Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १८९.
१६९८ कार्तिक वद्य १.
राजश्री माहादजी शिंदे गोसावी यासि:-
सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने॥ रघुनाथ बाजीराव प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. प्रस्तुत सुरतेहून बातमी आली कीं, पादशाहा व असफद्दोले फौजसुद्धां दक्षिणचे मोहिमीस येणार, अमदाबाद असफदौलास द्यावी. माळव्यापर्यंत बंदोबस्त केल्यानंतर दक्षणचा सर्व बंदोबस्त करावा. त्यास, जोर असल्यास काय त्याणीं करावयाचें आहे ? दुसरा मजकूर: धारेस चिरंजीव आहे. त्या किल्ल्यास फौजेनें वेढा घातला. यामुळें सांप्रत तसदी फार होते. याकरितां चिरंजीवास आह्माजवळ पोंहचाऊन देऊन किल्ला ज्याचा त्यास द्यावा. सांप्रत अंगरेजाखेरीज दुसरा जागा आश्रयाचा दिसत नाहीं. ह्मणोन येथें राहणें प्राप्त आहे. तुह्मासारखे मातबर सरदार असतां आमचें राहणें परकी स्थलीं व्हावें ! परंतु कालापुढें उपाय काय ? धारेचा किल्ला खंडेरायाचे हवाले करितों. चिरंजीवास व कबिल्यास पाठवणें. दौलत जेव्हां कपाळी असेल तेव्हां मिळेल. तूर्त येथें अबरूनें आहों. कोणाचे पेंचांत नाहीं, इतकेंच सुख मानून आहों. आंगरेज मैत्रकीस बहुतच उत्तम. याची तारीफ काय लिहावी ? जाणिजे. छ. १४ माहे सवाल.