Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
फारशीच्या व मराठीच्या सान्निध्याचा पहिला विशेष प्रयोगाच्या ग्रहणाचा आहे ह्या विशेषानें कित्येक नामांना कित्येक क्रियापदें फारशीच्या, धर्तीवर लावण्याचा प्रघात पडला. इंग्रजीच्या धर्तीवरहि आपण कित्येक प्रयोग सध्यां असेच करूं लागलों आहों. To take advantage of ह्या इंग्रजी प्रयोगाचें मराठींत चा फायदा घेणें असें भाषान्तर करतात व हा प्रयोग मराठींत सध्या रूढ झाला आहे. ह्या परदेशी प्रयोगांच्या मुळें भाषेच्या रूपांत तर फरक होतोच; परंतु मुख्य फरक कल्पनेच्या प्रांतांत होतो. उदाहरणार्थ, उडी मारणें हा प्रयोग घेऊं संस्कृतांत उड्ड्यते ह्या क्रियापदानें ह्या प्रयोगाचा अर्थ प्रदर्शित होतो. अगर, उड्डाणं कुरुते, असाहि संस्कृत प्रयोग होतो. जुन्या मराठींत उड्डाण करतो असा प्रयोग आहे. उडी घेणें असाहि मराठींत एक प्रयोग आहे. परंतु, उडी मारणें हा प्रयोग फारशीचें मराठीला सान्निध्य होईतोंपर्यंत माहीत नव्हता. उडी म्हणजे उड्डाण ह्या कर्माचा मारणें म्हणजे प्रहार करणें ह्या क्रियेशीं संबंध जोडविण्याचा प्रघात फारशी प्रयोगांशीं परिचय होईतोंपर्यंत मराठींत नव्हता. तो फारशीवरून आपण मराठींत घेतला आहे. फारशींत हा प्रयोग कसा आला ह्या प्रश्नाचा शोध अलहिदा असल्यामुळें, ह्यांत जास्त खोल शिरत नाहीं.
मराठी व फारशी ह्यांच्या सान्निध्याचा दुसरा विशेष उद्गारवाचक शब्द, उभयान्वयी अव्ययें, पाठीमार्गे व पुढें लागणारीं शब्दयोगीं अव्ययें, क्रियाविशेषणें व सर्वनामें, ह्यांच्यासंबंधांचा आहे. ह्या विशेषानें भाषेच्या रूपांत वरच्याहिपेक्षां जास्त फरक झाला आहे. फारशींतून जे उद्गारवाचक शब्द मराठीत घेतले आहेत, त्यांनी मराठींतील पूर्वीच्या अबब, अहा, हरहर, धन्य, जी, इत्यादि उद्वारांत जास्त भर पडली आहे व त्यांच्यामुळें अनेक उद्वारांचे बारीक बारीक भेद पूर्वीपेक्षां जास्त सफाईनें व सूक्ष्मपणें प्रदर्शित करतां येतात. फारशी क्रियाविशेषणापासूनहि मराठीला हाच फायदा झाला आहे. परंतु नामांच्या पाठीमागें लागणा-या फारशी शब्दयोगी अव्ययांच्या योगानें मराठी भाषेच्या स्वभावांत बदल झाला आहे. दर साल दर सद्दे किंवा दर शेकडा पांच टक्के व्याज सुटतें ह्या वाक्यांचा अर्थ सालांत शंभर रुपयामागें पाच टक्के व्याज सुटतें, असा आहे. दर म्हणजे आंत हें शब्दयोगी अव्यय फारशींत इतर शब्दयोग्यांप्रमाणें नामाच्या पाठीमागें लावतात. दर रोज म्हणजे रोजीं; दर बाजार म्हणजे बाजारी; असा प्रयोग फारशींत होतो. दर रोज तीन आणे मजुरी देतों किंवा रोजी तीन आणे मजुरी देतों, असें दोन्ही प्रयोग मराठींत होतात. दर रोज ह्याबद्दल संस्कृतांत, महाराष्ट्रांत, व मराठींत दिवसे, दिसम्मि, दिवशीं असे प्रयोग होतात; म्हणजे सप्तमीचा प्रत्यय नामाच्या पुढें लागतो. मागें लागत नाहीं इंग्रजींत