Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

तेव्हां त्यांची येथे पुनरुति करीत नाहीं. १७१५ त वसईपासून सावंतवाडीपर्यंत पूर्ण स्वतंत्र किंवा अंशतः परतंत्र असे अधिकारी येणेप्रमाणें होते (१) वसई, ठाणे व चेऊल या प्रांतांत पोतुर्गीज लोक, (२) मुंबईस इंग्रज लोक, (३) जंजि-यास हबशी, (४) अलीबागेस आंग्रे, (५) सावंतवाडीस सावंत, (६) मालवणापासून पन्हाळ्यापर्यंतच्या प्रदेशांत कोल्हापूरकर, (७) व गोंव्यास पोर्तुगीज आंग्र्यांच्या व्यतिरित स्वतंत्र असे ५ सत्ताधारी ह्यावेळीं कोंकणातील निरनिराळ्या भागात असल्यामुळे, शाहूराजांच्या वतीने आंग्र्यांस वेळोवेळी ह्या पाच लोकाशीं युद्धप्रसग पडत. त्यातल्या त्यांत, पोर्तुगीज, इंग्रज व शिद्दी ह्यांच्याशी आंग्र्यांचा सबंध विशेष येई. १७१७ त इंग्रजांचें सक्सेस नांवाचे मोठे तारू आंग्र्यानें धरिले, व मुंबईकर इंग्रजांना तो अपमान निमूटपणें सहन करावा लागला. कोंकणच्या किना-यावर मराठ्यांचा पूर्ण हक्क व अधिकार असल्यामुळे त्या किना-याच्या लगतच्या पाण्यांत परदेशचीं जी जी तारवें गैरपरवाना येत, ती ती आंग्र्यांना धरून ठेवणे भाग पडे. हा कायदेशीर हक बजावण्याच्या कामात कान्होजी आंग्रे फार दक्ष असल्यामुळे मुंबईच्या इंग्रजांचा व साष्टींतील पोर्तुगीजांचा त्याच्यावर विशेष लोभ नसे. शाहू राजाच्या वतीने कोंकणकिनारा व्यवस्थित ठेवण्याबद्दल कान्होजी आंग्रे इतर सरंजामी सरदारांप्रमाणें छत्रपतींना पेशकश दरवर्षी देत असे. बाळाजी विश्वनाथाच्या सरंजामीं पद्धतींत कान्होजी आंग्रे आल्यामुळे त्यांचे परराष्ट्रापासून निवारण व स्वराष्ट्रांत अंतर्भाव मोठा नामी झाला होता. परंतु ही सुरक्षितता कान्होजीला मनापासून आवडत होती असे दिसत नाहीं. शाहूराजाच्या व पेशव्यांच्या आज्ञा न जुमानण्याकडे कान्होजीची प्रवृति असे, तत्रापि छत्रपतींना व पेशव्यांना वरकरणी तरी तो चिकटून असे. छत्रपतींना धरून राहिले असतां केवढा फायदा होतो हें, १७१५ त बाळाजी विश्वनाथाच्या साहाय्याने त्यानें शिद्दयाला बहुतेक नष्ट केलें, त्यावेळीं त्याच्या चांगले प्रचितीस आले छत्रपतीनाहि आंग्र्यांचा उपयोग थोडाथोडका होत नसे. पोर्तुगीज, इंग्रज, डच वगैरे दर्यावर्दी लोकांना तोंड देण्यास कान्होजीची सदा तयारी असे. १७१७ त इंग्रजांनीं विजयदुर्ग घेण्याचा प्रयत्न केला. तों हाणून पाडून इंग्रजांचे सक्सेस हे गलबत कान्होजीने मारिलें. १७१९ त खांदेरीवर इंग्रजांनीं हल्ला केला. तेथेहि कान्होजीनें त्यांना यथास्थित चोप दिला. १७२० त इंग्रज व पोर्तुगीज ह्या दोघांनीं मिळून कान्होजीची विजयदुर्गंजवळ पाण्यात गाठ घेतली. परंतु काहीं गलबते जाळून टाकण्यापलीकडे त्यांच्या हातून विशेष काहीं झाले नाही. ग्रांटडफनें आपल्या इतिहासाच्या १२ व्या भागात छापिलेले पत्र ह्या विजयदुर्गाजवळील लढाईला अनुलक्षून आहे. हें पत्र देतांना डफ कान्होजीला चाचा म्हणून नावे ठेवितो, परंतु हा दोष सर्वथैव अवास्तव आहे. राष्ट्रराष्ट्रांत लढाई सुरू असल्यावर, आपलीं गलबतें शत्रूच्या हातांत गेलीं किंवा शत्रूने आपलें नुकसान केलें म्हणून चरफडून त्याला चांचा म्हणणें केव्हांहि गैरशिस्तच आहे. १७२२ त इंग्रजांनीं कुलाब्यावर हल्ला केला; परंतु तेथेंहि त्यांना विजयदुर्गाचाच अनुभव आला. १७२४ त कान्होजीनें विजयदुर्गास डच लोकांचीहि अशीच राळ उडवून दिली. १७२७ त इंग्रजांचें डार्बी नांवाचे गलबत कान्होजीनें गारद केलें. कान्होजीचा हा तडाका असा एकसारखा हमेषा चालला होता. कान्होजीच्या पुढें बाहेरच्या लोकांची कोंकणच्या किना-यावरील बंदराकडे किंवा किल्ल्यांकडे नुसती बघण्याची देखील छाती नव्हती इंग्रज, डच, पोर्तुगीज, हबशी, शामल ह्या सर्वांना वचकात ठेवणारा पुरुष मोठा दर्यावर्दी योद्धा समजला पाहिजे. छत्रपतींच्या आश्रयास असल्यामुळे, इतर शत्रूंपासून भीतीचे कारण न राहून, कान्होजीला हा वेळपर्यंत दर्यांतील आगंतुकाची विचारपूस निर्भडपणें करतां आली. कान्होजीनें व कान्होजीच्या चिरंजीवांनीं छत्रपतींचा आश्रय असाच एकनिष्ठपणे चालविला असता, तर दर्याकिना-यावर मराठ्यांचे नाव असेच विजयी रहाते. परंतु दुर्दैवाने कान्होजीच्या व त्यांच्या सततीच्या हातून छत्रपतीचें व त्यांच्या सरदारांचे सूत्र नीट राखण्याचे काम शिस्तवार न झाल्यामुळें व छत्रपतींच्या सरदारांकडून व महापुरुषांकडूनहि आंग्र्यांचें वर्तन ज्या रीतीने सुधरवून घेतलें पाहिजे होते त्या रीतीने न घेतल्यामुळे, आंग्र्यांचा, सरदारांचा व छत्रपतींचा क्षय झाला. हा प्रकार कसा झाला, त्याचें निवेदन पुढील कथाभागात केलें आहे.