Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

३ ब्रह्मेंद्रस्वामींच्या २३६ पत्रांपैकी १० पत्रें कान्होजीची, २५ पत्रें सेखोजीची, २९ पत्रे सभाजीची, १३ पत्रे तुळाजीची, १५ पत्रे मानाजीचीं, व बाकीचीं मथुराबाई, सतूबाई, लक्ष्मीबाई, गिरजाबाई. बाकाजी नाईक महाडीक, रघुनाथ हरी, गणेश बल्लाळ वगैरेचीं आहेत. ह्या खंडातील २४७ व्या लेखांकाची मिति ३१ आक्टोबर १७३० व २५५ व्या लेखांकाची मिति १९ एप्रिल १७३२ अशी हवी आहे लेखांक २३ हें पत्र जयसिंग जाधवाचें नसून जयसिंग आंग्र्याचे आहे व हें १७४० त लिहिले नसून १७३२ त लिहिले आहे ब्रह्मेंद्रस्वामींच्या पत्रांत ब्रह्मेंद्रासबंधी माहिती बरीच असून, शिवाय आंग्र्यासबंधींही माहिती थोडी नाहीं. ह्या माहितीशीं इतरत्र सांपडणा-या माहितीची सांगड घालून आंग्र्यासबंधीं देववेल तेवढी माहिती पुढें देतों.

४ पनवेल, राजमाची, पेण, चेऊल, बारकोट, महाड, अलीबाग, दाभोळ, सुवर्णदुर्ग, सगमेश्वर, वगैरे कोकणांतील शहरांशीं आंग्र्यांचा सबंध इ. स. १६८० पासून १८४० पर्यंत आहे कोंकणांशी भोसल्यांचा सबंध १६४० पासून सुरू होऊन हाकालपर्यंतहि चालला आहे असे म्हटले असता चालेल १६४० पर्यंत ह्या प्रांतांतील निरनिराळ्या प्रदेशांशीं दिल्लीचे पातशहा, विजापूरचे पातशहा, अहमदनगरचे पातशहा, गुजराथचे पातशहा, पोर्तुगीज लोक, जंजि-याचे शिद्दी, जव्हारचे कोळी, ठाणे, कल्याण, चेऊल व देवगड येथील मराठे राजे यांचा सबंध आलेला आहे १३१८ त देवगिरी घेतल्यावर कोकणाशी मुसलमानांचा सबंध सुरू झाला. १५१२ त चेऊल येथें वखार बांधल्यापासून पोर्तुगीज लोकांचा व १६३८ त राजापूर येथें वखार बांधल्यापासून इंग्रजांचा परिचय कोंकणांतील लोकांना करावा लागला. १३१८ च्या पूर्वी यादव, चालुक्य, राष्ट्रकूट वगैरे दक्षिणेतील घाटावरील राजांच्या अमलाखालीं कोंकण होतें असें ताम्रपटावरून दिसते. सारांशा अलीकडील हजार बाराशे वर्षे कोकण साक्षात् देशावरील राजांच्या किंवा त्यांचे अंकित जे मांडलिक त्यांच्या अमलाखाली आहे. ह्या अवधींत कोंकणांत स्वतंत्र राजा असल्याचे आढळत नाहीं. पौराणिक वीरपुरुष परशुराम ह्याच्या वेळीं कोकण स्वतंत्र असल्यास न कळे कान्हेरी, मंडपेश्वर, घारापुरी, कुडें, चिपळूण, दाभोळ वगैरे ठिकाणच्या लेण्यांवरून असे दिसते की कोकणांत काही काल बौद्धांचे ठाणे होतें. येणेंप्रमाणे अलीकडील अडीच हजार वर्षांचा इतिहास जाणण्याची जीं काहीं तुटपुंजी व असमाधानकारक साधने उपलब्ध आहेत, त्यांवरून पाहतां कोंकण बहुतेक सदासर्वदा कोंकणेतर राजांच्याच अंमलाखालीं असल्याचें आढळून येतें. कोंकणांत एखादा स्वतंत्र व बलिष्ठ राजा होऊन त्यानें घाटावरचे प्रांत जिंकल्याचें उदाहरण एकहि नाहीं. कोकणस्थ असा शककर्ता राजा म्हटला म्हणजे एवढा परशुरामच होय. परंतु तो पौराणिक कालांतील असल्यामुळे ऐतिहासिक कालांतील गोष्टींचा विचार करतांना त्याला विशेष महत्त्व देण्याचें प्रबळ कारण दिसत नाहीं.