Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

१२. संभाजीच्या व मानाजीच्या दुहीमुळे सिद्दी सात, सिद्दी संबूळ वगैरे हबशांचें पारिपत्य होण्याचें काम जें तहकूब झालें होतें, तें नवदरें येथील तहानें पुनः जारीनें सुरू होण्याला सवड झाली. संभाजीला व मानाजीला विवक्षित प्रांत व विवक्षित अंमल मिळाल्यामुळें आपसांत दुही होऊन इंग्रज, फिरंगी, शामळ व सावंत वगैरे शत्रूंना सवलत मिळत असे ती बंद झाली. १७३५ च्या एप्रिलांतील नवदरें येथील तहाच्या कालापासून पुढें दीड वर्ष गोवळकोटास मराठे मोर्चे लावून बसले होते. १७३५ च्या आगस्टांत सूर्याजी चव्हाण कोकणराव ह्यास गोवळपोटाच्या कामगिरीस पाठविलें होतें (रोजनिशी, रकाना ६७). १७३५ च्या जूनांत सिद्दी सातानें अगदीं मर्यादा सोडून मराठ्यांच्या प्रांताला बेसुमार उपद्रव देण्याचा उपक्रम स्वीकारला (खंड ३. ले. २७०). संभाजी आंग्र्यानें हबशाला शासनाक्रान्त करण्याचा बेत केला होता, परंतु तो त्याचा बेत मनांतल्या मनांतच राहिला असें दिसतें. मानाजीचा द्वेष व स्पर्धा करण्यांतच संभाजीचा बहुतेक हुरूप आटून गेला. हबशानें उपद्व्याप अत्यंत केला आहे असें ऐकून चिमाजी अप्पा १७३६ च्या मार्चात कोंकणांत उतरला व रेवासेजवळ चरई येथें सिद्दी साताचा उद्ध्वंस १९ एप्रिल १७३६ त करता झाला. उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबहि ह्या लढाईंत ठार झाला (शकावली, पृ. ७३) चिमाजी अप्पा कोंकणांतून १७३६ च्या मेंत वरघाटीं आल्यावर, १७३६ च्या आक्टोबरांत उदाजी पवारानें गोवळकोटाची मोर्चेबंदी चालविली होती (रोजनिशी, रकाना ७०). परंतु आतां हबशांच्या अंगांत विशेष जोर राहिला नव्हता. जंजि-यांत १७३३ त दोन पक्ष पडले होते हें मागें सांगितलेंच आहेः- सिद्दी अबदुल रहिमान ह्याचा एक पक्ष व सिद्दी अंबर, सिद्दी संबूल व सिद्दी सात ह्यांचा दुसरा पक्ष. पैकीं ह्या दुस-या पक्षांतील सर्व मंडळी १७३६ सालांत पार होऊन, तो पक्ष अजिबात नष्ट झाला. अर्थात मराठ्यांचा आश्रित जो सिद्दी अबदुल रहिमान तोच तेवढा एकटा राहिल्यामुळें १७३३ तील तहाचीं कलमें अमलांत येण्यास कोणताच प्रतिबंध राहिला नाहीं. १७३७ त अबदुल रहिमानानें हा तह दुस-यांदा मान्य करून, मराठ्यांच्या संमतीनें जंजि-यांचें अधिपत्य स्वीकारलें. येणेंप्रमाणें १७३६ त ज्या लढाईचा प्रारंभ झाला व जींत शाहू महाराजांना इतर सर्व युद्धांपेक्षा विशेष काळजी वाटली, ती लढाई १७३७ त कायमची बंद झाली. अबदुल रहिमानानें १७३७ पासून १७४० पर्यंत सुखासमाधानानें राज्य केले तोंपर्यंत मराठ्यांना जंजि-याच्या सिद्दयांकडून काडीमात्रहि त्रास पोहोंचला नाहीं.