मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

प्रस्तावना

१. इतिहासाचीं साधनें अव्वल व दुय्यम अशीं दोन प्रकारचीं असतात. स्थूल मानानें अस्सल लेख अव्वल प्रतीचे व त्याव्यतिरिक्त लेख दुय्यम प्रतीचे. अस्सल लेखांत पत्रें, यादी वगैंरेचा व तव्द्यतिरिक्तांत बखरी, टिपणें वगैरेंचा समावेश होतो. नीळकठराव कोर्तन्यांनीं नुसत्या बखरी छापिल्या. काव्येतिहाससंग्रहकारांनीं दोन्ही प्रकारचीं साधनें निरनिराळी छापिलीं, प्रभू लोकांच्या इतिहासाच्या साधनकारानीं दोन्ही साधनांचा अव्यवस्थित संग्रह केला. प्रो. फारेस्ट यानींहि तोच मार्ग स्वीकारिला आहे. ज्या ग्रंथांत शिवाजीची एक गबाळ बखर त्यांनीं प्रसिद्ध केली त्यांतच इतर अस्सल लेखांचाहि समावेश झालेला आहे; व प्रस्तावनेंत अस्सल लेखांपेक्षां सदर गबाळ बखरीला जास्त महत्त्व दिलेलें आहे. सदर बखरीची योग्यता काय हें न कळल्यामुळें हा प्रकार झाला हें उघड आहे. रा. पारसनिसांच्या भारतवर्षात अस्सल पत्रांपेक्षां बखरी व कैफियतीं ह्यांचाच भरणा जास्त आहे. पारसनिसांचा ब्रह्मेंद्राचा पत्रव्यवहार, व रा. खरे ह्यांचें पटवर्धनी दफ्तर ही मात्र निर्भेळ अस्सल लेखांचीं भांडारें आहेत. मी छापिलेलीं पहिलें, तिसरे, पांचवें व आठवें खंड हींहि ह्याच वर्गांत मोडतात. माझ्या दुस-या व चवथ्या खंडांत दोन्ही प्रकारांची कचित् भेसळ आहे.

२. अलीकडील तीस वर्षात छापिलेल्या ह्या दोन्हीं प्रकारच्या साधनांत एक विशेष आहे. तो हा कीं, तीं जशीं सांपडलीं तशींच छापिलीं जात असतात. त्यांत संक्षेप किंवा विस्तार करण्याची बुद्धि कोणालाहि झाली नाहीं. हीं बुद्धि जोपर्यंत झाली नाहीं तोपर्यंतच साधनाचें खरें स्वरूप कायम राहून, पुढें होणा-या इतिहासचिकित्सकांना मराठ्यांच्या इतिहासाचा निःशंक अभ्यास करतां येणार आहे.

३. ही साधनें लोकांपुढे मांडताना निरनिराळ्या गृहस्थांनीं निरनिराळे मार्ग स्वीकारलेले आहेत. कोणी ह्या साधनांना अर्थनिर्णायक टीपा देतात; कोणी लहानशी परिचायक प्रस्तावना लिहितात; व कोणी ह्यापैकीं काहीं एक न करितां नुसतीं उघडीं बोडकीं साधनेंच लोकांच्या सेवेस हजर करितात. कोणी ह्या तिघांच्याहि पुढें जाऊन ह्या साधनांपासून मिळणारी संगतवार हकीकत आपल्या पुस्तकाला जोडतात. कित्येक असेहि आहेत कीं जे वाटतील तीं निराधार विधानें ह्या हकीकतींत घुसडून देतात. सारांश, अव्यवस्थित रीतीनें मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचें प्रकाशन, मंडण व संकलन आजपर्यंत होत आलें आहे. खरे पाहिलें तर, ह्या साधनांचे प्रकाशन ब-याच निराळ्या प्रकारानें झाले पाहिजे. केवळ उघडीं बोडकी साधनें लोकांपुढे मांडणें यद्यपि प्रकाशकाला अनेक त-हांनीं सकृद्दर्शनीं निरुपद्रवी असतें, तत्रापि तें आस्थेनें अभ्यास करणा-या मंडळीस अनेक कारणांनीं बराच वेळ फसवणुकीचें होतें व वरवर वाचून अनुमानें काढणा-यांस तर कायमचें फसवतें. उदाहरणार्थ रा. वाड ह्यांनी तयार केलेल्या व रा. पारसनीस ह्यांनीं पर्वा छापिलेल्या शाहू महाराजांच्या रोजनिशींतील वेचे घ्या. ह्या पुस्तकाला सूचना, विनंति, उपोदघात किंवा प्रस्तावना ह्यांपैकीं कांहींच नसल्यामुळें, (१) मूळ रोजनिशीं किती व कोण्या कारकुनांनीं लिहिली, (२) मूळ रोजनिशीचा आकार अथ पासून इतिपर्यंत एक सारखा आहे किंवा लहान मोठा आहे, (३) मूळ रोजनिशी सुटी आहे किंवा बांधलेलीं आहे, (४) मूळ रोजनिशींतील कांहीं कागद गहाळ, फाटलेले अगर भिजलेले आहेत किंवा ती सबंद शाबूत आहे, (५) रोजनिशी मूळ आहे किंवा नक्कल आहे, वगैरे तपशील कळण्याला कांहींच मार्ग रहात नाहीं. हा खुलासा झाला असता, म्हणजे हीं रोजनिशी अव्वल महत्त्चाची आहे किंवा दुय्यम महत्त्वाची आहे हें ठरवितां आलें असतें. सदर रोजनिशी ज्या स्वरूपानें बाहेर आली आहे, त्यावरून ती अस्सल नसावी अशी शंका उत्पन्न होते. कां कीं, ह्या छापील रोजनिशींतील एकाच मुसलमानी वर्षांतील पुष्कळ कलमें अनुक्रमवार लागलेलीं नाहींत उदाहरणार्थ, १२ व्या पृष्ठापासून १५ व्या पृष्ठापर्यंत दिलेले समान अशरीन मया व अलफ हें साल घेतो. ह्या सालचीं २९ पासून ४० पर्यंत व सुद्धां १२ कलमें दिलेलीं आहेत.