Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

१७३४ च्या जुलैच्या सुमाराला संभाजी आंग्र्यावर आभाळ कोसळतें की काय अशी स्थिति झाली म्हणून लेखांक ३४० त लक्ष्मीबाई आंग्रे लिहिते त्यावरून मानाजीने संभाजीवर बरेच काहूर आणिलें होतें हें स्पष्ट आहे. मानाजी पळून गेल्यावर संभाजी विजयदुर्गाकडे निघून गेला. इतक्यांत मानाजीने हल्ला करून कुलाबा काबीज केला. हे वर्तमान ऐकतांच संभाजी आपल्या सर्व आरमारासह कुलाब्यावर धांवून आला (खंड ४, पेशव्यांची बखर, पृ. ४१). ते समयीं मानाजी आंग्रे यानें बाजीरावास कुमक करण्याविषयीं निकडीचीं पत्रें पाठविलीं. संभाजीचा स्वभाव त-हेवाईक पडल्यामुळे तो बाजीरावास, ब्रह्मेंद्रस्वामीस व शाहूराजास अत्यंत अप्रिय झालेला होता. आपल्या पश्चात् अंजनवेल वगैरे ठाणीं सर करण्याचे काम संभाजीच्या हातून झाले नाहीं ह्यामुळे बाजीरावाचा राग संभाजीवर होता. १७३४ च्या पावसाळ्यात ब्रह्मेंद्रस्वामी कोंकणात गेला असतां त्याची पासोडी, बंदूक व निशाण संभाजीनें थट्टेनें किंवा अपमान करण्याच्या हेतूनें हिसकावून घेतल्यामुळें स्वामीचाही क्रोध संभाजीवर विशेष झाला होता (पा. ब्र. च. ले. ३१३) व मानाजीशीं भांडून थळची चौबुजीं शामळाच्या हातीं जाऊ दिल्याबद्दल शाहूराजाची इतराजी त्याजवर झाली होती (काव्येतिहाससंग्रह, ले. ११९). शिवाय, संभाजी व मानाजी ह्या दोघांमधील वैमनस्य वाढवून आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न इंग्रेज व फिरंगी ह्यांनीं चालविलाच होता. संभाजीच्या आरमाराचें भय इंग्रेजांना इतके कांहीं झाले होतें कीं, आंग्र्यांच्या कुलांत गृहकलह वाढवून, त्याची शक्ति कमी करण्याचाच उपाय इंग्रेजांना योजणे भाग पडलें. अंजनवेल व गोवळकोट हे दोन किल्ले शामळाचे घ्यावयाचे राहिले होते. शामळाला इंग्रेजाची पाण्यातून मदत होत असल्याकारणानें व संभाजी व मानाजी ह्यांच्यांतील वैमनस्य वाढत चालल्याकारणानें, अंजनवेल व गोवळकोट एका सबंध वर्षांतहि मराठ्यांच्या हातीं पडलीं नाहींत तशांत थळची चौबुजींही शामळांनी मध्येच पटकाविलीं. ही अशी पिच्छेहाट होत आहे असें पाहून, मानाजीच्या विनवणीवरून व वस्तुस्थितीच्या निकडीवरून बाजीराव १७३५ त कोंकणांत उतरला. बाजीराव येण्याच्या पूर्वी १७३५ च्या जानेवारींत अंजनवेल मराठ्यांच्या ताब्यांत आली. १७३४ च्या प्रारंभी उदाजी पवारानें सिद्दी अंबर अफवानी ह्याचा पराभव व शिरच्छेद रायगडाखालीं वाडीपाचाड येथें केला (पा. ब्र. च. ले. २७८) ह्या पलीकडे १७३४ च्या सबंध सालांत मराठ्यांच्या हातून विशेष कांहींएक झालें नाही. संभाजीचें व मानाजीचें वाकडें असल्यामुळें व मानाजीच्या हातांतील आरमाराचा उपयोग इंग्रेज व फिरंगी ह्यांना बंद करण्याकडे होत नसल्यामुळें, अंजनवेल मराठ्यांच्या ताब्यांत हा वेळपर्यंत आली नाहीं. बाजीराव आपल्या साहाय्यास येणार असें कळल्याबरोबर मानाजीनें अंजनवेल घेण्याची खटपट केली व त्यांत वर सांगितल्याप्रमाणें त्यास यश आलें. इतक्यांत १७३५ च्या फेब्रुवारींत बाजीराव कोंकणांत येऊन पोहोंचला. बाजीराव १७३५ च्या फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत कोंकणांत होता. तेवढ्या अवधींत राजमाची, कुलाबा, खांदेरी, कोहाळ वगैरे किल्ले मानाजीच्या हस्तें घेववून बाजीरावानें संभाजीचा अगदीं पाणउतारा करून सोडला व मानाजीशीं तह करून राजमाची वगैरे ठाणीं सरकारांत घेतली. मानाजीस वजारतमाब असा किताब देऊन व संभाजीस सरखेलीचें पद कायम करून ह्या दोघां भावांमधील तंटा बाजीरावानें मिटविल्यासारखें केलें. मानाजीला कुलाब्याचें ठाणें देऊन व संभाजीस विजयदुर्गास स्थापून कोंकणांत स्वस्थता उत्पन्न करण्याचा प्रयत्न बाजीरावानें केला. मानाजी व संभाजी यांमधील हा तह अलीबागेजवळील नवदरें या ठिकाणी झाला (शकावली, पृ. ७२). मानाजीला प्रोत्साहन देण्यास व संभाजीची रग जिरविण्यास ब्रह्मेंद्रस्वामीच कारण झाला. “कुलाब्यास जाऊन, तेथील बंदोबस्त वरकडही जे कार्य होणें असेल तें होईल.” हे वाक्य पारसनिसांनी छापिलेल्या ब्रह्मेंद्रस्वामीच्या १३० व्या पत्रांत आहे. वरकड कार्य म्हणजे संभाजीची खोड मोडण्याचें कार्य. पारसनीस यांनी ह्या १३० व्या पत्राची तारीख १३ जानेवारी १७३७ दिली आहे. खरी तारीख ५ फेब्रुवारी १७३५ आहे.