Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४५.
श्री.
सेवेसीं कृष्णराव नारायण जोसी सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ मोहरम मु॥ श्रीरंगपट्टणपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेषः- स्वामींनीं सांडणीस्वारासमागमें छ १९ जिल्हेजचें पत्र नवाबसाहेब यांस शादीची वस्त्रें व व जवाहीर रकमा व थैल्या श्रीमंतांकडून व खासगत पाठविल्या. त्या छ ११ मोहरम मु॥ मजकुरीं पाऊन बहुत संतोष जाहाला. पत्रीं लिहिलें कीं, शादीचीं वस्त्रें जवाहीर पाठविलें आहे. वस्त्राची व जवाहीर रकमाची याद अलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री गोविंदराव व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबास आहेर करावा. वरकड तुह्मी पोहचून सर्व मसलतीचे अर्थ बोलण्यांत आलेच असतील. अदवानीचा हांगामा मना लौकर व्हावा ह्मणजे नेमिले मसलतीचें सार्थक. निर्वेधपणें दुषमानाचीं पारपत्यें होतील. येविसींचे पर्याय जातेसमयीं तुम्हांस सांगितलें आहेत. त्याप्रमाणें लौकर प्रत्ययास यावें म्हणोन. ऐसियास, आम्ही बागलकोटाहून निघोन मजल दरमजल आलों. नवाबसाहेब यांचे जिल्हेंत आल्यावर, मार्गीं जागाजागा, परामर्षं यथास्थित जाहाला. छ १० मोहरमीं पट्टणानजीक येतांच, नवाबसाहेब यांणीं राजश्री श्रीनिवासराव बारकी, मातबर सरदार, यांस पुढें दोन कोस सामोरे पाठऊन किल्ल्यानजीक कावेरी तीरीं, बागें (त) जागा राहावयास अगोधरच करविली होती. नजीक देवस्थान व मंडप अति उत्तम आहे. तेथें म।।निले यांणीं समागमें येऊन उतरविलें. भेटीस मुहूर्त छ १२ मिनहूचा निश्चय करून, मातबर सायंकाळीं पाठऊन, त्यासमागमें चार घटका रात्रीस मंडळी व लोकसुधां सुसमयीं किल्ल्यांत गेलों. भेट जाली. भेटीचे समईचीं वस्त्रें व शादीचीं वस्त्रें, जवाहीर थैल्यासहीत निवेदन केलें. अत्यादरें स्वीकार केला. श्रीमंतांकडील व स्वामीकडील कुशलार्थ पुसोन उपचारिक भाषणें परस्परें जालीं. च्यार घटका दरबारांत होतों. नंतर निरोप देतेसमईं बोलिले कीं, कित्येक मजकूर बोलावयाचे आहेत, त्यास सुचना करूं तेव्हां यावें. बोलणें होईल. त्याप्रमाणें सुतरस्वार ठेऊन घेतलेच आहेत, त्याबराबर सविस्तर लिहून पाठऊं.