संस्कृत भाषेचा उलगडा

७ -ह् व उपसर्जनीय हे कंठ्य आहेत व त्यांचे अ शीं सावर्ण्य आहे. ह् वर जास्त जोर दिला म्हणजे -ह् ही कंठ्य होतो व त्याचे अ शी सावर्ण्य निपजते. सबब पुनर् + रवि : याचा संधि र् चा अ होऊन, पुन अ रवि := पुना रवि : असा होतो. र् च्या पुढे र् आला असता पाठीमागील स्वराला दीर्घत्व येते म्हणून पाणिनी सांगतो. परंतु ते का येते हे तो सांगत नाही. खरे कारण -ह् चा पूर्वसवर्णीभवन पावण्याचा स्वभाव होय. पुन-ह् रवि: = पुन अ रवि: । हरि : रमते = हरि-ह् रमते = हरिहि रमते = हरी रमते. । गुरु:= गुरुहु = गुरुउ= गुरू रमते. । इ. इ. इ. -ह् चा हा स्वभाव प्रथमेचे द्विवचन साधताना उत्तम दृष्टीस पडतो. स् हा प्रत्यय एक ही संख्या दाखवितो. दोन ही संख्या जुनाट रानटी आर्य दोनदा एक ही संख्या उच्चारून प्रदर्शित करीत. स= -ह् = : हा प्रत्यय एक देव दर्शविण्यास एकदा लावीत आणि दोन देव दर्शविण्यास दोनदा लावीत तेव्हा, देव + स् +स् अशी द्विवचनार्थक स्थिती आली. स चा -ह् होऊन देव + -ह्+ -ह् अशी स्थिती आली. पुढे -ह् ऊर्फ र् असल्यामुळे पहिल्या -ह ला पाठीमागील अ मुळे पूर्व सवर्णत्व येऊन देव + अ + ह् अशी स्थिती झाली. अनेक रानटीभाषात ह् चा व् आणि व् चा उ होत असतो. तोच स्वभाव रानटी आर्यांच्या ही भाषेचा होता. सबब दुस-या -ह् चा उ होऊन देव +अ+ उ अशी स्थिती झाली. र् चा उ होतो हे अतो रो: या सूत्राकत पाणिनी सांगतो. परंतु र् चा उ का होतो हे तो सांगत नाही. स् चा उच्चार जनाट रानटी आर्यांच्या भाषेत -ह् होता व -ह् = ह् चा व् = उ असा बदल ते करीत हे पाणिनीला माहीत नव्हते. पण स् चा र् होतो व र् चा उ होतो हे तो विचक्षण वैय्याकरण पहात होता आणि जे त्याने भाषेत प्रत्यक्ष पाहिले ते त्याने काळजीपूर्वक नमूद करून ठेविले. हा त्याचा आस्थेवाईकपणा सध्या आपल्या फार उपयोगी पडतो. कारण तो जी स्थिती नमूद करतो व जे बदल दाखल करतो त्यावरून भाषेचा पूर्वींचा इतिहास कळण्यास मार्ग होतो. येणेप्रमाणे देव + अ+ उ अशी स्थिती प्राप्त हो उन द्विवचनाचे देवौ हे रूप पाणिनीकाली व वैदिककाली साधे. देवौ म्हणजे दोन देव. देवौ रूप होताना पहिल्या -ह् चा अ होई व दुस-या -ह् चा उ होई. दुस-या -ह् चा ही कित्येक रानटी आर्य पूर्वसवर्णच करीत, म्हणजे देव + अ + अ अशी स्थिती येऊन देवा असे द्विवचनाचे दुसरे रूप बने.