Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

परंतु, बोलणें हें क्षणिक व तात्पुरतें असतें, तेव्हां तपेच्या तपें जिचा व्यासंग केला ती इंग्रजी समयीं जिव्हाग्रावर नाचूं लागली, तर त्यासंबंधी नांवें ठेवूं नयेत, अशी या मंडळींच्या तर्फे कोणी विनंति करील, तेव्हां ह्या विनंतीला मान देणें सभ्यपणाला अनुचित होणार नाहीं. पण, ज्यांची रचना करण्यास अनेक वर्षांचा अवधि लागतो व ते कोणत्या भाषेंत लिहावे हें ठरविण्यास हवा तितका वेळ असतो, ते ग्रंथ किंवा निबंध लिहिण्याच्या कामीं इंग्रजीचा उपयोग देशाभिमानी विद्वान लोक करूं लागले. म्हणजे त्यांनाहि देशाभिमानाची व राष्ट्रत्वाची व्याप्ति कोठपर्यंत असते हें कळत नाहीं असें विधान करणें प्राप्त होतें. असे नसतें, तर त्यांनीं आपले ग्रंथ देशी भाषांत लिहिले असते. भाषा विचाराचें साधन आहे तेव्हां स्वभाषा स्वदेशांतील विचारी पुरुषांच्या विचारांचें साधन असावें हें उचित होय. हे विचारी लोक परभाषेंत आपले विचार प्रकट करूं लागले तर त्यांनीं स्वभाषेचा मोठा अक्षम्य अन्याय केला असे होतें. घरच्या गरीब माणसांची उपासमार करून बाहेरच्या श्रीमंतांना मेजवानी करणारा इसम स्वकीयांच्या व परकीयांच्या उपहासास मात्र पात्र होतो. असे गृहस्थ आपल्या देशांत गेल्या पंचायशी वर्षांत बरेच झाले. पैकीं कित्येकांची नावनिशी त्यांनीं केलेल्या कांहीं ग्रंथ व निबंध यांसह पुढील पिढ्याच्या स्मरणार्थ येथें देतों:-
( पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वर दिलेल्या सर्व गृहस्थांची जगांतील कोणत्याहि देशांत विचारवंतांत गणना होईल व एकदोघांची तर कदाचित् प्रतिभासंपन्न पुरुषांत गणना करावी लागेल. ह्या गृहस्थांनीं मराठींत ग्रंथरचना किंवा विचारप्रदर्शन काय केलें व इंग्रजींत काय केलें, हें पाहिले असतां, मराठीपेक्षा इंग्रजीकडेच ह्यांचा कल विशेष आहे हें दिसून येईल. ह्या सर्व गृहस्थांच्या लेखांत ग्रंथ ह्या संज्ञेस अंशतः पात्र अशीं चारच पुस्तके आहेत, (१) कुंट्यांचीं आर्य संस्कृतीचीं स्थित्यंतरें, (२) रानड्यांचा मराठ्यांचा इतिहास, (३) डॉ. भांडारकरांचा दख्खनचा इतिहास व (४) रा. टिळकांचें आर्यांचें मूलस्थान. ह्या चारीं पुस्तकांत विचार व कल्पना ह्यांचे बरेंच प्रदर्शन झालें आहे. आतां, इतकें खरें आहे कीं त्या त्या शाखेंत युरोपांत जे पहिल्या प्रतीचे उत्तमोत्तम ग्रंथ झालें आहेत त्यांच्याशीं ह्या ग्रंथांच्यानें बरोबरी करवणार नाहीं. परंतु त्या त्या शाखेंतील ब-याच ग्रंथांत ह्यांची गणना करावी लागेल हें उघड आहे. उदाहरणार्थ, डॉ. भांडारकरांचा दख्खनचा इतिहास घ्या. ह्या इतिहासाची योग्यता डॉ. प्लीट्कृत कर्नाटकांतील राजघराणीं ह्या पुस्तकापेक्षां किंचित् जास्त आहे. डॉ. भांडारकरांचें पुस्तक ताम्रपटें व शिलालेख ह्यांच्याशीं ज्याचा परिचय झाला आहे असा कोणीही गृहस्थ लिहिता. एक दोन क्लृप्त्या मात्र डॉ. भांडारकरांनीं ह्यां पुस्तकांत नवीन काढिलेल्या आहेत. टॉलेमीचा Baleoeuros व कोल्हापूरचा विळिबायकूर हे एकच पुरुष होत, ही डॉक्टरांची कल्पना मोठी अपूर्व आहे व तिचें सर्व श्रेय त्यांनाच आहे. अशा स्वतंत्र कल्पना व कोट्या ह्या चारी पुस्तकांत आहेत. परंतु ह्या कल्पना व कोट्या ह्या देशांतील भाषेस काय होत? हे चारी ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत व ह्यांचा उपयोग महाराष्ट्रांतील लोकांपेक्षां युरोपातील लोकांना जास्त होणार आहे. हेच ग्रंथ ह्या लोकांनीं मराठींत लिहिले असते, तर त्यांच्या अपूर्वतेमुळे परकी लोकांना ते भाषान्तर करून समजून घ्यावे लागते व मराठींत चार विचारप्रचुर ग्रंथांची भर पडती. मराठींत लिहिले जाते तर हे ग्रंथ यूरोपांतील विद्वानांना कळावयास अवधि लागता इतकेच. ह्यापेक्षा मराठीत लिहिण्यापासून जास्त तोटा नव्हता. परंतु मराठीचा संकोच होण्याची चोहोकडून जर सध्या वेळ आलेली आहे, तर त्याच्या आड ह्या पुढारी मंडळीनें तरी काय म्हणून यावें? आर्य संस्कृतीचीं स्थित्यंतरे, हा ग्रंथ बक्षिसाकरितां लिहिला होता, अशी कुंट्यांच्या तर्फेनें सबब आणतां येईल. परंतु ऋषि हें काव्य व इंग्रजी वर्तमानपत्र कुंट्यांनी इंग्रजींत कशाकरतां लिहिलें तें समजत नाहीं. तसेच, महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांनी गिबनचा सारांश इंग्रजीत लिहिल्यानें, त्यांना स्वतः ला इंग्रजी लिहिण्याचा चांगला सराव झाला, ह्यापलीकडे इंग्रजांच्या किंवा मराठ्यांच्या विचारांवरती ह्या सारांशाचा कांहीं परिणाम झाला आहे असें दिसत नाहीं. टिळकांनीं आपले दोन्ही ग्रंथ मराठींत लिहिले असते तर काय बिघडते? ह्या ग्रंथांना जर काहीं किंमत असती-व ती आहे ह्यांत संशय नाहीं. तर कांहीं युरोपियन लोकांना जरूर असल्यास कदाचित् मराठी शिकावे लागतें इतकेंच.