Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६७
श्री नकल
१६९२ भाद्रपद शुद्ध १३
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे गोसावी यांसीः-
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सुा इहिदे सबैन मया व अलफ. तुह्मी विनंतीपत्र छ ९ रविलारवरचें पाठविलें तें छ ११ जमादिलावलीं प्रविष्ट झालें. हैदरखान पट्टणासच आहे. टिपू हल्लीं होन्नुरावर दक्षणतीरीं आहे. अलीकडे उतरला. ऐशी बातमी सावनूरकरांची आली. त्यावरून आह्मी सर्वांनीं तयारी करून त्यास गांठावें ऐशी तजवीज तयारी केली. तों फिरून सावनूरकरांची बातमी आली कीं, दक्षिणतीरींच आहे. त्यास गांठावें फार सर्वांच्या चित्तांत आहे. गांठ पडिलियावर होणें तें होईल. सोंधे प्रांतीं धामघूम करावी तरी तिकडे पर्जन्य. त्याहिमध्यें धारवाडचे तालुकियाचीं सरकारचीं खेडीं व सोंधेकरांची खेडीं एकास एक लगतीं. एकाचे आश्रयानें एक आहे. तीं मारावीं न मारावीं येविसी आज्ञा असावी, ह्मणोन लिहिलें तें कळलें, ऐसीयास, हैदरखान व टिपूची बातमी लिहिली व टिपूस गांठावयाचा मजकूर, तर तो नंदी उतरून उत्तरतीरों आल्यास, तुह्मी पारपत्य करावें हें उचित. तुह्मीं, राजश्री शाहाजी भोंसले, व जनार्दनराम मातबर सरदार तिकडे असतां, कांहींच काभ न जाहालें तर कसें ? याउपर चांगली बातनी राखून त्यास नतीजा देणें. सोंधें प्रांताचे गांव मारावयाचा मजकूर लिहिला. तर हैदरनाईक पट्टणास आहे. टिपू तुंगभद्रापार चेनागिरीस आहे. तुह्मीं तिघे सरदार तीन चार हजार फौज आहे. सोंध्यांत त्यांची फौज नाहीं, असें असतां सोंध्याचे गांव मारावयाचा तुह्मांस विचार पडला. अपूर्व आहे ! आपले गांव राखून त्याचे गांव मारावे तर तारीफ, अत:पर तुह्मी लिहिलेप्रमाणेंच कराल. करावें. जाणिजे, छ, १२ जमादिलावल. वहुत काय लिहिणें? लेखनसीमा.