[२]                                                                                 श्री.                                                                             १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. पूर्वीं नवाबाकडे जाणें झालें, त्यावेळेस नवाब बोलिले कीं, मुलूख वगैरे कांहीं बोलूं नये असा मशरुल महाम यांचा शफतपूर्वक कोणा एकाशीं करार असतां ही गोष्ट कशी झाली? याचा जबाब राजे रेणूराव व मीरअल्लम व रघोत्तमराव जवळ असतां दिला; परंतु कोणी याजवर उत्तर न दिलें. हा मजकूर पेशजी तपशीलवार सेवेसी लिहिलाच आहे. नंतर वर्तमान ऐकिलें कीं, नवाबांनी त्रिवर्गांस एकांती पुसिलें कीं, गोविंदराव कृष्ण यांचे तर ह्मणण्यांत कीं, लढाईची शर्त मध्यें होती आणि मी बोलतच होतों, परंतु तसें न घडलें. तेव्हां तें काय मंजूर ? तुमचे तर सागण्यांत कीं, लढाई झाली तरी मुलूख मागणार नाहीं, यास आणि त्याचे बोलण्यास कांहींच मिळत नाहीं. याचें उत्तर त्रिवर्गांनीं केलें कीं, आह्मांशी आणि मशरुल महाम यांशी गोविंदराव भगवंत यांचे विद्यमानें पक्कें बोलणें झालें कीं, लढाई झाली यावरही मुलकाचें बोलूं नये, मामलतीचे वाजवी जाबसाल करून द्यावे, मशरुलमुलूख यास काढावें, हा करार. याजवर त्यांचें आमचें बोलणें ठरून यादी ठरल्या. बोलण्यांत शफतपूर्वक आले. मगर यादींवर करार करावा इतकियांत गोविंदराव कृष्ण यांचें पत्र त्यास आलें. मा।। तसेंच राहिलें. काय त्यांनी लिहिलें असेल तें असो. आह्मास समजलें नाही. करार होणें राहिला. मगर बोलण्यांत शफतपूर्वक आलें आहे. याजवर आतां बदलून गोष्ट सांगितल्यास अलाहिदा गोष्ट आहे. दौलतमंद यांची पंचायत काय ? बाजूत कुवत आहे तर सर्व जाबसाल दुरुस्तीनें होतील, याप्रमाणें आपली गोष्ट बनावून दाखविण्यास अशी तकरीब करून समजावलें. आपली सुखराई व्हावी ह्मणून बनावणी केली. श्रीमंत आणि मदारुल महाम वजनावर कायम नाहींत. गोविंदराव कृष्ण यांनीं हितशत्रुत्व केलें असें समजावून आपले मिरवणुकीची चाल घातली. याप्रमाणें खचीत वर्तमान याजवर मीरअल्लम नवाबास दिलासा देऊन बोलले की, हजरतीनीं कांहीं काळजी करूं नये. दोस्तीचे पोटांत श्रीमंतांनीं मुलूख सोडल्यास बरेंच झालें. नाहींतर इंग्रजांस षरीक करून करार न करण्याची तजवीज करतों. एवढ्यावरून नवाबाचे डोळे फिरून जाऊन मीरअल्लम व रेणूराव प्रिय वाटूं लागले. याचा दाखलाही पुढें येत गेला. तो अलाहिदा लिहिला आहे. त्यांजवरून ध्यानांत येईल. र॥ छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.