[४]                                                                                 श्री.                                                                             १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. त्रिवर्ग चबुत्र्यावर बसलों. चौथे रघोत्तमरावही होते. मीर अलम बोलूं लागले कीं, नवाबाची प्रकृत प्रकारची झाली, जो येतो ते तोडणी लावितो, कोणांत कोणी नाहीं, एक इकडे ओढतो, एक तिकडे ओढतो, हरएकाशीं तकरार करणें बोलणें यांत मर्जी बरहम होते, आतांच तुह्मांशीं एके प्रकारचेंच बोलूं लागले, मी उठून कानांत सांगितलें कीं आह्मीं एकीकडे बसून तहनाम्याचा मवाजहा करून हजरतीस अर्ज करूं ह्मणून बोलून तितकीच गोष्ट राहविली, त्यास हा रियासतीचा मुकदिमा एकाकडे काम सोंपल्याखेरीज कसा गाडा चालेल? राजानीं यांचे गायबांना नालिष करणें ठीक नाहीं, रोबरोच करितो, सरकारचा ऐवज बाकी मामलेदार व ताहुदवाले वगैरेकडे येणें त्यास निकड होत नाही, तुह्मांस मुरुवत फार त्यास काय करावे यास्तव एकाचे गळी घालावें, अमक्यानेंच करावें असेंही नाही, जो खावदाचे मर्जीस येईल त्यास, आंजमखान यांचे मनांत दिवानीचें काम करावें असें आहे ह्मणून ऐकितों, त्यास हेंच उत्तम आहे. शफतपूर्वक सांगतों कीं यांची ताबेदारी पाहिजे तशी करूं, यांत बालबराबर तफावत येऊं देणार नाहीं, जे नेक सुचले ते सांगूं, त्याचे करण्यास षरीक राहू. एके साईस लागल्यानें खावंदाचे दौलतीस रोनंक येईल, याजकरितां इतकें बोलतों. याजवर रेणूराव बोलले कीं, रावजीनीं मनःपूर्वक खुलाशानें सांगितलें असतां सर्व होतें. याप्रमाणें सिद्धसाधक होऊन बोलूं लागले. त्यास उत्तर दिलें कीं, नवाबांनी सर्व पाहिलें, अनुभवही फार आहेत, आमचे तीर्थरूप दौलतखाही करीत आले हें सर्व हजरतीस माहित, आमच्यानें जें झालें तें केलें, याचा बयान कशास? वय लाऊन हजरत बुजुर्ग कोणी सांगावें; असें नाहीं, परंतु आह्मास असें दृष्टीस पडतें कीं आह्मीं कोण याची ओळख देखील हजरतीस राहिली नाहीं, सर्व प्रकारें ना दौलतखाहीं यांनीं केली असें समजाविणारांनीं समजाविलें, तेच मनांत भरून ओळख टाकलीशी दिसतें, तुमचें बोलणें आणि हजरतीचे बोलण्यास कांहींच मिळत नाहीं, यांत काय समजावें ? तेव्हां बोललेः--तुह्माविषयीं कायं मनांत यावयाचें ? जर मनांत कांहीं नाहीं तर ते दिवशीं तुमचे समक्षच बालिले कीं, मदारुलमहाम यांचा करार होता कीं, कांहीं मुलुखाविषयीं ह्मणूं नये.