दी रैहानाने दामलवाडाच्या पिछाडीवर हल्ला करून दामलवाडास ठार केले. दामलवाड ठार होताच बेदनूरकराच्या सैन्याने पळ काढला आणि आदिलशाही फौजेचा जय झाला. प्रथम लढाईचा सर्व भार शहाजी व आसदखान यांच्या तुकडीवर पडून त्यात आसदखान जखमी झाला खरा; परंतु दामलवाडाची सर्व शक्ति ह्या तुकडीशी झुंजण्यात खर्च झाल्यामुळे, सिद्दी रैहानला दामलवाडावर जय मिळविता आला. अशी स्थिती असल्यामुळे शहाजी व आसदखान यांच्या पक्षातील लोक जय आपण मिळविला असे म्हणू लागले व शिद्दी रैहान तो मान आपला आहे असे प्रतिपादू लागला. कोणत्याही एका पक्षाची तरफदारी मुस्तफाखानाला करणे अशक्य होऊन, अखेरीस दोन्ही पक्ष नाखुष झाले. शिद्दी रैहानाचे व मुस्तफाखानाचे त्यामुळे वाकडे पडले. शहाजी व मुस्तफाखान यांच्यातही वैमनस्य पूर्वी होतेच, ते जास्त दुणावले. मुस्तफाखानाला असा संशय आला की, शहाजीने ह्या एकंदर मोहिमेत अंगचोरपणा केला व बेदनूरकराचा जितका पक्का बंदोबस्त करावा तितका केला नाही. ह्या संशयाचा परिणाम असा झाला की, शहाजीवर बारीक नजर ठेविण्यास मुस्तफाखानाने आपल्या हाताखालील सरदारास सांगितले. बेदनूरकरावरील ही मोहीम शक १५६८ च्या आश्विनात सुरू होऊन सबंध १५६९ सालभर चालली.