Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
हा गैरसमज दूर करावा हाणून मराठ्यांच्या धार्मिक जागृतीचा इतिहास त्रोटक रीतीनें देण्याचें आह्मीं योजिलें आहे. ही माहिती मिळण्याचें मुख्य ठिकाण ह्मणजे, गेल्या शतकाच्या शेवटीं या भागास ब्रिटिश सत्तेचें वारेंसुद्धां लागलें नव्हतें, अशावेळीं आमच्याच कविमालिकेपैकी कविवर्य महिपतीनें महाष्ट्रांतील साधुसंतांचीं लिहून ठेविलेलीं विस्तृत चरित्रेंच होत. महाराष्ट्रीयांस राजकीय स्वातंत्र्य जसें एका मनुष्याचे हातून किंवा एका शतकांत प्राप्त झालेलें नाहीं, तसेंच मराठ्यांची धर्मोन्नति होण्यास बराच काळ लागून पुष्कळ साधुसंताचे उपदेश खर्ची पडले आहेत. मुसलमानांनी दक्षिण जिंकण्यापूर्वीच ह्या धर्मसुधारणेस सुरुवात झालेली आहे. देवगिरीस यादव राजे राज्य करीत होते, तेव्हांच साधु ज्ञानेश्वरानें भगवद्गीतेवरील आपली प्रसिद्ध 'ज्ञानेश्वरी' टीका मराठींत लिहिली. बल्लाळराजांचे वेळीं मुकुंदराज प्रसिद्धीस आला. त्याचवेळीं त्याणें आपला प्रसिद्ध ग्रंथ ' विवेकसिंधु ' लिहिला. बाराव्या शतकांत मराठींत जे जे ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यांत ह्या मुकुंदराजाचे ग्रंथांस अग्रस्थान दिलें पाहिजे. पुढें मुसलमानांच्या स्वा-यांस सुरवात झाली, तेव्हां हा प्रगतिप्रवाह थोडासा मंदावला; पण कांहीं काळानें महाराष्ट्रीयांच्या बुद्धिचातुर्यानें पुनः उचल खाल्ली. मराठी सत्तेच्या उदयकाळीं तर एक साधु| संतपरंपराच महाराष्ट्रांत चोंहींकडे पसरली होती. अशाप्रमाणें हा प्रगतिप्रवाह सरासरी २०० वर्षे मोठ्या जोरानें फोंफावत चालला होता; पण पुढें त्यास हळू हळू ओहटी लागली, व त्याच्या अंताबरोबर मराठ्यांचे राजकीय स्वातंत्र्यही नष्ट झालें. साधारणपणें हें धर्मजागृतीनें काम ५०० वर्षेपर्यंत चाललें होतें असें ह्मणण्यास हरकत नाहीं. इतक्या मुदतींत सुमारें ५० साधुपुरुष निर्माण झाले, व त्यांनी सर्व महाराष्ट्रभर आपली छाप पूर्णपणें बसवून सोडली. असा ज्या साधुसंतांचा प्रभाव त्यांचीं चरित्रें लिहिण्यास महीपतीस स्फूर्ति झाली यांत नवल काय ? या साधुसंतमेळ्यांत कांही स्त्रिया, कांहीं हिंदुधर्म स्वीकारलेले मुसलमान, कांहीं मराठे, कुणबी, शिंपी, माळी, कासार, सोनार पश्चात्तापानें शुद्ध जाहलेल्या वेश्या, दासी व अति शूद्र, महार व निम्मेशिम्मे ब्राह्मण अशी मंडळी होती. यावरून असे आढळून येईल की, या आध्यात्मिक उन्नतीचा केवळ परिणाम एकाच जातीवर घडला नसून लहानापासून थोरापर्यंत सर्व समाज तिणें अगदी वेडा करून टाकला होता. उच्चनीच, अज्ञ सुजाण स्त्रियापुरुष, हिंदु मुसलमान एकसह सर्व लोक धर्मानंदांत 'नाचूं लागले होते. अशाप्रकारची धर्मजागृति इतर देशांचे इतिहासांत क्वचित् सांपडेल. याच सुमारास उत्तर व पूर्व हिंदुस्थानांतही धर्मजागृति होण्यास सुरवात झाली होती. नानकानें सर्व पंजाब हलवून हिंदु मुसलमान धर्माचें ऐक्य करण्याचा प्रयत्न केला. पूर्वेकडे चैतन्यानें शाक्तधर्माचें बंड मोडून भागवत धर्माचा प्रसार करण्याचा प्रारंभ केला. रामानंद, कबीर, तुळशीदास, सुरदास, जयदेव, रोहिदास वगैरे आपआपल्यापरी लोकांस अध्यात्मिक ज्ञानामृत पाजण्याचें कार्य करीत होते. यांचा परिणाम मोठा झाला व तो चिरस्थायीही झाला ; परंतु महाराष्ट्रांतील साधुसंतांच्या कार्याच्या पासंगालाही तो येणार नाहीं. ‘चांगदेव व ज्ञानदेव, निवृत्ति व सोपान, मुक्ताबाई व जनी, अकाबाई व वेणुबाई, नामदेव व एकनाथ, रामदास व तुकाराम, शेख महंमद व शांति बहामनी, दामाजी व उद्धव, भानुदास व कूर्मदास, बोधलेबाबा व संतोबा पवार, केशवस्वामी व जयरामस्वामी, नरसिंह सरस्वती व रघुनाथस्वामी, चोखामेळा व दोवेही कुंभार, नरहरि सोनार व सावत्या माळी, बहिरामभट व गणेशनाथ, जनार्दनपंत व मुधोपंत; ही नांवे आणि अशीं किती तरी घ्यावींत? हा सर्व तांडा पुढें आला ह्मणजे महाराष्ट्रांतील चळवळीच्या विशेष कर्तबगारीविषयीं बालंबाल खात्री होऊन जाते. इकडच्या भागांत साधुसंतांच्या वर्गात ब्राह्मणांचा भरणा विशेष आहे. तेच हिंदुस्थानच्या इतर भागांत ब्राह्मणसाधूंच्या संख्येपेक्षां क्षत्रिय व वैश्य साधूंचीच संख्या अधिक आहे.