Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

आतां मराठीत कोणत्या प्रकारचे फारशी शब्द विशेष शिरले तें पाहूं. ब्राह्मणी राज्याच्या पहिल्या अमदानींत महाराष्ट्रांत मुसुलमान सरासरी एक लाखापेक्षां जास्त नसावे. देशांत शांतता राखण्याकरितां आणिलेलें सैन्य बहुतेक मुसुलमानांचेंच होतें. तसेंच काजी, मुन्सफ, कमावीसदार, दिवाण वगैरे दरबारी, मुलकी व दिवाणी हुद्देदार मुसुलमानच होते. शिवाय कांहीं निरनिराळ्या धंद्यांचे म्हणजे तबीवी, सराफी, मुजावरी, वगैरे धंद्यांचेहि लोक मुसुलमानच होते. अशी ही मुसुलमानांची छावणी देशांतील राज्यकारभार चालविण्यास, शांतता ठेवण्यास व स्वकीयांच्या लहान मोठ्या गरजा भागविण्यास एक लाखापेक्षां फारशी जास्त नसावी.

ह्या एक लाख लोकांपैकीं सत्तर ऐशी हजार आडमुठे शिपाई व खालच्या दर्जाचे सेवक वगळले म्हणजे बाकी राहिलेले जे वीस पंचवीस हजार वरिष्ठ प्रतीचे संभावित मुसुलमान त्यांना महाराष्ट्रांत राज्य चालवावयाचें होतें. राज्य चालवावयाचें म्हणजे जमीन व धंदे ह्यांच्या वरील कर गोळा करावयाचा, आणि तत्प्रीत्यर्थ न्याय द्यावयाचा व बंदोबस्त ठेवावयाचा होता. न्याय देणें व बंदोबस्त ठेवणें ही दोन कामें कर उकळण्याच्या मुख्य कृत्याला केवळ आनुषंगिक होती. ह्या कर गोळा करण्याच्या कृत्याशिवाय दुसरें मोठे कृत्य जें मुसुलमानांना करावयाचें होतें व जे आपल्या येण्याचें ते मुख्य कारण सांगत तें हिंदुलोकांना बाटविण्याचें होतें. ह्या व्यतिरिक्त तिसरें काम ह्या म्लेच्छ लोकांना कोणतेंच कर्तव्य नव्हतें. वस्तुस्थिति अशी होती की, त्या वेळच्या हिंदुलोकांची संस्कृति मुसुलमान लोकांच्या संस्कृतीहून श्रेष्ठ होती. मुसुलमान लोकांना माहीत नव्हते असे धंदे, कला, शास्त्रें, विद्या ह्या देशांत अनेक होत्या. आचारानें ह्या देशांतील लोक मुसुलमानांपेक्षां स्वच्छ व श्रेष्ठ होते तर्कशास्त्र, ज्योतिषविद्या, वेदान्त, वगैरे विचारांच्या प्रदेशांतहि मुसुलमानाच्या वर मराठ्यांची कडी होती. फलज्योतिषावर मराठ्यांचा जितका विश्वास होता तितकाच मुसुलमानाचाहि होता. एका मात्र बाबींत मराठ्यांचा मोठा कमीपणा होता. यादवांच्या अमदानींत म्हणजे इसवीच्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धांत मराठ्याचे सर्व लक्ष परमार्थाच्या नांवावर ऐहिक उपभोग घेण्याकडे लागले होतें. तेराव्या शतकातील अत्यंत मोठा असा मानिलेला ग्रंथ म्हटला म्हणजे हेमाद्रीचा चतुर्वर्गचिंतामणि हा होय. ह्या ग्रंथात दर दिवसाला व दर तिथीला दहा दहा पांच पाचं व्रतें सांगितली आहेत व त्या त्या व्रताला कोणत्या देवाची कोणतें पक्वान्न करून व किती ब्राह्मण घालून प्रीति संपादन करावी ह्याचा स्मृति, श्रुति व पुराणें ह्यांतून उतरे देऊन, गंभीरपणे निर्णय केला आहे. हेमाद्रीच्या व्रतखंडावरून पहातां वर्षाच्या ३६५ दिवसांची एकंदर २००० व्रतें व्हावीं असा अंदाज होतो. लोकांचीं व्रतें करण्याकडे, ब्राह्मण-भोजनें घालण्याकडे, पक्वान्नें