Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
४०. शक १५५९ साली चैत्रवैशाखात शहाजी विजापूरी दाखल झाला. ५९ च्या पावसाळ्यानंतर त्याची रवानगी रणदुल्लाखानाबरोबर कर्नाटकात म्हणजे सध्याच्या म्हैसूर प्रांतात झाली. तेथील कित्येक पाळेगारांनी व राजांनी दक्षिणचा सुभा जो अठरा वर्षांचा औरंगजेब त्याच्याशी संविधान बांधून आदिलशहाच्या दपटश्यातून मुक्त होण्याची खटपट चालविली होती. त्यांना ताळ्यावर आणण्याकरिता आदिलशहास त्या प्रांती पाठविणे इष्ट दिसले. रणदुल्लाखान हा वरिष्ठ सरदार, सबब लढण्याचा वगैरे सर्व भार शहाजीवर सहजच पडला. रायगिरी येथील राजा वीरभद्र याजकडून खंडणीचा पैसा थकला, करता त्याचा समाचार ह्यावर्षी व १५६० च्या प्रारंभी घेऊन रणदुल्ला व शहाजी विजापूरास परत आले. १५६१ प्रमाथी संवत्सरातील दुस-या वर्षीच्या मोहिमेत शहाजीने बसवापट्टण सर केले. ह्या वर्षी मोहीम करून विश्रांतीस विजापूरास परत आल्यावर कनकगिरीच्या सनदा महमदशहाने खुष होऊन शहाजीस बहाल केल्या. १५६२ च्या साली शहाजीराजास नूतन अर्जानी झालेल्या कनकगिरीच्या जहागिरीतील गिराशांनी बंड केले. जवळच्याच एका तालुक्यात शहाजी मोहिमेवर होता. तो इतक्यात अफजलखान भटारी कनकगिरी प्रांतातून जात असता बंडखोर गिराश्यांची व अफजलखानाची गाठ पडली. बहुत कजाखीचे युद्ध झाले. त्यात भटा-याचा पराभव झाला. हे वृत्त कळताच ताबडतोब कनकगिरीवर चाल करून येऊन, शहाजीने कनकगिरीकराचे पारिपत्य केले. शहाजीच्या या साह्याचे भूषण न मानिता, अफजलखान दूषण मानू लागला आणि तेव्हापासून शहाजीचा द्वेष करू लागला. ह्या मोहिमेत शहाजी असता वैशाख शुद्ध पंचमीस शिवाजीचे पहिले लग्न सईबाईशी पुण्यास दादाजीपंतांनी उरकून घेतले. ही वार्ता विजापूरी महमद आदिलशहास व बडे साहिबिणीस कळून, राजे मोहिमेहून परत आल्यावर त्यांनी गैरहजेरीत मुलाचे लग्न असे गुपचूप का उरकून घेतले असा प्रश्न केला आणि राजास हुकूम केला की, मुलास आणून येथेच समारंभाने लग्न करावे. तेव्हा जिजाबाई व शिवाजी यास विजापूरास आणून तेथे शिवाजीचे दुसरे लग्न पुतळाबाई ऊर्फ सोयराबाई इजशी, आदिलशहा स्वत: हजर राहून, आषाढात मोठ्या थाटाने लाविले. ह्या वेळी शक १५६२ त शिवाजीचे वय तेरा वर्षांचे होते. मुजरा वगैरे न करण्याचा प्रकार जो झाला तो (शिवदिग्विजय १११ व ११२) ह्या वर्षाच्या पावसाळ्यानंतर दस-याचा दरबार भरला असता झाला. त्रेसष्ट, चौसष्ट व पासष्ट या सालीही लखमेश्वर वगैरे प्रांतांवर स्वा-या करून बंकापूर, हरिहर, बसवापट्टण, तालीखेडा वगैरे तालुके शहाजीने आस्ते आस्ते अमलाखाली आणिले. पाऊसकाळी शिरस्त्याप्रमाणे तो छावणीस विजापूरप्रांती येई. १५६६ साली शिरे व बंगळूर हे प्रांत घेऊन, म्हैसूरचा पूर्वेकडील प्रांत आदिलशहाच्या हुकमतीत आला. अलीकडे काही वर्षे रणदुल्लाखान प्रकृती नादुरुस्त म्हणून विजापूरी राही व शहाजी एकटाच मोहिमेचे काम संभाळी. शेवटी शके १५६५ त रणदुल्लाखान दुखण्याने वारला. सदुसष्ट साली शहाजीने वीरभद्राकडून यल्लारी तालुका घेतला. अशा त-हेने आठ वर्षांत शहाजीने विधुपूरचा राजा वीरभद्र, श्रीरंगपट्टणचा राजा कंठीरव, कोंगदेशचा राजा कोंगनायक, कावेरीपट्टणचा राजा जगदेव, तंजापूरचा विजयराघव, चंदीचा वेंकटनायक, मधरेचा तिरुमल्ल नाईक, वालीगुंडापूरचा अरिकाल वेंकट नाईक, विजयानगरचा रंगशायी नायक, इंसकुटपूरचा तन्नोगोड नायक इत्यादी लहान मोठे पाळेगार जिंकून त्यांजकडून खंडण्या घेतल्या (बृहदीश्वरशिलालेख). ह्यामुळे शहाजीराजांची कीर्ति व बोलबाला सर्वत्र विशेष झाला व कर्तबगारीच्या समांतर वास्तव्य करणारा जो मत्सर त्याचा पगडा आदिलशाही दरबारात उद्भवला. मलिकंबराच्या कारकीर्दीत मत्सराचा उदय होऊन, शक १५५८ त निजामशाही शहाजीला सोडावी लागली आणि तोच विकार शहाजहानच्या हृदयात शिरून शहाजीला शक १५५८ त पुनरुज्जीवित निजामशाहीस कायमचे मुकावे लागले. असलाच प्रकार शक १५६८ साली व्हावयाचा प्रसंग येऊन शहाजीवर देखरेख करण्याकरिता कर्नाटकची सुभेदारी मुस्तफाखान यास झाली. दहा वर्षांपूर्वी खवासखान व मुरारपंत यांचा शत्रू हा मुस्तफाखान होता आणि खवासखान आणि मुरारपंत यांचा आणि शहाजीराजाचा तर अत्यंत स्नेह असे.