Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक २५
( नकल )
१६८६ फाल्गुन वद्य ९
पो। चैत्र शुद्ध ९ रवीवारीं पावणेदोन प्रहरा
पत्र आलें, काशिदास अर्ध रुपया दिल्हा असे,
श्रीराम,
श्री वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-
चरणरज खंडोजी अरगडे दंडवत विनंति उपरी येथील क्षेम ता फाल्गुन वद्य ९ पावेतों श्रीमंत साहेबांचे सैन्यांत सुखरूप असों. आपली आज्ञा घेऊन स्वार जालों तों सैन्यांत पावलों. आपलीं पत्रें श्रीमंतास प्रविष्ट केलीं. परंतु कोणी आपले जीबसालांत कारभारी मन घालीनात! आपण नित्य घरोघर फिरोन राहिलों, लक्ष्मणपंती रा गुरुजी, माहादाजीपंत मुरबी केलेत. त्यांनी श्रीमंतांस समजाविलें कीं:-उभयतां राजश्री दीक्षित स्वामी आपले आपल्यांत कळा काढितात. गांव सुधा नांदूं देईनात. ह्मणोन सालमजकूरीं यांजकडून कमावीस दूर करून नारो बाबूजी भिडे यांजकडे कमावीस सांगितली आहे. ऐवज मौजे मजकूरचा वेदमूर्ती स्वामीकडे जमला आहे. पैकीं देवविला आहे, सांप्रत हें पत्र त्याचें आलें. उत्तर दिल्हें पाहिजे. याजवरून, उत्तर दिल्हें कीं, यांस पत्र लिहितों जे, हालीं नवा कमावीसदार केला आहे, तो उत्तमच आहे, ऐवज तुह्मांस पावतां करील. हे उत्तर रा रामाजी बाबा चिटणीस यांणी लिहिलें. तेथें सदाशीवपंत वैजनापुरकर कार्यामुळें आले होते. त्यांणीं पत्र पाहून आह्मांस ह्मणालें कीं, हें उत्तर काय कामाचें आहे ? अग, त्यांनीं राभाजीबाबास लक्ष्मणपंताचा स्तुतिवाद सविस्तर केला, तो पत्रीं लिहितां विस्तार आहे. त्याजवरून रामाजीवावांनीं एकान्तीं सविस्तर वर्तमान श्री राजश्री रावसाहेबांस विदित केलें. त्याजवरून आज्ञा जाली कीं, पाहिले प्रमाणें सनद करून देणें. हे परवानगी फडणिसांकडे पोंचविली. परंतु गुरुजीबावांनीं न मानितां टाळा दिल्हा! उपरांत रा सदाशिवपंत वैजनाथपुरकर व आपण रामाजीबावांस सांगून, दुसरी परवानगी मोरोबा फडणीस यांजला पावती केली. निदान गुरुजीनी रा मोरोबादादास सांगून रा नारो बाबाजी सुभेदार यांचे नांवें सनद देवविली. ते सनद तयार जाली. आपण घेऊन येत होतो. तों त्यास रा सदाशिवपंत पाळंदे यांनी बोलावून वर्तमान पुसलें. जालें वर्तमान यांस विदित केलें. ते ह्मणालेत कीं, मजलाहि याविषयीं पत्र आलें आहे, च्योर रोज राहतां नव्या सनदा भेंडाळियाच्या व नळकियाच्या करून देतों. याजकरितां गुंता जाला आहे. राजश्री बाबूजी नाईकहि आले आहेत. हैदरनाईकाचा जाबसाल लागला आहे. यामुळें गुंता दिसतो. सविस्तर वर्तमान सदाशिवपंत वैजनाथपुरकर यांनीं लिहिलें आहे. विदित होईल. आपले आशीर्वादेंकरून बोलबाला आहे. श्रुत होय हे विनंती.