खाण्याकडे व तद्वारां मोक्ष मिळतो अशा मतांकडे अतोनात प्रवृत्ति असल्याविना हेमाद्रीनें हीं व्रतें, केवळ पांडित्य दाखविण्याकरितां किंवा करमणूक करण्याकरितां, सांगितली असतील, हें संभवत नाहीं. तेव्हां व्रतें करणें व पक्वान्नें खाणे ह्या दोन गोष्टी लोकांच्या आंगवळणी त्याकाली फार पडल्या होत्या हें निश्चित आहे. पक्वान्नं आणि व्रत ह्यांची फारकत हेमाद्रीनें एकाहि ठिकाणीं केली नाहीं. एवढीं दोन हजार व्रतें ज्या ग्रंथांत सांगितलीं आहेत असा पृथ्वीवरील दुस-या कोणत्याहि भाषेंत कोणत्याहि काळीं एकहि ग्रंथ अद्यापपर्यंत निर्माण झाला नाहीं! व्रतें करण्याकडे ज्याअर्थी महाराष्ट्रांतील लोकांची तेराव्या शतकांत एवढी बेसुमार प्रवृत्ति झाली होती त्याअर्थी त्यापासून दोनच अनुमानें स्थूलमानाने करणें रास्त आहे. एक, लोकांजवळ पैसा अतोनात झाला होता, व दुसरें, व्रतांप्रीत्यर्थ खर्चिण्यास लोकांजवळ मुबलक वेळ होता. ह्या दुस-या अनुमानाचा अर्थ असा होतो कीं, राष्ट्रांतील सुखवस्तू लोकांना व त्यांचे लहान प्रमाणावर अनुकरण करणा-यांना कष्टप्रचुर असे मर्दुमकीचे, यातायातीचे, मेहनतीचे, लष्करी व इतर धंदे करण्यास फुरसत नव्हती. अशी वस्तुस्थिति असल्यावर, म्हणजे परशत्रूपासून व अंतःशत्रूंपासून संरक्षण होण्यास कराव्या लागणा-या मेहनतींपासून लोक परावृत्त झाल्यावर आणि अशा व्रतैकदृष्टि किंवा सुखैकदृष्टि लोकांच्या हातीं मुबलक पैसा असल्यावर, त्यांच्याकडे बुभुक्षु, मेहनती, साहसी व निर्धन अशा लोकांचे लक्ष जावें ह्यांत अजब असें कांहींच नाहीं. ही जशी वस्तुस्थिति नसती, तर संस्कृतीनें कोणत्याहि प्रकारें श्रेष्ठ नसणा-या मुसुलमानांना त्यावेळी मराठ्यांना जिंकतांच आलें नसतें. मराठे जातीचे शूर नव्हते अशीहि स्थिति नव्हती. मराठ्यांच्याकडून माळव्यापासून रामेश्वरापर्यंतचे प्रांत इसवी सन १२४० च्या सुमाराला सिंघणानें जिंकविले. सतराव्या शतकांत जसा शिवाजी तसा तेराव्या शतकांत हा सिंघण झाला. सिंघणाला मरून ५० वर्षे झालीं नाहींत तों मुसुलमानांच्याकडून मराठ्यांचा पराजय होतो. अर्थात् हा असा चमत्कार होण्यास मराठ्यांच्या शीलांत व चालीरीतींत काहीं विलक्षण फरक पडला असला पाहिजे. हा फरक कोणता तें हेमाद्रीच्या व्रतखंडावरून स्पष्ट ओळखता येते सिंघणादि वीरांच्या विजयानें लोक अत्यंत धनसंपन्न होऊन, व्रतें, उद्यापनें करण्याच्या मिषानें सुखैकपरायण व विलासनिमग्र झाले. मराठ्यांच्यापेक्षां मुसुलमानांजवळ कांहीं निराळीं हत्यारें होतीं किंवा मराठ्यांना माहीत नव्हत्या अशा व्यूहरचना मुसुलमान करीत असत, असें म्हणण्यालाहीं काहीं एक प्रमाण नाहीं. दोघांहि जवळ सारखींच हत्यारें होतीं, अशी ज्या अर्थी स्थिति होती त्याअर्थी सुखैकपरायणता व विलासमग्रता हींच मराठ्यांच्या नाशाचीं तेराव्या शतकांत कारणे होतीं. परमार्थाच्या नावाखालीं ही जी सुखैकपरायणवृत्ति नांदत होती तिचा फायदा घेऊन मुसुलमानांनीं मराठ्यांचा पराभव केला.