किंवा फारशींत in किंवा दर हीं शब्दयोगी अव्ययें नामाच्या पाठीमागें लागतात. येणेंप्रमाणें, शब्दयोगी अव्ययें, योजण्याची मराठींत जीं सार्वत्रिक चाल आहे तिच्या विरुद्ध दर हें शब्दयोगी अव्यय मराठींत योजिलें जाऊं लागलें आहे. हीच कथा ता ह्या फारशी शब्दयोगी अव्ययाची आहे. ता ह्या शब्दयोगी अव्ययाचा अर्थ फारशीत पर्यंत असा होतो. अज् मुंबई ता पुना, ह्या फारशी शब्दांचा अर्थ, मुंबईपासून पुण्यापर्यंत, असा आहे. ह्या ताचें ते, तो अशी रूपें मराठींत योजिली जातात. मुंबई ते पुणें पांच रुपये भाडें पडतें; ह्या पुस्तकाचे एक ते पांच भाग छापिले जातील; ह्या वाक्यांत ते ह्या शब्दयोग्याचा अर्थ पर्यंत असा आहे व तें ता ह्या फारशी शब्दयोग्याचा अपभ्रंश असून, फारशींतल्याप्रमाणें नामाच्या मागें लागतें फारशींतील बे चीहि अशीच त-हा आहे. बेदिल, बेवकूब, बेभरंवशाचा, बेइमानी, बेअक्कली, ह्या शब्दांत बे हें शब्दयोगी त्या त्या शब्दांच्या मागें फारशींतल्याप्रमाणें येतें. तो मनुष्य सवाई शिकंदर आहे किंवा सवाई बिलंदर आहे, ह्या वाक्यांचा अर्थ, तो मनुष्य शिकंदरासारखा किंवा बिलंदरासारखा आहे, असा होतो. येथें सवाई हें शब्दयोगी अव्यय फारशींतल्याप्रमाणें योजिलें आहे. देखील, बाजत्, बमय, गैर, ला, बिला, हीं अव्ययेंहि अशींच फारशींतल्याप्रमाणें जुन्या मराठी दरबारी लेखांत व सध्यांहि योजितात. दर व ता ह्या पूर्वगामी अव्ययांचा मराठींत दुस-या एका त-हेनें फाजील उपयोग होत असतो. मी दर दिवशीं चार कोस चालतों. ह्या वाक्यांत दर हें पूर्वगामी अव्यय योजून शिवाय दिवस ह्या शब्दाची सप्तमी योजिली आहे. पुण्यापासून ते मिरजेपर्यंत अडीचशें मैल अंतर आहे, येथें तो हें पूर्वगामी व पर्यंत हें पश्चाद्गामी अशीं दोन्ही शब्दयोगी अव्ययें आलीं आहेत. ह्या ठिकाणी तो व दर ह्या शब्दांचीं शक्ति काय आहे व त्यांचा मूळ प्रयोग कसा करीत असत, हें माहीत नसल्यामुळें बोलणारानें फारशी व मराठी अशीं दोन्ही अव्ययें योजिलीं आहेत. फारशी प्रयोग अत्यंत रूढ झाल्यानें तो सोडवेना व मूळ मराठींतल्याप्रमाणें बोलण्याचा स्वभाव सुटेना, असा चमत्कार ह्या फाजील प्रयोगांत झाला आहे. परंतु ह्या फाजील प्रयोगांत एक मोठं गूढ इंगित सांठलेलें आहे. तें हें कीं, इंग्रजीप्रमाणें किंवा फारशीप्रमाणें पूर्वगामी शब्दयोगी अव्ययांचा मराठीला जातीचाच कंटाळा आहे. शब्दाचें सामान्य रूप करून पश्चाद्गामी शब्दयोगी अव्यय त्या सामान्यरूपापुढें लटकावून देण्याचा मराठीचा आनुवंशिक स्वभाव आहे. परंतु ह्यालाहि एक अपवाद आहे. मराठींत भर म्हणून एक शब्दयोगी अव्यय फारशींतून आलेलें आहे. फारशींत बर म्हणून एक पूर्वगामी शब्दयोगी आहे; त्यापासून हें मराठी भर अपभ्रंशानें आले आहे. ह्या भर अव्ययाचा, शब्दाचें सामान्यरूप न होतां, उपयोग होतो. जसें घरभर, गुडघाभर, पायलीभर, हौदभर, इत्यादि.