Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
११. History is past politics and politics is present history हें भ्रामक सूत्र तोडून टाकलें, म्हणजे इतिहासाचा विषय काय व प्रांत कोणता, तें यथाशास्त्र कळण्याचा मार्ग खुला होतो; आणि मानवसमाजाचें अखिल चरित्र हा इतिहासाचा विषय व वर्तमान क्षणाच्या पाठीमागील सर्व गतकाल हा त्याचा प्रांत, अशी व्यापक दृष्टि स्वीकारावी लागते. राजकीय उलाढाली घ्यावयाच्या व सामाजिक सोडावयाच्या, किंवा हजार वर्षांपलीकडील हकीकत द्यावयाची, व पांच वर्षांअलीकडील टाकावयाची, असा संकुचित भेदभाव रहात नाहीं तसेंच वर्तमानकाळ क्षणमात्रावस्थायी असल्यामुळें, वर्तमान इतिहास ह्या शब्दांपासून काहीं एक बोध होत नाही; आणि भविष्यकाल अनागत असल्यामुळें, भविष्येतिहास हा शब्द वायफळ ठरतो. सारांश, मानवसमाजांत गतकालीं घडलेल्या उलाढालींची हकीकत देण्याचें काम इतिहासाचें आहे, हा सिद्धान्त ग्रहण करणें अवश्यक होतें.
१२. इतिहासाचा विषय व इतिहासाचा काल यांचा निर्बंध ठरल्यावर, आणीक एका महत्त्वाच्या बाबीचा खल करणें अपरिहार्य होतें. ती बाब स्थलाची होय. एकंदर मानवसमाजाचें वसतिस्थान ही विस्तीर्ण पृथ्वी आहे. तेव्हां, त्याच्या इतिहासाच्या कक्षेंत पृथ्वीवरील सर्व समाज आले पाहिजेत, मग ते समाज पूर्वेकडील असोत किंवा पश्चिमेकडील असोत. तत्त्वत: हें विधान सर्व इतिहासकारांना मान्य असतें. परंतु, कृतींत फारच फरक दिसतो. जगाचा इतिहास लिहितांना अथवा इतिहासाच्या तत्त्वाचें प्रणयन करतांना पौर्वात्य व पाश्चात्य असे सर्व समाज जमेंत घेण्याचा आव हे इतिहासकार घालतात आणि साक्षात् कृतींत पहावें, तर जुन्या व नव्या दहा पांच पाश्चात्य राष्ट्रांच्या इतिहासापलीकडे जात नाहींत. The east is stationary and the west alone is progressive, असें एक ह्या इतिहासकारांचें सूत्र आहे; आणि ह्याच्या जोरावर आपल्या एकदेशीपणाचा हे लोक बचाव करूं पहातात. पूर्वात्य समाज स्थाणु असल्यामुळें, त्यांना इतिहासच नाहीं, अर्थात्, त्यांना प्रागतिक देशांच्या इतिहासांत गणतां येत नाहीं, असा कोटिक्रम ह्या लोकांनीं लढविलेला प्रसिद्ध आहे ह्या कोटिक्रमांत तथ्यांश कितपत आहे, तें अवश्यमेव पाहिलें पाहिजे.
१३. सदर कोटिक्रमाची मुख्य मदार प्रगति ह्या शब्दावर आहे. तेव्हां, पाश्चात्य इतिहासकारांच्या मतें ही प्रगति म्हणजे काय तें सांगितलें पाहिजे. गति दोन प्रकारची असते--अधम किंवा उत्तम. पैकीं उत्तम जी गति तिला प्रगति म्हणतात. समाजाची उत्तम गति म्हणजे आत्यंतिक नीतिमत्तेकडे, आत्यंतिक बुद्धिमत्तेकडे व आत्यंतिक संपन्नतेकडे समाजाची जी प्रवृति ती. ह्या तीन मत्तेकडे जो समाज जात असतो, तो समाज प्रागतिक व जो जात नाही तो अप्रागतिक. प्रागतिक अवस्था संपादन करण्याला मुख्य साधनें, पाश्चात्य समाजांत दोन मानिलीं जातात:-- एक युयुत्सुता व दुसरें सुयंत्र राज्यव्यवस्था. हीं दोन साधनें ज्या समजानें संपादिलीं नाहींत, त्या समाजाला प्रगतीच्या मार्गाला लागतां येत नाहीं; अर्थात् त्याला प्रागतिक म्हणतांहि येत नाहीं. थोडक्यांत सांगावयाचें म्हटलें तर, Morality, Rationalism and Affliuence, fostered and realised under constitutionalism pushed by Militarism अशी आधुनिक यूरोपीयन इतिहासकारांची प्रागतिक अवस्थेची व्याख्या आहे. Morals, Rationalism, Wealth, Constiutionalism व Militarism ह्यांवर यूरोपांत जे इतिहास झालेले आहेत, ते पाहिले असतां, मीं दिलेलें हें लक्षण बरोबर आहे असे दिसून येईल.