संस्कृत भाषेचा उलगडा

बहुवचन या शब्दाऐवजी अनेकवचन हा शब्द पाणिनीने योजला नाही. पूर्वाचार्यांची बहुवचन ही संज्ञा कायम ठेविली. बहुवचनाच्याऐवजी अनेकवचन असा शब्द पाणिनी योजिता, तर एकाहून अनेक जे द्विवचन त्याचा निर्वाह झाला नसता, रानटी आर्यांना संख्येचे तीन विभाग माहीत होते. एक, दोन व तीन. आपल्याला संख्येचे दोन भाग माहीत आहेत, एक व अनेक. दोनच भाग माहीत असल्यामुळे आपण एकवचन व अनेकवचन अशी दोनच वचने मानतो. त्याप्रमाणेच संख्येचे तीनच भाग करणारे रानटी आर्य एक संख्येकरिता एकवचन, दोन संख्येकरिता द्विवचन व तीन संख्येकरिता त्रिवचन, ज्याला पुढे बहुवचन म्हणू लागले, अशी वचने मानीत. तात्पर्य, रानटी आर्यांना तीनपर्यंतच संख्या माहीत असल्यामुळे, त्यांच्या भाषेत द्विवचन निर्माण झाले व ते रानटी आर्यांचे वंशज जे वैदिक ऋषि आणि पाणिन्यादि संस्कृत आचार्य त्यांना रूढीस्तव तसेच घेऊन मिरवावे लागले. द्विवचनाच्या उत्पत्तीचे हे असे कारण आहे. पहिल्या कलमात जे दोन प्रश्न विचारले होते त्यापैकी एकाचे उत्तर या दुस-या कलमात दिले. आता मराठीत दोनच वचने कशी आली ते सांगतो.

२. तीन या संख्येहून जास्त संख्या मोजता येऊ लागल्यावर आणि संख्येचे एक व अनेक असे विभाग केल्यावर, द्विवचनाची काहीएक जरूरी राहिली नव्हती. परंतु संस्कृत भाषेत द्विवचन नामे क्रियापदे, वगैरे जिकडे तिकडे पसरल्यामुळे, संस्कृत भाषा मोडल्याशिवाय हा रोग नाहीसा होणे शक्य नव्हते. रोगी मरावा तेव्हा नाहीशा होणा-या रोगांपैकी हा रोग होता. रोगी मारून रोग मारण्याचे हे काम महाराष्ट्रयादि भाषांनी केले ब्राह्मण संस्कृत बोलत, तेव्हा ते मेल्याशिवाय किंवा त्यांना सोडल्याशिवाय म्हणजे त्यांची भाषा सोडल्याशिवाय द्विवचनापासून सुटका होण्यासारखी नव्हती. शुद्ध ब्राह्मण, शुद्ध क्षत्रिय व शुद्ध वैश्य यांचा हेवा करणारे जे व्रात्य ब्राह्मण, व्रात्य क्षत्रिय व व्रात्य वैश्य यांनी अनार्य लोकांच्या सहाय्याने शुद्ध ब्राह्मणादीचा उपमर्द केला व त्यांची शुद्ध संस्कृत भाषा सोडून आपली अशुद्ध, अस्पष्ट व मिष्ट प्राकृत भाषा चालू करताना संस्कृतातील द्विवचन व अनेक लकार वगैरे निरुपयोगी लटांबराला फाटा दिला. नवे, राज्य, नवे लोक, नवे राष्ट्र, नवा धर्म व नवी भाषा जेव्हा निर्माण झाली तेव्हा संस्कृतातील द्विवचनाची ही अडगळ कायमची फेकून दिली गेली. अन्यथा परब्रह्माचे उच्छवसित जे वेद व ज्यातील एक स्वर ही चुकला असता ब्रह्महत्त्या केल्याचे पातक लागणार त्या गीर्वाणवाणीतील लाडके द्विवचन शुद्ध ब्राह्मणादि वर्णांच्या हातून उकिरड्यावर फेकले गेले नसते. तात्पर्य संस्कृतातील निरुपयोगी द्विवचन प्राकृत भाषांनी टाकून दिले. अर्थात् प्राकृताची कन्या जी मराठी तीत द्विवचन साहजिकपणेच आले नाही. फक्त एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने राहिली.