संस्कृत भाषेचा उलगडा

४. वचने मुळीच नसणे हे सर्वात उत्तम. याच सुधारणेकडे मराठी वगैरे भाषा आस्ते - आस्ते जात आहेत. तीन वचनांची दोन वचने झाली, दोहोंचे यापुढे हजारो वर्षांनी एकवचन होईल आणि नंतर वचनाला अजिात फाटा मिळेल. तिहींची दोन वचने व्हावयाला तीन- चार हजार वर्षें लागली. यावरून मुळीच वचने काढून टाकावयाला किती हजार वर्षें लागतील त्याचा अंदाज करावा.

५. हा पोकळ व अनिश्चित अंदाज करीत बसणे जितके उपयोगाचे आहे त्यापेक्षा संस्कृतात जी तीन वचने आहेत त्यांच्या रचनेचा अभ्यास भाषाशास्त्राला जास्त उपकारक आहे. संस्कृतात सात विभक्त्या आहेत व या साती विभक्त्यांना तीन वचने आहेत. म्हणजे एकंदर २१ स्थाने प्रत्ययांची होतात. या प्रत्ययांचा अर्थ काय व ते शब्दांना कसे जुडत गेले याचा शोध करणे मनोरंजन आहे. वैदिक व पाणिनीय भाषा सप्रत्ययावस्थेत असलेल्या आपणाला माहीत आहेत. वैदिकभाषा ज्या अप्रत्यय भाषेपासून निघाली त्या भाषेचा मासला किंचित अवशिष्ट राहिलेला आहे. अप्रत्यय स्थिती फक्त शर्बद एकापुढे एक उच्चारून वाक्य बनत असे, अशी आपण या अवशिष्ट शब्दांच्या प्रमाणावरून कल्पना करतो इतकेच. तेव्हा शोधाचा प्रारंभ सप्रत्यय जी वैदिकभाषा तिजपासून करणे प्राप्त होते. वैदिक भाषेत शब्दांना सात विभक्त्यांत जे प्रत्यय लागतात त्यांची याद पाणिनीने दिली आहे आणि त्याखेरीज सुपां, सुलुक् इत्यादी सूत्रात व आज्जसेरसुक या सूत्रात आणिक विभक्तिप्रत्यय सांगितले आहेत. स्वौजस इत्यादी सूत्रांतील प्रत्ययांना सुपां सुलुक् इत्यादी सूत्रांतील प्रत्यय बहुलत्वाने येणारे अपवाद म्हणून सांगितले आहेत. याचा अर्थ इतकाच की हे अपवादक प्रत्यय वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषेतील अवशिष्ट म्हणून राहिलेले प्रत्यय होत. उदाहरणार्थ, वैदिकभाषेत देव या शब्दाचे देवौ असे द्विवचन होत असे. परंतु या देवीरूपाप्रमाणेच किंवा त्याहून ही जास्त प्रमाणात देवा असे द्विवचनाचे अपवादक रूप आढळते. मराठीत देवाने हे तृतीयेचे रूप सरसहा आहे. परंतु ज्ञानेश्वरीत वर इतर जुन्या कवितेत देवे असे अपवादक रूप सडकून येते. हे देवे रूप देवाने या रूपाहून जुनाट आहे. त्याप्रमाणेच वैदिक देवा हे द्विवचनाचे रूप वैदिक देवौ या रूपाहून जुनाट आहे. पूर्वंवैदिक व वैदिकभाषेत अकारात पुल्लिंगी देव शब्द असा
चाले :

एक                     द्वि                          बहु
१ देवस्                देवौ, देवा                देवासस्, देवा :, देवे, देवाँ:
२ देवम्                देवौ, देवा                देवान्
३ ( देवया ) देवेन   देवाभ्याम्                 देवेभिस्, देवै:
४ देवाय               देवाभ्याम्                 देवेभ्यस्, देवे
५ देवात्               देवाभ्याम्                 देवेभ्यस्, देवे
६ देवस्य              देवयोस्                    देवनाम्
७ ( देवा ) देवे       देवयोस्                    देवेषु

