Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

५. परंतु, काव्येतिहाससंग्रहांत व इतरत्र छापलेल्या पत्रांची किंमत फारच निराळ्या प्रकारची म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे.

ह्या महत्त्वाचें कारण सर्वांच्या सहज ध्यानांत येण्याजोगें आहे.

६. ह्या पत्रांच्या साहाय्यानेंच बखरींतील मजकुराच्या खरेखोटेपणाचा निर्णय व्हावयाचा आहे; बखरींतील कालविपर्यासाचा परिहार हींच पत्रें करितील; व बखरींत जी माहिती दिली नाहीं ती हींच पत्रें देतील.

(अ) काव्येतिहाससंग्रहांत एकंदर ५०१ पत्रें व यादी आहेत. पैकी नं. २० च पत्र व नं १ चें पत्र हीं एकच असल्यामुळें खरोखर ५०० च पत्रें आहेत. १ शहाजीच्या कारकीर्दीसंबंधीं, २ शिवाजीच्या कारकीर्दीतील, १ राजारामाच्या कारकीर्दीतील, ५ बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीतील, २६ बाजीराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील, १५९ बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील, ३२ माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील, २३४ माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील, २१ बाजीराव रघुनाथाच्या कारकीर्दीतील, २ इंग्रजींतील, ३ शकावली, ७ वंशावली, १ हिशेबी, ७ किरकोळ, मिळून ५०१ पत्रें व यादी होतात. पैकीं ४३८, ४९४, ४९५ ह्या लहान बखरी आहेत. तिन्ही शकावलींपैकीं दोन मोठ्या विश्वसनीय आहेत असें नाहीं. वंशावळींतहि बहुत अपूर्णता आहे. बाकी राहिलेलीं पत्रें मात्र पूर्णपणें विश्वसनीय व अस्सल आहेत; परंतु, तीं संगतवार अशीं फारच थोडीं असल्यामुळें त्यांचाहि इतिहासाच्या कामीं उपयोग म्हटला म्हणजे रचनेपेक्षां पुराव्याच्या रूपानें विशेष होण्यासारिखा आहे. शहाजी, शिवाजी, राजाराम, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील पहिलीं सहा वर्षें व पुढलीं दहा वर्षें, बाजीराव रघुनाथ व अव्वल इंग्रजी ह्यांसंबंधीं पत्रें मुळींच नाहींत म्हटलें असतां चालेल. अर्थात् ह्यांच्या कारकीर्दीसंबंधीं माहिती ह्या संग्रहांत प्रायः नाहीं. बाकी राहिले बाळाजी बाजीराव व माधवराव नारायण; पैकीं माधवराव नारायणाच्या कारकीर्दीतील साळबाईच्या तहाच्या वेळचीं, एकदोन वर्षें अलीकडचीं व महिना दोन महिने पलीकडचीं, अशीं पत्रें काव्येतिहासंग्रहांत सुमारें १८० आहेत. माधवराव नारायणाची बाकीची कारकीर्द बहुतेक रिकामीच आहे. बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीसंबंधीं पत्रें पहातां उदगीरच्या व पानिपतच्या मोहिमेसंबंधीं एकादें दुसरेंच जुजबी पत्र ह्या संग्रहांत सांपडतें. उदगीरच्या लढाईसंबंधीं १७० वें पत्र व पानिपतच्या लढाईसंबंधीं ५३, १७१ व १७५ एवढींच काय तीं पत्रें आहेत. पैकीं १७१ कुशलार्थाचेंच आहे. ५३ वें पत्र नाना फडणविसानें आत्मचरित्र म्हणून लिहिलेलें आहे. बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीसंबंधीं एकंदर १५९ पत्रें आहेत म्हणून वरती सांगितलेंच आहे. त्यांतून हीं चार वजा करितां बाकी राहिलेलीं १५५ पत्रें इ.स. १७४० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील कांहीं ठळक ठळक प्रसंगांसंबंधीं आहेत. सर्वांत १७५२ सालचीं पत्रें फार आहेत म्हणजे सुमारें २० आहेत, ५१ सालचीं सुमारें १४ आहेत, ५४ सालचीं १४, ५५ सालचीं १०, ४७ सालचीं १०, ५९ सालचीं ६, ५६, ५७, ६० व ६१ सालांचीं पांच पांच, ४० व ५८ सालांचीं चार चार, ४६ सालचीं ३, ४१ चीं ३, ५३ चीं २, ४८ चें १ व ४२, ४३, ४४, ४९ व ५० ह्या सालांचीं मुळींच नाहींत. ह्या सालवारी पत्रांची एकंदर संख्या ११७ होते. १५९ पैकीं बाकीं ४२ राहिलीं. तीं विशेष महत्त्वाची नसल्यामुळें त्यांचे सालवारी वर्गीकरण केलें नाहीं.