Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
त्यास, साबाजी भोसले गंगाथडीस धामधूम करीत होते. त्यांचे पारपत्यास दादासाहेबीं त्रिंबकराव मामाबरोबर फौज देऊन पाठविले. त्याणीं भोसले यांस सामील करून घेऊन पुरंदरच्या मनसुब्यास सामील जाहले. हे वर्तमान दादासाहेबांस कळतांच माघारे फिरोन दरमजल कृष्णातीरास आले. निजामअल्लीखान फौजसुध्दा येऊन मामास सामील जाहले. दादासाहेब पंढरपुरास गेले. त्रिंबकराव मामा फौज दहा पंधरा हजार घेऊन, नवाब भोसले यांस मागें टाकून, आपण जाऊन लढाई होता मामास धरून नेले. तेव्हां फौज पळों लागली. त्यास, राजश्री हरिपंत याणीं हिम्मत धरून, थोर धाडस करून, फौज व सरदार जमा करून, त्यांचें मनोधारण बहुता रीतीनें सरदारी सावरून व साबाजी भोजले यांस भेटून पुढें आले. दादासाहेब दरमजल बऱ्हाणपुरास गेले. त्यांस सर्वांचे पालग्रहण करावयाकरितां शके १६९५ मध्ये स्वामींनी अवतार घेतला. हे संतोषाचें वर्तमान सरदार व फौजेस कळोन दादासाहेबापासोन निघोन हरिपंत यांस भेटले. दादासाहेब दरमजल नर्मदातीरास जाऊन पार गेले. तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांच्या भेटी जाल्या. त्याजवर हरिपंत फौजसुध्दां नर्मदा पार गेले. दादासाहेबाच्या समजाविशीचा मजकूर करून त्यास घेऊन बेरूळास आले. इकडून नाना व सखारामपंत आले. त्यास, दादासाहेबास संशय होऊन माघारे फिरोन दरमजल गुजराथेस गेले. पाठीवर हरिपंत व शिंदे व होळकर गेले. लढाई होऊन ते सडे भावनगरास जाऊन जहाजांत बसोन मुंबईस गेले. हरीपंत व उभयता सरदार देशीं आले. त्यास, श्रीमंत भाऊसाहेबांचे नार्वे तोतया करेऱ्यास निर्माण जाला. त्यास आणून कैदेस ठेविला असतां रत्नागिरीस फितूर करून बळाऊन कोंकणचे किल्ले आक्रमिले. तेव्हां स्वामींनी महादजी शिंदे व भीवराव यशवंत पानसी यांस पाठवून तोतयाचें पारपत्य केले. त्यास, सन तीसा सबैनांत दादासाहेबास इंग्रेज घेऊन, घाटमाथा येऊन, तळेगाव पावेतों आले. तेव्हां स्वामींनी नाना व सखारामपंत व शिंदे व होळकर यांस पाठविले. लढाई करून इंग्रेज जेर झाला तेव्हा तह करून मुंबईस गेला. दादासाहेबीं महादजी शिंदे यांचे विद्यमानें गंगातीरीं राहण्याचा करार केला. शिंदे यांही फौज व हरी बाबाजी बरोबर देऊन रवाना केले. त्यास, हरी बाबाजीपासून कांही अमर्यादा जाली. तेव्हां दादासाहेबांनी त्याचे पारपत्य करून दरमजल सुरतेस गेले. याजवर गाडर इंग्रेज कलकत्यास खुष्कीनें सुरतेस गेला. तेथून वसईस जाऊन किल्ल्यास मोर्चे देऊन बसला. तेव्हां सरकारांतून रामचंद्र गणेश व बाजी गोविंद यांस फौजसुध्दा पाठविले. त्यांणी वसईस जाऊन उपराळा करावा. त्यासी, गाडर इंग्रेज यांणीं गोखर्व्याचे दादरावरून मार्ग धरून बसला. तेथे लढाई पाडिली. मुंबईहून जहाजावर तोफा वगैरे लढाईचा सरंजाम आणून मोर्चे देऊन किल्ला घेतला. गाडराचे व सरकारचे फौजेचे झुंज होता रामचंद्र गणेश कामास आले. त्याजवर गाडर हावभरी होऊन दरकूच बोरघाटास येऊन खंडाळयावर राहिला. हरीपंत फौजसुध्दा कोंकणात होते. ते वर घाटीं येऊन अलीकडे खंडाळे याजवर पांच सात कोशांचे तफावतीनें राहिले. तेथून सडे स्वारीनें जाऊन तोफा लागू करून गोळे त्याजवर टाकीत होते. त्यास, खंडाळे तळघाटांत अडचणीची जागा; फौजेचा उपाय न चाले; परंतु महिना दोन महिने याप्रमाणे होते. त्यास, दाणावैरण इंग्रजास कोंकणातील येत होते व मुंबईहून जिन्नस सामान येत असे. याजकरितां हरीपंत यांणी तुकोजी होळकर व परशराम रामचंद्र फौजसुध्दां दुसरे घाटाने खाली पाठविले. त्यांणी जाऊन इंग्रजाचा दाणावैरण बंद केली. तेव्हां इंग्रजांस महागाईचा पेंच पडला. ते समयीं छबिन्याचे लोकांची नजर चुकवून रात्रीस कूच करून जाऊन घाटाखाली खालापुरास जाऊन मुक्काम केला. ते समयीं हरीपंत फौजसुध्दा घाट उतरून त्याचे पाठीवर पाऊण कोसाचे तफावतीनें रात्रीस उभे राहिले. इंग्रजांनी प्रहर रात्र राहतांच चंद्र सविसाचे रविलाखरी कूच करून चालिला. तेव्हां हरीपंत व सरदार व गारदी लोक व हशम यांणी लगट करून झुंजाचे तोंड लागलें, चिकाटी बसली, व तुकोजी होळकर व परशरामपंत यांणी अघाडीस तोंड लाविले. इंग्रज झुंज करीत करीत तीन कोस चौक गांव आहे तेथें गेला. तेथून मध्यरात्रीस चंद्र अठ्ठाविसाचे रविलाखरी कूच करून चालिला. ते समयीं सरकारच्या लोकांनी निकड करून झुंजाचें तोंड लाविले. तोफांची व बाणांची मारगिरी करून इंग्रजास जरबेस आणून शिकस्त केला. गाडर हिमतीचा माणूस, लढाईचा चांगला जंगी, सामान कवाइती फार चांगले, म्हणोन मोठे कसबानीं पनवेलीस जाऊन पोंचले. त्याचे लोक फार पडले व जखमी जाले.