Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[२४१]                                                                               श्री.                                                                          

विज्ञापना ऐसीजे. येथील क्षणिक कारभार. घटकेंत मनसुबे फिरतात, पूर्वी एक वेळ रवानगी करण्याची मोठी जलदी. दुसरे दिवशीं निघावें येथपर्यंत आलें. मुहूर्त पहाण्याची देखील फुरसत नाहीं ! ऐशी निकड ! वेळ गेली ह्मणजे आणखीच विचार. यास्तव रघोत्तमराव यांस ह्मटलें एक दोन वेळ हेंच घोळून नंतर निश्चय होईल तो सांगावा, ह्मणजे श्रीमंतांस लिहून पाठवीन. दोन दिवस घाटाघाट होऊन मीरअलम यांसही नबाबांनीं लिहून पाठविलें कीं, असदअल्लीखान व मुसारेमू अलीज्याहचे ताकुबावर जातील, इंग्रजी पलटणें व पागावाले यांनीं इकडे यावें, गोविंदराव कृष्ण यांची रवानगी लवकर करतो, हे तुह्मापाशीं येतील, तुह्मीं ते मिळोन पुण्यास जावें. हें खचित मीर अलम यास लिहिलें गेलें. आतां श्रीमंतास आपण लिहावें ऐसें मशारनिल्हे यांचे सांगण्यांत खचित आलें. तेव्हां स्वामीकडे लिहून पाठविलें. आठ दिवसाआंत येथून निघणें होईल. र।। छ १६ रबिलाखर. हे विज्ञापना.

शालिवाहन शके १७१७ आश्विन शुद्ध १५ मंगळवार प्रथम घटिकारात्रीं माधवराव नारायण पंतप्रधान कैलासवासी जाले. सोळावे रबिलाखरपर्यंत पत्रांची रवानगी केली. छ १९ तेरखेस पुण्याचें पत्र येथें पोहोंचलें. त्यांत लिहिलें आहे जे :-छ ११ माहे रबिलाखर आश्विन शुद्ध १२ रविवार शके १७१७ राक्षसनाम संवत्सर सन फसली १२०५.

सीत तिसैन ते दिवशीं श्रीमंतांस ज्वरांशांत वायू जाहला होता. प्रात: काळीं, गणपतीचे दिवानखान्यावर रंगमहाल आहे, तेथें निद्रेचें स्थान, तेथें गेले. पलंगावर बसले होते. वायूचे भिरडींत काय मनास वाटलें. न कळे, पलंगावरून उठोन दक्षणेकडील खिडकीत उभे राहिले. खिजमतगार यानें शालेस हात लाविला कीं, येथें उभें रहाणें ठीक नाहीं. तों एकाएकींच येथून उडी टाकिली. खालीं दीड भाला खोल कारंजी हौद आहे, तेथें कांठावर पडून आंत पडले. उजवी मांडी मोडून हाड बाहेर निघालें. दांताची कवळी पडली. नाकावाटें रक्त निघालें. तेथून उचलून राजश्री नानांनीं ऐनेमहालांत नेलें. तबीब आणून, हाड बसवून टाके देऊन शेक केला. चहूं घटकेनंतर शुद्धीवर येऊन डोळे उघडले. वायूचा प्रकोप होताच, कांहीं सावध होऊन बोलत; कांहीं वेळ भ्रंश होऊन बोलत. छ १३ रबिलाखर आश्विन शुद्ध १४ सात घटिकानंतर पौर्णिमा मंगळवार ते दिवशीं प्रथम घटिका रात्रीं माधवराव नारायण पंतप्रधान कैलासवासी जाले, ह्मणोन बाळाजी रघुनाथ व केशवराव कोंडाजी यांचें पत्र आलें. शालिवाहनशके १६९६ जयनामसंवत्सर अधिक वैशाखमास शुद्ध ७ मु।। पुरंदर येथें जन्म जाहला होता. शके १७१७ आश्विन शुद्ध १४ सह पौर्णिमासमेत बेविसावे वर्षी कैलासवासी जाले. या तारखेपासून पत्रें लिहिणें बंद. येणेंप्रमाणें मु।। हैदराबाद येथें वर्तमान आलें. हे करार.



****************************************** समाप्त.*****************************************