प्रस्तावना
प्रस्तुत खंडांत खर्ड्याच्या लढाईनंतर मराठे व निजाम ह्यांच्यामध्यें तहप्रकरणीं जीं बोलणींचालणीं झालीं त्यांचा वृत्तांत आहे. नाना फडणीसांच्या कारकीर्दीत परदरबारीं मराठ्यांचे वकील केवढ्या इभ्रतीनें, डौलदारीनें व तालेदारीनें बोलणें करीत असत, ह्याचा मासला ह्या पत्रांत उत्तम पहावयास मिळतो. प्रस्तुत खंडांत छापिलेलीं पत्रें नाना फडणीसांच्या मेणवली येथील दफ्तरांत असलेल्या अस्सल पत्रांच्या नकला आहेत. अशीं हीं पत्रें मजजवळ सुमारें दहा बारा हजार आहेत. अर्थात् मेणवली येथील दफ्तराचा एक तृतीयांश काळे यांचें दप्तर छापलें म्हणजे छापल्यासारखाच आहे.


मुखपृष्ठ

सरकार श्रीमंत राजश्री माधवराव नारायण पंत प्रधान. सुरु सीत तिसैन मया व अल्लफ, छ १७ जिलकाद, ज्येष्ठ वद्य तृतीया, शुक्रवार, शके १७१७, राक्षस नाम संवत्सरे, षुरू मृगसाल तागाईत छ १६ माहे रबिलाखर, आश्विन वद्य तृतीया, शुक्रवार, सन फसली १२०५ मुक्काम भागानगर. येथून पुढें पत्रें लिहिणें बंद झालियाची सबब अखेरीचे पानावर असे.