Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

८. हाच हेतु मनांत धरून मी हीं पत्रे प्रसिद्ध केलीं आहेत.

प्रस्तुत ग्रंथांत एकंदर ३०४ पत्रें आहेत. तीं सर्व १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधींतील म्हणजे शाहूमहाराजाच्या मृत्यूपासून (१५ डिसेंबर १७४९ पासून) पानिपतची लढाई होऊन दहा अकरा महिन्यांपर्यंतच्या (नोव्हेंबर १७६१) अवधींतील आहेत. १७५० तील ३, १७५१ तील ११, १७५३ तील ७, १७५४ तील २०, १७५५ तील ८, १७५६ तील १, १७५७ ती ७०, १७५८ तील ५, १७५९ तील २३, १७६० तील १२५ व १७६१ तील ३१ अशीं ह्या पत्रांची सालवारीनें गणना करितां येईल. विषयवारीनें गणना केली तर १७५० तील ३ पत्रांपैकी लेखांक १ दिल्लींतील पातशाहाशीं झालेल्या तहासंबंधीं आहे; लेखांक २ रघुनाथरावाच्या १७५० तील खानदेश-गुजराथेंतील मोहिमेसंबंधीं आहे व लेखांक २६ शाहूराजाच्या नांवानें बाळाजी बाजीरावाने पाठविलेलें आज्ञापत्र आहे. हें आज्ञापत्र शाहूच्या मृत्यूनंतर लिहिलेलें असून त्याच्यावर शाहूराजाच्या नांवाचा शिक्का आहे; परंतु, ह्याच्याच जोडीला, काव्येतिहाससंग्रहांतील ३३४ वें पत्र आहे. हें ३३४ वें पत्र २९ सप्टेंबर १७५१ त लिहिलें आहे. असें असून त्याच्यावर शाहूराजाच्या नावाचा शिक्का आहे; १७५१ तील ११ पत्रें १७५१ त सलाबतजंग व नानासाहेब ह्यांच्यात झालेल्या झटापटींच्या अगोदरचीं आहेत. १७५२ तील एकहि पत्र नाहीं. १७५३ तील ७ पत्रांपैकीं लेखांक १४, १५, १६, १७, १८ हे लेखांक भालकीचा तह झाल्यानंतर नानासाहेब व बूसी ह्यांच्यांत उत्पन्न झालेल्या स्नेहविषयीं आहेत. व लेखांक २७, २८ रघुनाथराव गुजराथेहून थालनेरास आल्यावरचीं आहेत. १७५४ तील २० पत्रांपैकीं लेखांक १९, २०, २१, २२, २३, २४ हीं मुसाबुसी व सलाबतजंग ह्यांसंबंधीं आहेत. व लेखांक २९ पासून लेखांक ४२ सुद्धां रघुनाथरावांच्या १७५४ तील हिंदुस्थानांतील मोहिमेसंबंधीं आहेत. लेखांक ४१ त सफदरजंगच्या मृत्यूचें वर्तमान आहे. १७५५ तील ८ पत्रांपैकी लेखांक ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४९ व ५० हीं पत्रें रघुनाथराव व जयाप्पा रजपुताना व हिंदुस्थान ह्या प्रदेशांत असतांना लिहिलेलीं आहेत. लेखांक ४८ हें पत्र १७५५ तील नसून १७५८ तील आहे. ह्या पत्राचा सन चार आहे. दिल्लीस व दिल्लीभोंवतालच्या प्रांतांत पातशाहाच्या सिंहासनारोहणापासून सन मोजण्याची चाल असे. अलमगीर पातशाहा १७५४ च्या जुलैत सिंहासनारूढ झाला (पत्रें व यादी ३२ व keene.) त्यावेळीं सुहुर्सन खमसखमसैन होता. तेव्हांपासून चवथें साल म्हटलें म्हणजे समानखमसैन येतें. त्या सालच्या जमादिलावलांत हें पत्र लिहिलें आहे. जमादिलावलाच्या २० तारखेला अबदालीचा एलची दिल्लीच्या पातशाहाला भेटावयाला आला होता म्हणून पत्रकार लिहितो; त्याअर्थी हें पत्र २० तारखेनंतर लिहिलें आहे हें उघड आहे. तेव्हां ह्या पत्राची तारीख २१ जमादिलावल, सन चार म्हणजे समानखमसैन धरावी हें सयुक्तिक आहे. म्हणजे इ. स. १७५८ च्या १ फेब्रुवारीला हें पत्र लिहिलें असावें असें होतें. ही दुरस्त झालेली तारीख घेतली म्हणजे १०० व १०४ ह्या टिपा काढून टाकणें जरूर आहे. तसेंच १०२ टिपेंतील ५ व ६ ह्या ओळींतील 'हे' पासून 'गेला' पर्यंतचे वाक्य ह्याच टिपेंतील १७५७ सालासंबंधींच्या मजकुराच्या पुढें नेलें पाहिजे. १७५६ तील लेखांक १२० हें एकच पत्र आहे; तें गुजराथेंतील कांहीं गडबडीसंबंधीं आहे. ही गडबड झाल्यानंतर १७५६ च्या दस-यानंतर रघुनाथरावदादा व सदाशिव रामचंद्र गुजराथेंतील दंगा मोडण्यास गेले व पुढें लवकरच सदाशिव रामचंद्राला गुजराथेंत ठेवून रघुनाथरावदादा १७५७ च्या जानेवारींत माळव्यांत आले. (लेखांक ५२).