मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

समान अशरीन साल १४ सवालीं म्हणजे २५ मे १७२७ स सुरूं झालें व २४ सवाल म्हणजे २३ मे १७२८ स संपलें. अर्थात् ह्या सालांतील पहिलें कलम २९ न देतां ३९ दिलें पाहिजे; व मूळ रोजनिशींत तें तसेंच असेल ह्यांत संशय नाहीं. कारण २९ वें कलम इ. स. १७२७ च्या आक्टोबरांतील आहे व ३९ वें कलम १७२७ च्या जूनांतील आहे. महिन्यांच्या अनुक्रमानें पाहिलें म्हणजे मूळ रोजनिशींत छापील रोजनिशींतील २९ पासून ४० पर्यंतच्या कलमांचा अनुक्रम ३९, ३२, ४०, ३३, २९, ३०, ३१, ३४, ३५, ३६, ३७, ३८, असा असला पाहिजे. छापील रोजनिशींतींल १०७ पृष्ठापासून ११९ पृष्ठापर्यंतच्या सलास खमसैन सालांतील कलमेंहि अशींच उलट लागलेली आहेत. २४७ पासून २५९ पर्यंतचीं कलमें २२८ पासून २४६ पर्यंतच्या कलमांच्या अगोदर पाहिजेत. तेव्हां ज्या रोजनिशींत, तारखांचा अनुक्रम तर राहूं द्याच, परंतु महिन्यांचाहि अनुक्रम असा वाकडातिकडा झाला आहे ती रोजनिशी अस्सल कशी समजावयाची? मूळ रोजनिशी म्हटली म्हणजे तींत हा असला गवत्या गोंधळ कसा असूं शकेल? अर्थात् ज्या रोजनिशींवरून ही छापील रोजनिशी बनली गेली, ती अस्सल नसून जुन्या अस्सलावरून व इतर माहितीवरून बनविलेली संक्षिप्त नक्कल असावी, असा सशंय येतो. हा संशय दुस-या एका बाबींवरून दृढ होतो; ती बाब ही. अमात्यांची माहिती देतांना ७३ व्या पृष्ठाच्या प्रारंभीं हें वाक्य आहेः- “प्रतापसिंह महाराज यांचे खासगी दप्तरांत याद आहे त्यावरून दाखल केलें.” ह्या वाक्यावरून असें निष्पन्न होतें कीं, इ. स. १८४८ त सातारचें राज्य गेल्यावर प्रतापसिंहाचें खासगी दफ्तर इनाम कमिशनाच्या हातीं आलें व त्यावरून ही रोजनिशी- जिच्यावरून छापील रोजनिशी छापिली गेली- बनली गेली. अर्थात्, वर्तमान छापील रोजनिशी शाहूमहाराजांच्या मूळ अस्सल रोजनिशींतील वेचे घेऊन तयार केली असा जर कोणाचा विश्वास असेल, तर त्याला बिलकुल आधार नाहीं हें स्पष्ट होतें व वर घेतलेला संशय निश्चयाच्या पदवीला पोहोंचण्याच्या लायकीचा होतो. खरा प्रकार बहुशः असा असावा की १८४८ नंतर इनाम कमिशनच्या दफ्तरांतून पेशव्यांच्या राशियतीची एक रोजनिशी बनविण्याचा मुंबई सरकारचा हुकूम सुटला असावा व त्या हुकमाबरहुकूम ही पंचवीस हजार लेखी पानांची रोजनिशी तयार झाली असावी. अशी ह्या रोजनिशीसंबंधानें (..) हकीकत असावी, अथवा बहुशः आहे. ही रोजनिशी इनाम कमिशनच्या पुणे येथील दफ्तरांत तीस चाळीस वर्षे अज्ञात पडल्यावर तिच्याकडे काहीं मंडळींची दृष्टि गेली व तिचे पुनरुज्जीवन होण्याची वेळ आली. अशी जरी ह्या रोजनिशीची कथा असावी असें वाटतें, तथापि तींत बरीच अस्सल माहिती असावी अथवा आहे ह्यांत फारसा संशय नाहीं. तरी देखील, हा अस्सलपणा निर्भेळ आहे असें म्हणतां येत नाहीं. कारण, प्रतापसिंहाच्या खासगी दफ्तरांतील ब-याच सटरफटर यादी ह्या रोजनिशींत घुसडल्या आहेत. ह्या यादींतील पुष्कळ कलमें अस्सल कागदपत्रांच्या आधारानें तयार केलेलीं नाहींत, इतकेंच नव्हे, तर कित्येकांना श्रुतीखेरीज दुसरा आधार नाहीं. कित्येक कलमें ग्रांट डफच्या इतिहासावरून घेतलीं आहेत. उदाहरणार्थ, ७७ व्या पृष्ठावरील जयसिंग जाधवाचें कलम पहा. “जयसिंग जाधव कधीं नेमलें ती तारीख समजत नाहीं, परंतु सन १७०९ यांस सेनापति असें लिहिलें आहे" प्रतापसिंहाच्या यादींत इसवी सन यावा हें आधीं पहिले आश्चर्य! जयसिंग जाधव व धनाजी जाधव ह्या दोन भिन्न व्यति होत्या हें ह्या यादींत म्हटलें आहे हें दुसरे आश्चर्य! आणि हें कलम विश्वासार्ह आहे असें रा. वाडांस वाटलें हे तिसरें आश्चर्य! परंतु सर्वांत मोठे आश्चर्य हें कीं, शाहू राजाच्या रोजनिशींत अवांतर माहिती व तीहि चुकीची घालण्याची बुद्धि वाडांस व्हावी व आपण चूक करीत आहों हें ह्या विद्वानांस न कळावें! येणेंप्रमाणें अस्सल कागदपत्र जसेच्या तसेच न छापतां त्यांत अवांतर माहिती घालून विस्तार करण्याची बुद्धि संपादकांना झालीं, हें ह्या रोजनिशींतील पहिले व्यंग आहे. तसेंच ह्या रोजनिशींत संक्षेपाचेंहि व्यंग आहे. (१) मूळ शाहू राजाची अस्सल रोजनिशीं, (२) तीवरून तयार केलेली इनामकमिशनची रोजनिशी, (३) व तींतून वेंचून काढिलेली ही छापील रोजनिशी, अशी ही तीनदां पिळून काढलेली निःसत्त्व रोजनिशी आहे. ह्या रोजनिशींतहि संपादकांनीं खेळखंडोबा थोडाथोडका केलेला नाहीं. महिनेवार व तारीखवार तर कलमें लाविलीं नाहींतच. परंतु वेचे काढतांना आपण ते कोणत्या धोरणावर काढतों ह्याचाहि नियम राखिलेला नाहीं.