Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

१५. १७३७ च्या जुलैंत चिमाजी अप्पा पुण्यास गेल्यावर, शंकराजीपंत, गंगाजी नाईक, मोरोजी शिंदे वगैरेनीं माहिमास मोचें लाविले. १७३७ च्या नोव्हेंबरांत माहिमच्या मोर्चांत फिरंगी व मराठे यांची लढाई होऊन, महादजी केशव, वाघोजीराव खानविलकर वगैरे मंडळी ठार झाली, व रामचंद्र हरि पटवर्धन यांस उजव्या हातावर जबर जखम झाली. माहिमास हा असा प्रकार झाल्यावर फिरंग्यांनीं ठाण्यावर चालून येण्याचा बूट काढून धारावीवर हल्ला केला. ही बातमी चिमाजी अप्पास ब-हाणपुरास कळली. तेथून निघून १७३८ च्या फेब्रुवारींत अप्पा कोंकणात उतरला व ठाण्यास मजबुती करून राहिला. धारावीजवळ मुरद्यास फिरंगी व मराठ्यांची लढाई होऊन फिरंग्यांचा पूर्ण पराभव झाला. तों इतक्यांत पाऊसकाळ आला म्हणून ठाण्याची व धारावीची बळकटी करून चिमाजी अप्पा पुण्यास १७३८ च्या जूनांत दाखल झाले. नंतर शिबंदीचा खर्च फार पडतो, याजकरितां फिरंगी समूळ पुढील वर्षी खणून काढावा असा चिमाजीनें व बाजीरावानें बेत ठरविला व १७३८ च्या अक्टोबरांत मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे वगैरे मंडळीस कोंकणांत पुढे पाठवून, चिमाजीहि लवकरच त्यांना सामील झाला. फिरंगी ठाण्यावर पुनः चाल करून आला, व मल्हारजी होळकरानें पुनः त्याला मारून काढिला. माहिम, केळवें, साळासुवें, खतलवाडी, नारगोळ, डहाणू, तारापूर, अशेरी, वज्राबाई वगैरे ठाणी काबीज करण्याच्या पूर्वी मराठ्यांनीं खुद्द वसईच्या किल्ल्यास १७३९ च्या ६ फेब्रुवारीस वेढा दिला. १७३९ च्या १५ मार्चास वांद्र्याचा कोट जमीनदोस्त केला. व्यंकटराव नारायण घोरपडे यानें गोंव्याजवळ फोंड्याचा व मर्दनगडचा किल्ला ह्याच सुमारास घेतला. पुढें लवकरच मट व धारावी हीं बंदरें मराठ्यांनीं काबीज केलीं, व वसईच्या भोंवती खुषकीवरून शंकराजी नारायण यानें व पाण्याचे बाजूने मानाजी आंग्रे यानें वेढा दिला. साष्टीतील हालचालीसंबंधीं स्वतंत्र पत्रव्यवहार दुस-या एका खंडांत निराळाच छापावयाचा असल्यामुळें, ह्या वेढ्याची सविस्तर हकीकत येथे देत नाहीं. येथें इतकेंच नमूद करून ठेवितो कीं, राजश्री पारसनीस व ग्रांट डफ ह्यांनी ह्या मोहिमेची जी हकीकत दिली आहे, ती बरीच अविश्वसनीय व धरसोडीची आहे. उदाहरणार्थ, खुद्द वसईचाच किल्ला घेतल्याची ग्रांट डफ व पारसनीस यांनीं जी तारीख दिली आहे ती अजिबात चुकली आहे. पारसनीसमुद्रित ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहारांतील ५२ व्या लेखांकांत वैशाख शुद्ध अष्टमीस फिरंगी कौलास आले, व वैशाख शुद्ध पौर्णिमेस ते केल्ला सोडून निघून गेले असें लिहिलें आहे. वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजे ५ मे १७३९ व वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हणजे १२ मे १७३९. ५ मे १७३९ स फिरंगी कौलास आले व पुढे सात दिवसानीं १२ मेला ते किल्ला सोडून गेले. १६ मे १७३९ फिरगी कौलास म्हणजे Capilulation स आले व पुढें सात दिवसांनीं म्हणजे २३ मे १७३९ ते किल्ला सोडून गेले असें डफ आपल्या इतिहासाच्या १५ व्या भागांत लिहितो. ग्रांट डफनें १६ मे ही तारीख मुंबईच्या सेक्रेटेरियटांतील परेराच्या व चिमाजी अप्पाच्या तहनाम्यावरून घेतली आहे. हा तहनामा Selections from the Bombay Secretariat, Vol. 1, च्या ४१ व ४२ पृष्ठावर प्रो. फॉरेस्ट ह्यांनीं छापिला आहे व त्यावर १६ मे १७३९ ही तारीख आहे. परंतु ही तारीख नव्या पद्धतीची आहे जुन्या पद्धतीची नाहीं. पोर्तुगाल देशांत नव्या पद्धतीच्या तारखा चालत असल्यामुळें प्रो. फॉरेस्ट यानीं छापिलेलीं पोर्तुगीज सरदारांची पत्रें त्यावेळच्या इंग्रजी पत्रांच्या तारखाहून ११ दिवसांनीं पुढे आहेत. ही गोष्ट डफच्या ध्यानांत न आल्यामुळें ५ मे १७३९ ह्या तारखेच्या ऐवजी ११ आंकड्यांनीं अधिक असलेली १६ मे १७३९ ही तारीख डफने दिली आहे. डफच्या बाकीच्या सर्व तारखा जुन्या इंग्रजी पद्धतीच्या आहेत. वसईच्या कौलाची किंवा Capitulation ची पोर्तुगीज तारीख तेवढी त्यानें गैरसमजुतीने स्वीकारिली आहे, व तिची नक्कल रा. पारसनीस यांनीं, आपण स्वतः छापिलेल्या पत्रांतील तिथींकडे लक्ष न देतां, अंधपरंपरा न्यायानें केली आहे. तसेंच वसईला वेढा ६ फेब्रुवारी १७३९ स दिला म्हणजे माघ शुद्ध दशमीस दिला. रा. पारसनीस माघ शुद्ध दशमी म्हणजे ७ जानेवारी समजतात. खरें पाहिले तर माघ शुद्ध दशमी म्हणजे ६ फेब्रुवारी १७३९ आहे. ग्रांट डफ पोर्तुगीज पद्धतीची ११ दिवसांनीं अधिक जी १७ फेब्रुवारी तारीख ती देतो. तात्पर्य ग्रांट डफ व पारसनीस ह्या दोघांना कालाचें महत्त्व बिलकुल कळत नाहीं असें दिसते. वसईच्या कौलाची तारीख जर १६ मे खरी धरली, तर रा. पारसनीसानीं छापिलेल्या पत्रांतील तिथी खोटी होण्याची निश्चिती आहे व ती तिथी खोटी ठरली म्हणजे पत्राच्या खरेपणाविषयींहि संशय येतो. ह्या गोष्टी ऐतिहासिक पत्रव्यवहार छापणा-यांनीं ध्यानात ठेविल्या पाहिजेत. इंग्रज लेखक चुकला म्हणून आपणहि गचाळपणें चुकावें हें केव्हांहि फायद्याचें नाहीं.