मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

चवथ्या वाक्यांत तीनच शब्द शुद्ध मराठी आहेत, व दुंबाला क्रर्दन् (म्हणणे-कडे देणें) हें फारशी संयुक्त क्रियापद योजिलें आहे. पांचव्या वाक्यांत, पहिल्यांदा ह्या अर्थी पहिलें हा शब्द योजिला आहे व तो फारशी अव्वल ह्या शब्दाप्रमाणें हुबेहुब योजिला आहे. पुढील पांचही वाक्यांची व्यवस्था म्हणजे लिहिणा-याच्या मनांत मूळ मजकूर प्रथम फारशी शब्दांच्या व प्रयोगांच्या रूपानें येतो व नंतर मूळ फारशी शब्दांपैकी ठळकठळक शब्द जसेचे तसेच मराठी भाषांतरांत राहून, संयुक्त क्रियापदांचें, शब्दयोगी अव्ययांचे व निपातांचे प्रयोग फारशी प्रयोगांच्या धर्तीवर दियानतराव विजापूरच्या आदिलशहाचा दफ्तरदार असल्यामुळे त्याचें मराठी फारशीच्या धर्तीवर जातें अशी येथें शंका आणितां येईल. परंतु ह्याच वेळचीं शिवाजीचीं पत्रे पाहिलीं असतां ही शंका अवास्तव आहे असें दिसून येईल. प्रस्तुत खंडांतील ३६ वा लेखांक इ. स. १६७७ त शिवाजीनें काढिलेलें एक आज्ञापत्र आहे. ह्या लेखांतील १ बिन, २ फिरंगोजी, ३ हवालदार, ४ इमारत, ५ मजकूर, ६ हवाला, ७ सरंजामी, ८ मजमूदार, ९ तैनात, १० तपशील, ११ खासा, १२ सालीना, १३ चाकर, १४ रिवाज, १५ हुजूर, १६ पोता, १७ आसासी, १८ नून, १९ वा॥, २० पा।, २१ रास, २२ सदर्ह, २३ बाकी, २४ वजा, २५ वजावाटा, २६ बेरीज, २७ मजुरा, २८ सुरू, २९ सूद, ३० बार, ३१ व इतकें शब्द फारशी आहेत व ह्यांपैकीं कित्येक शब्द दोन दोनदा तिनतिनदा आले आहेत. हवालदार इ इमारत इ कोट इ उटलूर, हा प्रयोग शुद्ध फारशी आहे. केदारजी बिन फिरंगोजी, इमारतमजकूर, हवाला देणें, सरंजामी करणें, खासा तैनात सालीना, हुजूरपोतापैकीं, रास केले असेत, वजा करणें, बजावटा, बेरीज घेणें, मजुरा असें, सुरू सूद, बार, हे सर्व प्रयोग फारशी आहेत लेखाच्या प्रारंभींचा मायना तेवढा शिवाजीनें संस्कृत बनविला आहे. परंतु त्यांतहि, यासि आज्ञा केली ऐसी जे, हें ऊरा हुक्म फर्मूद के, ह्मा फारशी शब्दांचें भाषांतर आहे. यासि आज्ञा करतो ह्याअर्थ अस्मै आज्ञां करींति, असा प्रयोग संस्कृतांत किंवा महाराष्ट्रांत होत नाहीं, एनं आज्ञापयति, असा होतो. आतां इतकें खरें आहे कीं, दियानतरावाच्या पत्रांतल्यापेक्षां शिवाजीच्या पत्रांत मायन्यांतले शब्द बरेच संस्कृत आहेत. परंतु शिवाजीच्यापूर्वी तीनशें वर्षे फारशी शब्दांचा व प्रयोगांचा जो बेसुमार भरणा मराठींत होत होता तो राजव्यवहारकोशादि साधनांनीं भाषा सुधारणा-या ह्या शककर्त्यालाहि पदोपदीं स्पर्श केल्यावांचून राहिला नाहीं. शिवाजीच्या नंतर मराठ्यांचा व्याप सर्व हिंदुस्थानभर झाल्यामुळें व चोहोदिशांनीं मुसुलमानी संस्थानांशींच व्यवहार करावयाचा असल्यामुळें मराठी भाषेंत रूढ झालेले फारशी शब्द कायम राहून, शिवाय आणीक हजारों फारशी शब्द ह्या भाषेत सारखे शंभर वर्षे शिरत होते. परंतु अठराव्या शतकांत पेशव्यांच्या अमलांत झालेला हा फारशी शब्दांचा शिरकाव चौदाव्या, पंधराव्या व सोळाव्या शतकांतल्याप्रमाणें मराठीला मागें सारून होत नव्हता, तर मराठीची मर्जी संभाळून होत होता. हा प्रकार कसा होत होता, ह्याच्या विशदीकरणार्थ शिवाजीच्या पूर्वीचा एक फारशीं-मराठी लेख देतों व नंतरचा पेशवाईतला एक देतों.