या रूपातील प्रत्ययाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू वैदिक भाषेहून दुस-या कोणत्याही सगोत्र जुनाट भाषेचे आपल्याला तपशीलवार ज्ञान नाही. अपवादक प्रत्ययावरून एवढे मात्र अनुमान होते की, वैदिकभाषेहून जुनाट अशी एक जुनाट वैदिकभाषा होती. त्या जुनाट वैदिकभाषेत ज्याअर्थी द्विवचनी आ, अनेकवचनीं असस्, तृतीयेचा अयाच्, सप्तमीचा आल् इत्यादी प्रत्यय आहेत त्याअर्थी हे प्रत्यय ऊर्फ शब्दसंक्षेप जुनाट वैदिकभाषेहूनही अति जुनाट अशा पूर्ववैदिक भाषेतून आले असले पाहिजेत. म्हणजे (१) वैदिकभाषा, ( २) जुनाट वैदिकभाषा व (३) अत्यंत जुनाट पूर्ववैदिकभाषा, अशा तीन भाषा एका पूर्वीं एक होऊन गेल्या असाव्या असे अनुमा होते. पैकी वैदिकभाषा व जुनाट वैदिकभाषा या दोन्ही एकाच भाषेची नवी व जुनी रूपे आहेत, जीपासून जुनाट वैदिकभाषेत व वैदिकभाषेत प्रस्तुत प्रत्यय आले ती अत्यंत जुनाट वैदिकभाषा स्वतंत्र निराळी भाषा होती यात मात्र संशय नाही. ही निश्चित अनुमाने गृहीत धरून प्रत्यंयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. बोलणे वचनासंबंधाचे आहे. सबब, मी असे अनुमान करतो की प्रथमेचे स्, आ, किंवा औ व अस् किंवा असस्, हे प्रत्यय एक, दोन व तीन या संख्यांचे वाचक अनुऋमाने आहेत. स् चा उच्चार पाणिनीय भाषेत किंवा सध्या मराठीत जो होतो त्याहून निराळा उच्चार अत्यंत जुनाट वैदिकभाषेत होत असे जवळजवळ -ह् च्यासारखा स् चा उच्चार असे किंवा जवळजवळ विसर्गासारखा स् चा उच्चार असे ; म्हणजे कंठ्य असे. वैदिकभाषेत, अर्थात् पाणिनीय भाषेत स् चा हा कंठ्य उच्चार जाऊन दन्त्य झाला ; तत्रापि त्याच्या कंठ्यात्वाची आठवण बुजाली नव्हती. पदांती दन्त्य स् चा कंठ्य विसर्ग होतो. असा जो नियम पाणिनी सांगतो त्याचे कारण स् चे मूळचे कंठ्यत्व होय. रामस् पठति= राम : पठति हा जो बदल होतो तो का होतो, तर स् हा मूळचा कंठ्य आहे. म्हणजे स् चा कंठ्य उच्चार वैदिकभाषेत इतरत्र यद्यपि लुप्त होऊन दंत्य झाला होता, तत्रापि पदांती तो कंठ्य उच्चार जसा चा तसा च कायम राहिला. याचा अर्थ एवढाच की, रामस् याचा उच्चार राम : असा वैदिक किंवा पाणिनीय काळी होत असे. दन्त्य स् चा कंठ्य विसर्ग का होतो, हे पाणिनीला माहीत नव्हते. मात्र होतो, हे तो नित्याच्या बोलण्यात पहात होता. सबब, तो चमत्कार त्याने नमूद करून ठेविला. येणेप्रमाणे रामस् = राम: हे रूप सिद्ध झाले. रामस् किंवा राम: याचा अर्थ एक राम.