प्रस्तावना

ह्या खंडांत माधवराव नारायण पंत प्रधान यांचे हैदराबाद येथील वकील गोविंदराव कृष्ण काळे यांची नाना फडणीसांस व पंत प्रधानांस आलेलीं पत्रे छापावयाचीं आहेत. गोविंदराव कृष्ण काळे यांचे वंशज श्रीमंत रा. रा. बापूसाहेब काळे, बी. ए. एल्. एल्. बी. यांनीं आपल्या बारामती येथील दफ्तरांतील सुमारें दहा बारा हजार पत्रे माझ्या स्वाधीन केलीं. हीं पत्रें १७८६ पासून १७९८ पर्यंतच्या अवधींतील बहुतेक आहेत. नाना फडणीसांस व पंत प्रधानांस पाठविलेल्या पत्रांचें जावक गोविंदराव कृष्ण यांनीं सेक्शन बांयडिंगने बांधून, सुरेख, वळणदार व टपो-या अक्षरांनीं लिहून, फार सुरक्षित असें आपल्या दफ्तरखान्यांत ठेविलें होतें. गोविंदराव कृष्ण यांच्या मृत्यूनंतर ८० वर्षेपर्यंत हीं जावकें अंधारांत लोळत पडून सुमारें दोन वर्षांपूर्वी श्रीमंत बापूसाहेब यांच्या हस्तें त्यांची झाडपूस झाली. उंदीर, पाऊस, घुशी, वाळवी, कोळी, वारा आणि आळशी व अज्ञ कारकून ह्यांच्या तडाक्याखालीं ह्या जावकपत्राच्या पुस्तकांच्या निवळ भाकरी बनून गेल्या होत्या. कित्येक जावकें आरपार पोखरून गेलीं होतीं; व कित्येकांचा तर मिसर देशांतील ममीप्रमाणें भुगा होऊन गेला होता. ह्या शेवटल्या दुर्दैवी भुग्याची आशाच सोडावी लागली. आरपार पोखरून हैराण झालेलीं पुस्तकें थंड पाण्याच्या घड्यांच्या नाजूक उपचारानें पुन्हां थोडीं बहुत बोलूं लागलीं. व पहिल्या वर्गांतील भाक-यांवरील चिकटा अधणाच्या वाफा-यानें धुवून काढल्यावर, आंतील पत्रें पुनः ताजीतवानीं झालीं. अशा मोठ्या दुर्धर प्रसंगांतून हीं पत्रें सोडविलेलीं आहेत. जुन्या कदीम, रियासतेंतील हीं अवशेषें आहेत. त्यांचा सत्कार महाराष्ट्रांतील इतिहासज्ञ अत्यंत आदरानें करतील अशी खात्री आहे.

प्रस्तुत पत्रांचा सत्कार करण्याचें काम महाराष्ट्रांतील इतिहासज्ञांवर सोंपविल्यामुळें, इतर जनांचा क्वचित् रोष होण्याचा संभव आहे. परंतु वास्तविक प्रकार जो आहे तो बोलून दाखविला पाहिजे. इतिहास व चरित्रें लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, इतिहासशास्त्राचा ज्यांनीं अभ्यास केला आहे, जे ह्या विषयांत अधिकारी झालेले आहेत, त्यांच्याखेरीज इतरांना ह्या पत्रांच्या वाचनापासून काडीचाहि उपयोग नाहीं. स्वदेशाभिमानानें प्रेरित होऊन कित्येक लोक हीं पत्रें वाचतात ही आनंदाची गोष्ट आहे; परंतु इतिहासाची रचना करण्याच्या हेतूनें किंवा त्यांतील मर्म समजून घेण्याच्या इच्छेनें जे कोणी थोडे लोक सध्यां प्रोत्साहित झाले आहेत किंवा पूढें होतील, त्यांच्याकरितां विशेषतः हा प्रयत्न आहे. नवी नवी चीज आहे तोंपर्यंत इतिहासज्ञेतर लोक ह्या पत्रांचें कौतुक करतील; परंतु त्यांचें हें आगंतुक प्रेम लवकरच थिजून जाईल असा मला संशय येतो.