प्रस्तावना

इतिहासाच्या वाचनानें स्वदेशप्रीति उत्पन्न होते, ह्या आशेनें कित्येक उतावीळ वाचक ह्या पत्रांचें सेवन करतील; परंतु त्यांच्या ह्या खोट्या आशेवर माझी बिलकुल भिस्त नाहीं. खात्रीनें हेहि लोक मला लवकरच सोडून जातील. ज्यांच्या वाचनानें स्वदेशप्रीति उत्पन्न होते, ज्यांच्या निदिध्यासानें राष्ट्रांचा उद्धार होतो, तीं हीं पत्रे नसून, ह्या पत्रांपासून उत्पन्न झालेला जो इतिहास तो होय. इतिहासापासून मिळणारें फळ ऐतिहासिक पत्रांपासून कदापि मिळणार नाहीं. सारांश, हे दोन्ही प्रकारचे लोक माझ्या ह्या प्रयत्नाला लवकरच कंटाळतील. सध्यां कोठें चार खंडें छापून झालीं आहेत नाहींत तोच अशा प्रकारचा ध्वनि क्वचित् कोठून कोठून ऐकूं येतो. मला तर अद्याप शंभर दीडशें खंडे छापावयाचीं आहेत. तेव्हां शेवटपर्यंत तग धरणारा, स्तुतिनिंदेला न जुमानणारा, लोकांच्या औदासिन्याला भीक न घालणारा, बोद्धमत्सरानें दूषित न होणारा, असा वाचकसमूह जवळ केल्यावांचून तरणोपाय नाहीं. इतिहासज्ञांच्या समानशील समाजाव्यतिरिक्त असा वाचकसमूह इतरत्र कोठें मिळणार आहे? इतरत्र कोठेंही मिळणार नाहीं अशी पक्की खात्री होऊन, ह्या पत्रांचा सत्कार करण्याची विनंति महाराष्ट्रांतील इतिहासज्ञांस मी करीत आहे. श्रीमंत, गरीब, परीक्षित, अपरीक्षित, नोकर, स्वतंत्र अशा सर्व समाजांत इतिहासाच्या साधनांचा संग्रह करणारे थोडे थोडे लोक आहेत, त्यांच्या जोरावर हें काम चालावयाचें आहे. त्यांनीं जर ह्या प्रयत्नाचें अगत्य धरिलें नाहीं, तर हीं पत्रें सापडलीं आणि न सापडलीं सारखींच आहेत.

शिवाय महाराष्ट्रांतील इतिहासजिज्ञासूंनाच संबोधण्याचे एक विशेष कारण आहे. इतर देशांप्रमाणें आपल्या ह्या महाराष्ट्राची स्थिति नाहीं. कलकत्ता, मद्रास, मुंबई येथील १७व्या व १८व्या शतकांतील इंग्रेजी चिटणिशी दफ्तरांतील राजकारणीं पत्रें छापण्यास प्रो. फारेस्टसारख्यांस इंग्रज सरकार पगार व खर्च देतें. वाशिंग्टन, वेलिंग्टन, नेपोलियन, फ्रेडरिक वगैरे पुरुषांचे पत्रव्यवहार शोधण्यास, निवडण्यास व छापण्यास त्या त्या देशांतील सरकारें केवळ उत्सुक असतात. आपल्या ह्या देशांतील प्रकार मात्र अगदीं वेगळा आहे. मराठी दफ्तरें छापण्याचा खर्च देण्यास सार्वभौम किंवा मांडलिक सरकारें सध्यांच कोणी तयार होतील असा अद्याप तरी रंग दिसत नाहीं. तेव्हां हें काम आपलें आपणच केलें पाहिजे.