Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मठडी एक जागा असती तर स्वामीस कळतें कीं, चाकरी फलाणेयानें केली. असें स्वामीस विदित होतें. आतां स्वामीची आज्ञा शिरसा वंदून येथील बंदोबस्त करून सेवेसी येतों. उरूबरू येऊन विनंती करीन. मजला मोठी उमेद आहे, स्वामीची चाकरी उमदेपणें करावी, आणीक जागा, मुलूक स्वामीचे घरीं फार आणून घालावा हें आहे. त्यास माझी नालीस नानाप्रकारें स्वामीस लिहिणार लिहितात. त्यास जर मी एकनिष्ठपणें स्वामीची सेवा करीत असलों तर आमचें कल्याणच आहे. जर कांहीं दगाबाजी करून, तर ईश्वर आह्मास शिक्षा करील. आह्मास एक स्वामीची कृपा. हिमायत ह्मणावी तर, वशिलावगा ह्मणावा तर, स्वामीखेरीज आमचा आमची गोष्ट बरी सांगेसारखा कोणी नाहीं. बकरुलाखान पातशाहींत नामी सरदार होता. त्याजला परम संकटें परम उपायें जीवाकडे न पहातां बुडविला. त्यास मराठा सरदार हें कर्म करिता तर जमीनीवर न माता! आह्मी स्वामीचे ब्राह्मण, आमची शिफारस कोण करणार? आज दोन लाख रुपयांचा तोफखाना स्वामीस मेळवून दिल्हा. कुरा व कडा, अठरा परगणे, लहान थोर स्वामीचे घरीं आले. पातशा कोठील? वजीर कोठील? जे जागा घेतली ते स्वामींनीं कोणास दिली? हे चाकरी सेवकापासून झाली. कांहीं नादांनीं आह्मापासून न जाली. येथून लिहितां विस्तर आहे. आह्मी कानधरली शेळी आहों, हुकुमी आहों, खावंदाची अहिर्निशी सेवा एकनिष्ठपणें करावी हें जाणतों. नालीस आमची हजारों कोणी लिहू, करू. आह्मीं त्रिशुध्द एकनिष्ठपणें वर्तणूक केलियास कांहीं फिकीर नाहीं. मीही येथील बंदोबस्त करून सेवेसी येतों. सेवेसी येऊन तपशीलवार वर्तमान विदित करीन, तेव्हां स्वामी ऐकोन संतोषी होतील, आमचे श्रमाचें सार्थक होईल. सविस्तर चिरंजीव बाबूराव याजला लिहिलें आहे, ते विदीत करतील. राजश्री दत्ताजी शिंदे यांची मदत जरूर स्वामींनी करावी. राजे माधोसिंग यांणीं तजी जिवें मारला; आणि दहाहजार फौज सागरेकडे गेली ह्मणून वर्तमान आहे. बिजेसिंग याचें साहित्य करावें ह्मणून गेले आहेत. आहे वर्तमान तें लिहिलें आहे. वरचेवर लिहीत जाऊन. आह्मास उजूर तिळमात्र नाहीं. प्राणसुध्दां स्वामीचे आज्ञेवर हजर आहे. आज्ञेशिवाय नाहीं. जागा ते कितेक जीवसुध्दां हजर आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.