Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

५ उत्तरेकडून, पूर्वेकडून, व दक्षिणेकडून चालुक्य, यादव, राष्ट्रकूट, विजयानगरकर, सोंधेकर, दिल्लीकर, अमदाबादकर, अहमदनगरकर, बेदरकर, दौलताबादकर, सातारकर, कोल्हापूरकर वगैरे देशावरील राजांनी कोंकणप्रांत वेळोवेळीं हाताखालीं घातलेला प्रसिद्धच आहे. त्याचप्रमाणें पश्चिमेकडूनही शक, यवन, पोर्तुगीज, इंग्रज, हबशी वगैरे समुद्रापलीकडील परदेशस्थ लोकांनाहि हा प्रांत काबीज करण्याची आवश्यकता भासली आहे. ह्या प्रांताचें उत्पन्न विशेष नसून प्रत्येक महत्त्वाकांक्षी किंवा आकांक्षाहीन चक्रवर्ती राजाला तो आक्रमण करावा असे का वाटावे ह्याचें अनेक इतिहासकारांना गूढ़ पडलेलें आहे. ह्मा गूढ़ाचे इंगित असें आहे कीं वास्तविक कोंकण म्हणून जो निरुपद्रवी प्रांत आहे त्याला सह्य पर्वताचें सानिध्य आहे. ह्या पर्वतांच्या द-यांत व खो-यांत देशावरील चक्रवर्ती राजांच्या अंमलाला कंटाळलेल्या उपद्व्यापी पुरुषांना हमेषा आश्रय मिळतो. तो नाहींसा करून आपली सत्ता निष्कंटक करण्याच्या इच्छेनें तीं दरीखोरीं ह्या सम्राटांना जिंकावीं लागतात, व ती जिंकण्याच्या कामांत निरुपद्रवी व सालस अशा कोंकणप्रांतालाहि सगतिदोषाचे प्रायश्चित मिळते. ह्या द-याखो-यांत आंगरवाडी म्हणून एक वाडी आहे. तेथूनच आंग्रे ह्यांची अर्वाचीन काळची मूळ पिढी उत्पन्न झाली म्हणून सगतात.

६ आंग्रे यांची वंशावळ अशी आहे
ही वंशावळ मजजवळील व इतर पत्रांतील उलेखांवरून रचिली आहे. कान्होजीला पांच मुलगे होते असे डफ म्हणतो (History, P. 231), ते अर्थात चूक आहे. प्रो फॉरेस्ट यांनी Selections from the Bombay Secretariat, Maratha Series, Vol.1 ह्या पुस्तकाच्या ६६० पृष्ठावर आंग्र्यांची वंशावळ येणेप्रमाणे दिली आहेः-
कान्होजी आंग्रे

काव्येतिहाससग्रहातील ११९ व्या लेखांत येसाजी आंग्र्याने मानाजीला व सभाजीला चिरंजीव म्हटलें आहे. ह्यावरून वरील वंशावळ सबंध चुकली आहे हे स्पष्टच होते शिवाय दवलतराव शिंद्यांची आई मैनाबाई हिचा मुलगा सभाजी होय असे वंशावळीत दाखविलें आहे. ते इतकें गचाळ आहे कीं, त्यावर टीका करण्याची जरूर नाहीं. प्रो. फॉरेस्ट यांनीं दिलेल्या दुस-या कित्येक वंशावळीं अशाच अविश्वसनीय आहेत.

प्रो. फॉरेस्ट यांच्या ह्या पुस्तकांतील अस्सल पत्रांखेरीज बाकीचा एकूणएक भाग असाच कमजास्त अप्रमाण आहे. आंग्र्यांचें घराणे शकपाळ कुळांतील असून अस्सल मराठा आहे. कुलाबा गझेटियरांत आंग्र्यांचें मूळ आफ्रिकेतील आहे असा खोडसाळ उलेख केला आहे; परंतु शहाण्णव कुळींत आंग्रे यांचें घराणे प्रसिद्ध असल्यामुळें ह्या उल्लेखाला यत्किंचितही मातबरी देतां येत नाही. शिवाय आंग्रे यांचे शरीरसबंध भोंसले, शितोळे, दाभाडे, गायकवाड, थोरात, शिंदे, तिखोडे, बरगे, अलक, दिनकरराव, मोहिते वगैरे अस्सल मराठ्यांशीं झालेले असल्यामुळे गझेटियरकारांचे हे विधान सर्वस्वी आगंतुक,अप्रमाण व निराधार आहे. शकपाळ हें आडनांव महाराष्ट्रांत फार प्रसिद्ध असून शिवाजीच्या एका पवाड्यांत ह्या नांवाचा उलेख केलेला आढळतो.