Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
महाराष्ट्रांतील साधुसंत.
प्रकरण ८ वें.
शिवाजीचे धर्मगुरु प्रसिद्ध रामदास यांणी एकेप्रसंगीं संभाजीस आपल्या बापाचें अनुकरण करण्यासाठीं फार मार्मिक उपदेश केलेला आहे. या उपदेशामृताचें सार अवघ्या दोनच वाक्यांत त्यांणीं दिलें आहे. संभाजीस स्वामी रामदास सांगतात.
‘ मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।'
ही कल्पना शिवाजीनें पूर्णत्वास आणून निर्विघ्नपणें सिद्धीस नेली. फार काय, प्रायः हीच कल्पना शिवाजीच्या सर्व राजकीय चळवळीचा पाया होय. ‘ महाराष्ट्र धर्म वाढवावा' या दुस-या वाक्यांत रामदासांनीं आपल्यावेळीं महाराष्ट्रांत चोहीकडे जी धर्म जागृति होत होती किंबहुना तत्कालीन राजकीय चळवळसुद्धां ज्या धर्मजागृतीचें केवळ प्रतिबिंबच होतें त्या धर्मजागृतीचें हुबेहुब चित्र आहे. वरील उपदेशांत वैदिक, पौराणिक अगर हिंदुधर्माचा प्रसार करण्यास ते सांगत नाहींत. ‘महाराष्ट्रधर्म’ वाढवावा असा ते उपदेश करतात. तेव्हां यांतील इंगित काय असावें असा प्रथमदर्शनीं प्रश्न उत्पन्न होतो. वैदिक, पौराणिक वगैरे धर्माहून महाराष्ट्र धर्माचीच स्वामींनीं महती कां गाइली, महाराष्ट्रीयांच्या धर्मकल्पनेंत असा विशेष गुण काय होता, संभाजीनें चालविलेल्या जुलुमापासून महाराष्ट्रीयांस मुक्त करण्यास महाराष्ट्रधर्मजागृति करणें एवढाच काय ते तरणोपाय, अमा रामदासाचा समज कां झाला वगैरे विचार एकामागून एक मनांत येऊं लागतात. महाराष्ट्राच्या इतिहासांत राजकीय व धार्मिक उन्नतीची एक बेमालुम सांगड बनली आहे. ह्या सांगडीचें महत्व बरोबर कळलें नाहीं, तर मराठ्यांचा अभ्युदय हें एक मोठेंच गूढ होऊन बसेल. मराठी साम्राज्याचा पाया उदात्त नैतिक तत्वावर उभारला नसून मराठ्यांने राजकीय प्रयत्न ह्मणने लुटारू लोकांची एक धामधुमीची गडबड असें वाटू लागेल. वर सांगितलेला हा राजकीय व धार्मिक सुधारणेंतील परस्परसंबंध आजपर्यंत कोणाही इतिहासकाराच्या लक्ष्यांत आला नाहीं. या सर्व इतिहासकारांनी, मराठ्यांनीं स्वातंत्र्यप्राप्तीकरितां चालविलेल्या प्रयत्नांचा एकाच बाजूनें विचार केला आहे. राजकीय प्रगती बरोबर मराठ्यांची धार्मिक उन्नति कशी होत गेली याचें त्यांणीं बिलकुल विवेचन केले नाहीं. अशा रीतीनें ही धार्मिक आणि राजकीय सुधारणेची सांगड फुटली गेल्यानें मराठ्यांबद्दल बराच गैरसमज उत्पन्न झाला आहे.