Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १९०.
श्री.
१७०० ज्येष्ठ-आषाढ.
सां नमस्कार विनंती उपरी. फरांसिसांचे येथें तीन वकील आले आहेत, त्यांचें व आमचें बोलणें जाहालें, ह्मणोन विस्तारें लिहिलें तें सर्व कळों आलें. आणखीहि कित्तेक मजकूर विस्तारें लिहिले ते कळले. तुमच्या लिहिल्याचे अन्वयें श्रीमंतांस विनंती केली. हे विशींचें बोलणें येथें बहुत जाहालें, तेव्हां खातरजमा जाहाली. उत्तम आहे, हे आज्ञा जाहाली. संशय इतकाच जे, कोणती गोष्ट करणें ते बहुत विचार करून करावी. केल्या मर्जीनुरूप फल आल्यास उत्तम. कदाचित् न घडल्यास करण्यास दोष येतो मोठ्या गोष्टीस पेंच. जे तुह्मांसीं बोलतात, त्यांची खातरजमा येथें केली. परंतु त्यांचेच स्वाधीन कोणताहि प्रकार नसिल्यास मग काय होणें हें कळतच आहे. याकरितां आज कोणतेहि गोष्ट नमुदांत आणणें हें ठीक नाहीं. यारितां याचा विचार पुर्ता करून, तेथें आपणांस त्यांसीं जें बोलणें तें बोलावें आणि जो निश्चय करणें तो करावा. सर्व अर्थ त्याचे हातीं. येविशीं तुमची खातरजमा जाहालियासच करावें. नाहींतर ठीक नाहीं. घोडे स्वाधीन नसिल्यास बसणार काय करितो ? सर्व अर्थ तुमचे ध्यानांतच आहेत. करण्याविशीं येथील मर्जीचा संतोष आहे. पक्कें मात्र असावें. घोडे स्वाधीन आहेत यांत संदेह नाहीं, हे खातरजमा तुमची जाहलियावर तेथेंच जो निश्चय करणें तो तुह्मींच करावा, येविशीं आलाहिदा तुह्मांस चिठी आहे. हेच दाखवून खातरजमा करावी आणि कार्य करावें. गुंता नाहीं. जाहिराणा पत्राचा सिलसिला हा प्रकार केव्हां घडेल ? येथील मर्जीनरूप एकदोन प्रचिती येतील तें करून दाखवितील, तेव्हां जे गोष्ट होणें ते स्पष्ट होईल. तोंपर्यंत करणें ठीक नाहीं. याप्रमाणें आज्ञा जाहाली. कळावें. तुम्हांकडून याचाविषयीं ग्रहस्थ आले ते भेटले. त्यांसहि हाच मजकूर सांगितला आहे. त्यांचें पत्र आलाहिदा गेलें आहे व हालीं आहे, त्यावरून कळेल. कार्य जाहलियावर तुमचें पत्र आलें म्हणजे येथील मर्जीनरूप जे सला तुम्हांस लिहिणें ते लिहूं. त्या अन्वयें प्रचितीस यावें ह्मणजे सर्व गोष्टी मनोदयानुरूप घडतील, भोंसले याचें व इंग्रजांचें सूत्र आहे म्हणून येथें वर्तमान दाट आहे, व बुंदेले यांचे लिहिण्यांत आहे, व पलटणें आलीं आहेत, त्या समागमें बेणीरामपंत आहेत, ऐसें असोन तुह्मीं कांहींच लिहिलें नाहीं, हें काय ? तस्मात् तुम्हांस कळलेंच नसेल. तरी येविशींचा बारिकाईकानें पक्का शोध करून लेहून पाठविणें याउपर कोणे विशींचा आळस एकंदर नसावा. बहुत सावध असावें. बारकाईनें जें वर्तमान आढळेल तें वरचेवर लिहीत जावें. दिवस बहुत नाजूक आहेत व संधीचे आहेत. फार जपावें. येविशीं सहसा सुस्ती नसावी. पत्र वाचून फाडून टाकणें. मार फार नाजुक आहे याकरितां ही विनंती. इकडे, मध्ये मोरोबाची वगैरे घालमेल जाली. त्या दिवसांत तेथील डोळे ठिकाणीं नव्हते. सरंजाम वगैरे जप्त केला होता. त्यास मागती देतात आहेत, म्हणोन तुह्मीं लिहिलें. त्यास, उत्तम आहे. द्यावा. आपण आपले तर्फेनें, त्यांचे डोळे ठिकाणीं नव्हते, हें दर्शऊं देखील नये. याचें कारण नाहीं व येथेंहि त्याप्रमाणेंचा निश्चय आहे. तुह्मींहि दर्शऊ नये. रंगामेजी व खातरजमाच आहे. हे विनंती......विनंती फरांसिसाचे वकिलाचें पत्र पों त्यास, जो येथें वकील होता तो गेला. पत्र आम्हांजवळच आहे.