Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
मोंगलांशी जी ही युद्धे होत होती त्यात मालोजीने पराक्रम करून अंत:करणपूर्वक निजामशहाची व वरकरणी मलिकंबराची इतकी मेहेरनजर संपादिली की, शक १५२५ च्या चैत्रात पंचहजारी मनसब मिळवून तो जाधवरावाच्या बरोबरीचा तोलदार सरदार बनला. नंतर शहाच्या खास मध्यस्तीने शहाजीचा दुसरा विवाह जिजाबाईंशी शक १५२५ च्या वैशाखात झाला. ह्या वेळी मालोजीचे वय त्रेपन्न वर्षांचे असून, शहाजी नऊ वर्षांचा व जिजाबाई आठ वर्षांची होती. पुढे मलिकंबराच्या कारकीर्दीत शक १५४१ पर्यंत अनेक मुलुखगि-या करीत असता मालोजीला रणभूमीवर मृत्यूने गाठिले. मरणसमयी मालोजीचे वय सत्तरीच्या जवळ जवळ आले होते. फौजेच्या खर्चाकरिता निजामशहाने मालोजीराजास जी जहागिरी दिली ती बहुतेक निजामशाही, मोंगलाई व आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील असून, कित्येक परगणे मोंगलांच्या राज्यातील होते. सरहद्दीवरील परगणे देण्याचा हेतु स्पष्ट असा होता की, निजामशहाची सरहद्द स्वहितार्थ तरी मालोजीने शाबूद ठेवावी आणि मोंगलांच्या प्रांतातील परगणे जहागीर देण्यात मतलब असा होता की, मालोजीने ते प्रांत कायमचे जिंकून घेऊन निजामशाहीस जोडावे. शक १५२५ च्या पूर्वी कित्येक सालात ते शक १५२५ च्या नंतरच्या पुढील कित्येक सालात मलिकंबराच्या देखरेखीखाली मालोजीने मोंगलांचे जे परगणे काबीज केले होते तेच परगणे त्याला शहाने जहागीर दिले. ह्या परगण्यात माळव्यातील काही मुलूख होता. देणा-याची दूरदृष्टी व घेणा-याची हिम्मत सारखीच वाखाणण्यालायक आहे! मालोजीने शिखरशिंगणापूरच्या निर्जल डोंगरावर विस्तीर्ण सरोवर बांधून व वेरूळच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार करून महाराष्ट्रात सर्वतोमुखी कीर्ति संपादन केली. शिवाजीच्या आज्याचा असा हा त्रोटक इतिहास आहे. मालोजी संबंधाने अस्सल कागदपत्र देवगिरी, नगर, जुन्नर, इंदापूर, पारनेर, नाशिक वगैरे त्याच्या जहागिरीच्या परगण्यात धुंडाळले व उकरिले पाहिजे. तसेच, त्याच्या मुत्सद्यांची घराणी शोधून काढिली पाहिजेत. पुंडे व राजोपाध्ये ह्या घरांण्यांखेरीज इतर सबनीस, पेशवे इत्यादी मालोजीच्या मुत्सद्यांची नावेही अद्याप प्रकाशात आली नाहीत. बृहदीश्वरशिलालेखकार आवश्याची लढाई, दिलावरखान व इस्माइल यांच्या बंडातील मालोजीची कामगिरी, यांचा उल्लेख ज्या अर्थी करतो, त्या अर्थी सहजच अनुमान होते की, त्याला मालोजीची एखादी बखर किंवा टिपण उपलब्ध असावे.