सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

अडण [उधस्] (अढें पहा)

अडाखा [ अत्याखा] ( धातुकोश-अडख पहा)

अडाण [उधस्] ( अढें पहा)

अडाणी - प्राकृतांत अडअणा म्हणून एक शब्द आहे. त्याचा अर्थ असति, लबाड, कुंटण स्त्री असा आहे. ह्या अडअणा शब्दाचा मराठी अपभ्रंश अडाणा, अडाणी असा होत असे. पैकीं अडाणी हें रूप मात्र मराठींत राहिलें आहे. अडाणी शब्दाचा लबाड, लुच्ची हा मूळ अर्थ जाऊन, अज्ञानी असा अर्थ सध्यां होतो. हा अडाणी शब्द मराठींत तिन्ही लिंगीं वापरला जातो. (स. मं. शके १८२६)

अडीच [ सार्धद्वि = साडइड = साडीच = अडीच. स चा लेप ] (ग्रंथमाला)

अंडील [ आंण्डीर = अंडील ] उ०- अंडील वैल.

अंडू [ अंतर्भ (te be in) = अंडू] हा त्याचा अंडू आहे म्हणजे त्याच्यांत समावणारा आहे; अंडू म्हणजे आंडगडी खेळांतला. (भा. इ. १८३६)

अडून १ [ अंतरित्वा = आंडून, अडून (अव्यय) ]

-२ [अंतर्धाय (आकर्णनं ) = अडून ऐकणें. ]

-३ [ अंतर्धाय = अडून. धा ३ धारणपोषणयोः ] ( धा. सा. श. )

अडेलतट्टू [अड्ड् - अड्डिल + तस्थु Stationary = अडेलतट्टू] ताठ व आडणारा माणूस, घोडा इ.

अड्डा (बाजारांतील व्यापार्‍यांची सभा), आडत [ आड् उद्यमे ] आडबाजार ह्यांत आड ह्या मराठी शब्दाला बाजार हा फारशी शब्द दिला आहे. (ग्रंथमाला)

अड्डा (मल्ल वगैरेंचा) [ अड्ड अभियोगे ] मल्लांचें युद्धस्थान, आखाडा, तालीमखाना. (ग्रंथमाला)

अड्यालपड्याल - नदीच्या अलीकडील तीराला अड्याल व पलीकडील तीराला पड्याल म्हणतात. संस्कृत तट ह्या शब्दाला प्राकृत शब्द अड आहे. तल ह्या शब्दाचें प्राकृतरूप अल होतें. तेव्हां तटतल = अडअल = अडाल = अड्याल. प्रतितल = पडअल = पडाल = पड्याल. अडाल व पडाल हीं रूपें अडालगंगा, पडालगंगा ह्या उखाण्यांत कित्येक गांवढ्यांच्या तोंडांतून अद्यापही येतात. प्रस्तुत कालीं अड्याल व पड्याल हीं रुपें सार्वत्रिक आहेत. (स. मं. शके १८३६)

अढण [उधस्] (अढें पहा)

अढें [ उधस् = उढें = अढें, अढण, अडाण, अडण ]