Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

सिद्दी संबूल व सिद्दी अंबर अफलानी हे दोघे खुद्द जंजि-यात होते. अंजनवेल, उंदेरी, विजयगड, गोवळकोट, मंडणगड व रायगड वगैरे सर्व गड कडेकोट तयारी करून मराठ्यांशीं सामना देण्यास सिद्ध झाले. शेखजीने बाजीरावास जंजि-यांत प्रवेश करण्यास खोकरीची वाट दाखविली. एवढें एक काम केल्यावर, पुढें चार महिने कोणतेंही काम आपल्या हातून होणार नाहीं असा शेखजीनें मध्येच बहाणा केला. हा बहाणा स्वतःचे महत्त्व वाढविण्याच्या इच्छेने केलेला असो, अगर प्रतिनिधि वगैरेच्या चिथावणीवरून केलेला असो, बाजीरावानें हाती घेतलेलें काम तडक चालविलें. १७३३ च्या २५ मे ला मंडणगड सर झाला. याच महिन्यांत बिरवाडी, अष्टमी, अश्राधार, आंतोणे, नागाठणें, तळें, घोसाळें, निजामपूर वगैरे महालांतही अंमल बसला. श्रीपतराव प्रतिनिधीने १७३३ च्या ८ जूनास रायगड किल्ला घेतला. येणेप्रमाणें हबशाचें एक एक ठाणें सर होत होत, १७३३ च्या २२ आगस्टास, जंजिरा व अंजनवेल ह्याखेरीज बहुतेक सर्व ठाणीं बाजीरावाच्या ताब्यांत आलीं (रोजनिशी, रकाना ५९) जंजि-यांतील हबशांपैकीं सिद्दी रहीण यानें खुद्द बाजीरावाशीं जंजि-याच्या बाहेर येऊन सामाना केला; परंतु त्यातच तो ठार झाला (शकावली, पृष्ठ ६८) बाजीरावानें खुषकीवरून मोर्चे लावून जंजि-यावर तोफाचा मार चालविला व मानाजीनें समुद्रांतून बरीच मारगिरी केली. जंजि-यांतील हबशास सुरतेच्या सिद्दी मसुदाकडून व मुंबईच्या इंग्रजांकडून मदत मिळत होती, तीहि ह्याच सुमारास बंद झाली. ही बाहेरची मदत बंद झाल्याबरोबर सिद्दी अंबर, सिद्दी संबूल वगैरे जंजि-यांतील हबशीं अंजनवेल, गोवळकट वगैरे ठिकाणी पळून गेले व जंजिरा अबदुल रहिमान ह्याच्या तर्फेने बाजीरावाच्या ताब्यांत आला. अबदुल रहिमान ह्याला ५।। महालांचा वसूल देण्याचा व त्याच्याकडून रायगड, तुळे, घोसाळे, अवचितगड आणि बीरवाडी हे केल्ले मराठ्यांनी घेण्याचा संकेत ठरला. १७३३ च्या डिसेंबरांत ही अशी व्यवस्था करून बाजीराव साता-यास परत आला. 'सिद्दी अबदुल रहिमान हा तह करणप्यास सिद्ध झाला, जंजिरा हस्तगत झाला नाहीं' वगैरे वाक्यांचा प्रयोग राजश्री पारसनीस यांनीं ब्रहोंद्र स्वामीच्या चरित्रांत केला आहे. त्यावरून अबदुल रहिमान हा बाजीरावाचे म्हणणें हा वेळपर्यंत मान्य करीत नव्हता असा मतलब रा. पारसनीस यांच्या लिहिण्यांत दिसून येतो. परंतु तो मतलब गैरसमजुतीचा आहे. अबदुल रहिमान हा बाजीरावाच्या बाजूला पहिल्यापासूनच होता व त्याच्याशी जर्विस म्हणतो त्याप्रमाणें १७३३ च्या फेब्रुवारींत, १७३३ च्या डिसेंबरांत व १७३६ त झालेल्या तहाचीं कलमें आधींच करार करून ठेविलेलीं होतीं. १७३३ च्या ६ फेब्रुवारीस अबदुल रहिमान ह्याच्याशीं तह झाला असें जर्विस म्हणतो तें रा. पारसनीस यांस संशयात्मक दिसतें, परंतु हा संशय निर्मूल आहे, हें वरील हकीकतीवरून स्पष्ट आहे. रा. पारसनीस यांनी ह्या जंजिरेप्रकरणाची जी हकीकत दिली आहे ती बहुतेक चुकलेली आहे, व ती हकीकत देतांना जीं पत्रें त्यांनीं 'ग्रथमालें' तून नमूद केलीं आहेत तींही अयोग्य स्थलीं केलीं आहेत. कालाचें पौर्वांपर्य ध्यानांत धरून हकीकत लिहिली तरच ती बरोबर येते ही गोष्ट विसरून ह्या प्रकरणाची एक बखर त्यांनीं तयार केली आहे. उदाहरणार्थ, प्रतिनिधि व सिद्दी सात ह्याची भेट काशी बंदरावर १७३२ च्या २८ एप्रिलास झाली होती ती १७३० त झाली असे रा. पारसनीस समजतात. शेखजीला १७३० त फोडिलें असें रा. पारसनीस लिहितात; परंतु तशी गोष्ट नसून हा मनुष्य १७३३ त मराठ्यांना वश झाला. हबशी प्रकरण १७३० पासून १७३६ पर्यंत चाललें होतें असें चरित्रकारांचे म्हणणें आहे. खरें पाहिलें तर हे प्रकरण १७२६ पासूनच सुरू झालें होतें. बाजीराव १७३५ त कोंकणात उतरला, १७३३ त गोवळकोटास प्रतिनिधीचा पराभव झाला, वगैरे भाकड हकीकत ग्रांट डफनें आपल्या बखरीं दिली आहे, ती चुकली आहे, हें आतापर्यंत दिलेल्या वर्णनावरून उघड आहे. कान्होजीला पांच मुलगे होते वगैरे हकीकत ग्रांट डफ व पारसनीस देतात, परंतु तींतही बिलकुल तात्पर्य नाहीं.