Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                               पत्रांक १५.

इ. स. १७६५. जून.                                                      श्रीशंकर.                                                       १६८७ आषाढ


श्रीमंत राजश्री नाना स्वामींचे शेवेसी पोष्य राघो राम व राघो मल्हार व बाजी नरसिंह कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशळ तागाईत छ माहे जिल्हेज मुकाम नजीक मुकुंदबारी येथें स्वामीचें कृपावलोकनेंकरून क्षेमरूप जाणून स्वकीय कुशलोत्तर पत्रीं आनंदवीत असावें. बहुत दिवस जाले. आपलेकडून पत्र येऊन परामृष होत नाहीं, तेणेंकडोन चिंतातुर आहोंत. तरी आपुल्याकडील साकल्य अर्थलेखन करून आज्ञापत्र प्रेरणा करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी श्रीमंत मातुश्री बाई व राजश्री माहादजीबावाचे सख्य जालींयाचें वर्तमान आपणास कळलेंच असेल, आणि शेवेसी तो। शिवाजी विठल पाठविलेत त्यांणीही निवेदन केलेंच असेल. अलिकडे वर्तमान तरी माहादाजी गोविंद याजला मुजमू देऊन ठेवावें हा इत्यर्थ केला होता. त्यास त्याचा अति आग्रह कीं दिवाणगिरी श्रीमंत स्वामींनी आम्हांस दिल्ही असतां येथें मुजमू करून रहावें हा प्रकार उत्तम नाहीं, देशास जावें, म्हणोन याजपासोन निरोप घ्यावा आणि हे कोटयाकडे आणिक दोन चार मजली गेलियावर अवंतिकेस येऊन धामधूम करावी, सावकारा मारावा, ऐसा चित्तांत भाव आणून आड घातली की दिवाणगिरी स्थापलियाखेरीज आमचें राहणें होत नाहीं. तेव्हां प्रसंगास सेवकाखेरीज सख्त ज्वाबसाल कोणी ही न करीत तेव्हां ज्वाबसाल करावासा जाला त्या ज्वाबसालामुळें अगोदर आम्हावर च परम श्रमी होते ते कोठवर ल्याहावें ? त्याजवर निरोप घेऊन x x x x होते उज्जनींत रा। अच्युतराव व आह्मीं हि होतो. त्यास सावेरीचे आसपास उज्जन वगैरे परगणियाचे गांव लुटू लागले. खंडण्या हि घेतल्या. ऐसी धामधूम केली. त्याजवरोन रावजींनीं व आह्मी पत्रें त्याजकडे पाठविलीं कीं हें कर्म आपणायोग्य नाहीं. येकदों गांवचे पारिपत्य केले तें उत्तम केलें. परंतु याउपर हे गोष्ट कामाची नाहीं. ऐसीं पांच सात वेळां पत्रें पाठविलीं परंतु एकंदर न ऐकत. आणि कासिदास मारून वाटे लावीत. तेथें पत्राचें उत्तर येणें कळत च आहे. ऐसा विचार जाहलियावर उज्जनींत हजार बाराशें लोक होते. त्यास रावजींनीं आम्ही विचार केला की याजला दबाव देऊन इंदूरापावेतो पाहोचावून द्यावें म्हणून फौज तयार करोन गेलों. कोसावर उभे राहून दबाव दाखविला, परंतु न ऐकत. नजीक गेलों तेव्हां कांहीं पळून गेलें. कांहीं उभे राहिलें, आणि गोळागोळी करूं लागले. तेव्हां आम्हांकडील लोकांनीं चाल केली, तेव्हां झाडोन पळोन गेले. पेंढारी लुटारे होते त्यांनी राहोट्या वगैरे होत्या त्या लुटून नेल्या. तशांत लुटारियांनी कोणीकडे माहादजीपंतास धरिलें हें न कळे. जखमा लागून सात आठ रोजा मृत्यु पावले. होणारास विलाज नाहीं. अगोदर आमचे नांवें श्रमी होते च. त्यांत हा प्रकार जाला ! त्यामुळें सर्वत्र दरबारीं आमचें च नांव बदु करून दुर्निमित्य आम्हांवरी ठेवतील. आम्हीं तों एकनिष्ठ सेवक आहों हें स्वामीही जाणत आहेत. सारांश दिवाणगिरीमुळें हा प्रकार जाला. येविसीं पूर्वी हि पत्र आपणाकडे पाठविलें आहे, कीं साकल्य कच्चें वर्तमान आपणांस कळावें.