मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

२०. युरोपीयन इतिहासकारांचा दुसरा एक अर्धवट ग्रह असा आहे कीं, कोणताहि मनुष्यसमाज अनंतकाल राहूं शकणार नाहीं. अलीकडील हजार वर्षातील पश्चात्प्रलयीन सर्व राष्ट्रें प्रत्येकीं फारतर हजार हजार दीड हजार वर्षे गोंधळ घालून अस्त पावलेलीं आहेत व कोणताहि समाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत शुद्ध टिकलेला आढळून येत नाहीं; तेव्हां, झाडून सर्व समाज भंगुर आहेत, असा ह्या इतिहासकारांचा समज आहे. परंतु लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ध्रुवसिद्धान्त जर साधार मानला---निराधार मानण्याला सबळ कारण दिसत नाहीं,---तर पृथ्वीच्या पाठीवर पूर्वप्रलयीन काला-पासून वर्तमानकालापर्यंत अव्याहत टिकलेले कांहीं मनुष्यसमाज आहेत,असें कबूल करावें लागतें. सामान्यत: प्रस्तुतचा भारतवर्षांतील आर्यसमाज व विशेषतः ब्राह्मणसमाज आज बारा पंधरा हजार वर्षे अव्याहत चालत आला आहे. तसेंच, जरदुष्ट्रप्रणांत धर्माचें अवलंबन करणारा इर्यसमाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत आधुनिक मुम्बापुरस्थ पारसीकांच्या रूपानें अंशमात्रेंकरून हयात आहे. भारतवर्षीय आर्यांच्या मानानें हा इर्य समाज अतिच क्षुद्र आहे; परंतु तो हयात आहे, ही बाब निर्विवाद आहे, ह्या दोन समाजांखेरीज, पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत ज्यांची अव्याहत परंपरा नाममात्रेंकरून स्थूल मानानें दाखवितां येईल, असे यूरोपांतीलहि कांहीं समाज आहेत. देवांचें शत्रु जे द्नु, दस्यु, रक्षस्, यातु, ओह, वगैरे अनार्य त्यांचेच वंशज Danes, Deutsch, Russie, Jutse, Angles वगैरे असावेत, अशी कल्पना धांवते. आतां ह्या यूरोपीयन अनार्य लोकांत बेटीव्यवहारानें बहुत संकर झालेला आहे. परंतु याचें मूळ पाहूं गेलें असतां, तें त्यांच्या वेदकालीन नांवांत सांपडण्यासारखें आहे, असें वाटतें भारतीय आर्यांच्या प्रमाणें हे पाश्चात्य समाज शुद्ध राहिले नाहींत, याचें कारण असें आहे कीं, त्यांच्यांत चातुर्वर्ण्याची बेमालुम पद्धत नव्हती व ते आचारहीन होते. सारांश, ज्याअर्थी भारतीय आर्याचा समाज पूर्वप्रलयीन कालापासून आतांपर्यंत जशाचा तसाच शुद्ध राहिलेला असून कोट्यावधि व्यक्तींनीं भरलेला आहे, त्याअर्थी No people may hope to live eternally हा जो Helmolt चा सिद्धान्त (The World’s History) तो निराधार आहे, असें विधान करणें प्राप्त आहे. हेल्मोटचा सिद्धान्त अनार्य राष्ट्रांना लागू होतो परंतु चातुर्वर्ण्यानें व आचारानें राहाणा-या आर्यांना गतकालासंबंधानें तर तो बिलकुल लागू पडत नाहीं. भविष्यकालासंबंधानें निश्चयात्मक भाकित करण्याचा अधिकार पाश्चात्य किंवा पूर्वात्य इतिहासज्ञांपैकीं कोणालाच नाहीं.

२१. यूरोपीयन इतिहासकारांचा तिसरा एक ग्रह असा आहे कीं, Danes, Deutsche, Russie, juts, Angles, वगैरे यूरोपांतील प्राचीन व अर्वाचीन समाज आर्य आहेत. हा ग्रह प्रामुख्येंकरून भाषासाम्यावर बांधलेला आहे. परंतु, केवळ भाषेवरून जातिनिर्णय करणें फारच भ्रामक असतें. युद्धांत पराभव पावून अंकित झालें असतां, मनानें व समाजशक्तीनें दुर्बल असे रानटी लोक त्यांची भाषा स्वीकारतांना दृष्टीस पडलेले आहेत; इतकेंच नव्हे तर, विजयी रानटी लोक जिंकलेल्या संस्कृत लोकांची भाषा स्वीकारतांनाहि आढळून येतात. सारांश, भाषेवरून जातिसंबंध निश्चयानें ठरवितां येत नाहीं. ऋक्संहितेंतील उल्लेखावरून असें दिसतें कीं, दनु, दस्यु, रक्षस् व यातु हे देवांचे पूर्वप्रलयीन कालापासून शत्रु आहेत. पूर्वप्रलयीन कालीं मेरुपर्वतावर अथवा उत्तर ध्रुवावर नांदत असतां देवांच्या शेजाराला हे दनु वगैरे लोक होते. वारंवार घसट पडल्यामुळें देवांचे शब्द व भाषा ह्या रानटी दनु, दस्यु वगैरे लोकांनीं उचलली असावी. दस्यु वगैरे शब्द ऋक्संहितेंत हिंदुस्थानांतील भिल्ल, खोंड वगैर रानटी लोकांस आर्य लोक लावीत, असें यूरोपीयनांचें म्हणणें आहे, परंतु दनु, दस्यु, रक्षस् व यातु ह्या नांवाचे लोक केव्हांहि भारतवर्षांत होते असें म्हणतां येत नाहीं भिल्ल, कोळ, खोंड यांना दनु, दस्यु, रक्षस् हीं नांवे जर आठ हजार वर्षांपासून लाविलीं जातीं, तर तीं आतांहि त्यांच्या नांवांत बदल होऊन आढळून येतीं. परंतु, त्यांचा हिंदुस्थानांतील रानटी लोकांच्या भाषांत बिलकुल पत्ता लागत नाहीं. तेव्हां दनु, दस्यु रक्षस् हीं नावें यूरोपांतल्या आधुनिक राष्ट्रांच्या पूर्वप्रलयीन पूर्वजांचींच असावीं. हे चारी लोक पूर्वप्रलयीन कालीं उत्तरध्रुवाच्या आसपास आर्यांच्या म्हणजे देवांच्या शेजारीं रहात असावे.