Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
असले कुधारक ह्या देशांत इ. स. १३१८ पासून १६५६ पर्यंत बहुतं निर्माण झाले. फारशी भाषा लिहिण्यांत व बोलण्यांत मुसुलमान लोकांनाहि ते मागें टाकूं लागले. मुसुलमानी धर्मांत मूर्तिपूजा नाहीं, चातुर्वर्ण्य नाहीं अनेक दैवते नाहींत, तेव्हां तीं आपल्या देशांतील धर्मांतहि नसावीं असें या लोकांस वाटूं लागलें व त्याप्रमाणें ते उपदेशहि करूं लागले. चातुर्वर्ण्य नाहींसे झालें पाहिजे, मूर्तिपूजा मोडली पाहिजे व सर्वत्र एकेश्वरी मत प्रचलित झाले पाहिजे, म्हणजे आपला हा देश वर येईल, असा टाहो त्यानीं फारशी भाषेंत चालविला. आपला हा देश वर यावा, हा बोलण्याचा पेंच मात्र त्यांनी कधीं सोडिला नाही; बाकी सर्व कृति त्यांनीं अशी ठेविली कीं, त्यानें भाषा, धर्म व आचार समूळ नष्ट व्हावे. स्वभाषेच्या, स्वधर्माच्या व स्वाचाराच्या निदेनें भरलेलीं भाषणें फारशींतून करण्यानें त्यांना एक वैयक्तिक फायदा असे. तो हा कीं मुसुलमान राज्यकर्त्यांना हे लोक आपल्या मताचे आहेत व कधीं काळीं आपल्या धर्माचेहि होतील, निदान आपल्या राज्याच्या चिरस्थायित्वाचे स्तंभ होतील, असा भ्रम पडे. आणि ह्या भ्रमावर ते त्यांना दरबारीं लहानमोठ्या नोक-या देत. दरबारांत मानमान्यता झाल्यामुळें, देशांतील लोकांनाहि त्यांचा वचक वाटे. असले कांहीं चमत्कारिक कुधारक त्या काळीं फार पिकले होते. दादो नर्सो काळे, दियानतराव, गांगो बाहमणी, वगैरें नावें ह्या तीनशें वर्षांत जीं मुसुलमानी कागदपत्रांतून व तवारिखांतून अधूनमधून चमकतात तीं ह्या कुधारकाचींच होत. फारशी पेहराव, फारशी शब्द, फारशी पीर, फारशी कल्पना, ह्यांचा जो प्रादुर्भाव महाराष्ट्रांत त्यावेळीं झाला, त्याला ह्या कुधारकांची मदत बरीच झाली. परंतु, कुधारकांच्या ह्या मेहनतीनें देश वर यावयाचा तो दिवसेंदिवस खालींच जाऊं लागला. पडता काळ आला असतां राष्ट्रत्वाचीं प्रधान अंगे जीं स्वभाषा, स्वधर्म, व स्वाचार त्यांचें संगोपन व वर्धन करणें हेंच परराज्याखालीं राष्ट्रत्वाचीं बीजें कायम रुचत ठेवण्याचें मुख्य इंगित आहे. स्वभाषा, स्वधर्म व स्वाचार ह्यांच्या पवित्र नांवाखालीं लोकांत जो सुखैकप्रियतेचा, आलस्याचा, विभक्ततेचा व देशकार्यपराङमुखतेचा संचार झालेला असतो व ज्याच्यांमुळे देश प्रथम हातचा गेलेला असतो. त्या संचाराला तोडगा करणें सर्वथा योग्य व इष्ट आहे. परंतु, संचाराला तोडगा न करतां मूळ धर्माला व आचाराला दुखापत करणें केव्हाहि गुणकारक नसतें. त्यावेळच्या कुधारकांचा व राज्यकर्त्यांचा, मूळ धर्माला, मूळ भाषेला व मूळ आचाराला नष्ट करण्याचा विचार होता. तो महाराष्ट्रांतील सुधारकांनीं, साधूंनी व ग्रंथकारांनीं हाणून पाडिला. मूर्ति म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा आहेत, चातुर्वर्ण्यातील सर्व लोक देव आणि धर्म ह्यांच्यापुढें सारखे आहेत, एकच ब्रह्म सर्वत्र पसरलें आहे, ह्या तीन सिद्धांतांचें निरूपण ह्या सुधारक साधूंनी व ग्रथंकारांनीं योग्य त-हेनें केलें. हे तिन्ही सिद्धान्त आपल्या हिंदुधर्माचे मुख्य स्तंभ आहेत, हें त्यांनीं नानाप्रकारांनी लोकांच्या मनांवर बिंबविले. जात मोडून सबगोलंकार करावा, मूर्ति फोडून झुगारून द्याव्या, देवळें जमीनदोस्त करावीं, वगैरे वात्रट विचार त्यांच्या लेखांत कोठेंहि नाहींत. जात मोडून टाकावी, दगडाचे देव फेकून द्यावे, महाराशीं ब्राह्मणांनीं अन्नव्यवहार करावा, वगैरे अपसिद्धान्तांचे आरोप ह्या साधूंवर कैलासवासी म. गो. रानडे यांनीं आपल्या इतिहासांत केले आहेत. परंतु ह्या वेळची सामाजिक, धार्मिक वगैरे स्थिति रानड्यांस जशी कळावी तशी प्रायः कळली नव्हती. ह्या साधूंचे ग्रंथ मीं लक्ष्यपूर्वक वाचले आहेत. हिंदुधर्माला सोडण्याचा त्यांचा विचार होता, असें त्यांच्या ग्रंथांवरून दिसत नाहीं. दगड म्हणून दगडाला भजणें, किंवा महार म्हणून माणसाला छळणें, किंवा ब्राह्मण म्हणून इतर वर्णांचा धिःकार करणें मनुष्यमात्राला सर्वथा लाजिरवाणें आहे, असें या ग्रंथकारांनीं इतर संस्कृत ग्रंथकारांप्रमाणेंच म्हटलें आहे. परंतु रानडे म्हणतात तसली सुधारणा त्यांच्या ग्रंथांत कोठें दिसत नाहीं. ह्या साधूंना देव, धर्म, देवळें, जाती व स्वभाषा, हीं बिलकुल सोडावयाचीं नव्हतीं. व प्रस्तुतच्या कित्येक विद्वान् देशाभिमान्यांप्रमाणें परभाषेंत ग्रंथ व भाषणें करून स्वदेश वर नेण्याचें ढोंगहि करावयाचें नव्हतें. रानड्यांच्या ग्रंथांतील हें संतांवरील विवेचन अगदीं निराधार व शोधकपणास अयोग्य असें झालेलें आहे; महाराष्ट्रधर्माचा खरा अर्थहि त्यांच्या ध्यानांत आला नाहीं; व संतांच्या स्वप्नींहि नव्हते ते विचार त्यांच्यावर लादले गेले आहेत. संतांचे मूळ ग्रंथ विचारी लोक जसजसे सखोल बुद्धीनें वाचतील तसतसे माझ्यासारखेंच त्यांचेंहि मत होईल अशी माझी खात्री आहे.